'या' हेअर स्टाईलमुळे होतो केसांवर परिणाम?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 21 September 2020
  • सध्या मुलींना दररोज नविन हेअर स्टाईल करायला आवडते. आता मुली त्यांच्या पोशाखा नुसार हेअर स्टाईल करताना दिसतात.
  • व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसावे, यासाठी न विसरता सौंदर्याची योग्य ती काळजी घेणे, ही देखील एक कला आहे.

मुंबई :- सध्या मुलींना दररोज नविन हेअर स्टाईल करायला आवडते. आता मुली त्यांच्या पोशाखा नुसार हेअर स्टाईल करताना दिसतात. व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसावे, यासाठी न विसरता सौंदर्याची योग्य ती काळजी घेणे, ही देखील एक कला आहे. त्वचा आणि केस याकडे फार क्वचितच लोक लक्ष देत असतील. सध्याच्या धावपळीच्या युगात आरोग्याची देखभाल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे कठीण झाले आहे. पण दिवसभरातील काही मिनिटे स्वतःसाठी काढणे आवश्यक आहे. एखाद्या पार्टीसाठी चांगला ड्रेस परिधान करून साजेसा मेकअप करून तुम्ही सुंदर दिसू शकता. दरम्यान तुमचा लुक अधिक आकर्षक दिसण्यासाठी हेअरस्टाइल देखील महत्त्वाची असते. सुंदर आणि आगळ्या वेगळ्या हेअरस्टाइलमुळे गर्दीमध्येही तुमचा लुक हटके दिसू शकतो.

पण खराब हेअरस्टाइलमुळे केसांच भरपूर नुकसान होण्याचीही शक्यता असते. वेळेअभावी, ऑफिस तसेच घरातील कामांमुळे आपण केस कसे ही बांधतो. काही वेळानंतर याचा केसांवर वाईट परिणाम दिसू लागतात. केस मजबूत आणि घनदाट व्हावेत, यासाठी आपण कित्येक उपाय करत असतो. पण काही केशरचनेमुळे भरपूर नुकसान देखील होऊ शकते. जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती.

स्‍ट्रेटनिंग

बहुतांश तरुणींना केसांचे स्ट्रेटनिंग करणे पसंत असते. या ट्रीटमेंटमुळे केस सुंदर दिसतात. पण यासाठी केसांवर मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर केला जातो. यामुळे केस कमकुवत होतात. परिणाम केस तुटणे, केसगळती इत्यादी समस्या निर्माण होऊ लागतात. शिवाय केसांवरील नैसर्गिक चमक देखील नाहीशी होऊ लागते. केस निर्जीव, निस्तेज आणि कोरडे देखील होतात. तुम्हाला केस सरळ करायचे असतील तर यासाठी नैसर्गिक पद्धतींची मदत घेऊ शकता.

मेसी बन

कडक उन्हाळ्यामध्ये मेसी बन हेअरस्टाइल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. उन्हाळ्यामध्ये स्वतःला स्टायलिश लुक देण्यासाठी बहुतांश तरुणी मेसी बन हेअरस्टाइलची निवड करतात. केस सैल सोडल्यानेही त्यांचे नुकसान होते, हे लक्षात घ्या. कॅज्‍युअल लुकसाठी मेसी बन ही उत्तम निवड नक्कीच असू शकते. पण या हेअरस्टाइलमुळे तुमच्या केसांचे भरपूर नुकसान होत आहे, हे लक्षात घ्या. यामुळे केसगळती मोठ्या प्रमाणात होऊ शकते.

टाइट पोनीटेल

केस लांबसडक असो किंवा छोटे, यासाठी सर्वांत सोपी हेअरस्टाइल म्हणजे पोनीटेल. पण या हेअरस्टाइलमुळे केस खराब होऊ शकतात. पोनीटेलमध्ये केस घट्ट बांधले जातात. यामुळे केसांच्या मुळांवर परिणाम होतो. परिणामी केस कमकुवत होत जातात. ज्यामुळे केसांचे तुटणे, केसगळती मोठ्या प्रमाणात वाढते. रबर बँडमुळेही केसांचे सर्वाधिक नुकसान होते.

केस मागील बाजूस ठेवणे

केस घनदाट आणि लांबसडक दिसण्यासाठी काही जण भांग न पाडता सर्व केस मागील बाजूस ठेवतात. ही हेअरस्टाइल स्टायलिश जरी वाटत असली तरीही केसांच्या आरोग्यासाठी चांगली नाही. कारण यामुळे केसांमध्ये गुंता होण्याचे प्रमाण वाढते. गुंता वाढल्याने केस तुटण्याची शक्यता अधिक असते. केसांचे नुकसान टाळण्यासाठी ही हेअरस्टाइल करू नये. तसंच केसांचा गुंता होणार नाही, याचीही काळजी घ्यावी.

घट्ट वेणी

घट्ट वेणी बांधल्याने केस मजबूत होतात आणि लवकर वाढतात, असा काही जणींचा समज असतो. पण वास्तविकता घट्ट वेणी बांधणे आपल्या केसांसाठी नुकसानकारक असते. केसांच्या मुळांवर ताण पडल्याने केस कमकुवत होतात. यामुळे केस तुटतात. तसंच केसांसाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात पिन आणि क्लिपचा वापर करत असाल तर टाळूच्या त्वचेचंही नुकसान होण्याची भीती असते. यामुळे डोकेदुखी, डोके जड झाल्यासारखे वाटणे इत्यादी समस्यांचाही सामना करावा लागण्याची शक्यता असते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News