नोकरीसाठी शिफारस पत्र आवश्यक वाटते का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 July 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत...
  • सद्या खासगी क्षेत्रात नोकरी मिळवायची असेल तर शिफारशीची गरज लागते. शिफारस असेल तर उमेदवाराला नोकरी दिली जाते.

 

मुंबई : पुर्वी टॅलेन्ट असलेल्या उमेदवारांना हमखास नोकरी मिळायची, त्याला कोणाच्याही शिफारशीची गरज लागत नव्हती. सद्या खासगी क्षेत्रात नोकरी मिळवायची असेल तर शिफारशीची गरज लागते. शिफारस असेल तर उमेदवाराला नोकरी दिली जाते. त्यामुळे टॅलेन्ट असूनही शिफारस नसल्यामुळे उमेदवार मागे राहतात. 'नोकरीसाठी शिफारस पत्र आवश्यक वाटते काय?' या विषयावर 'यिनबझ'च्या अनेक ग्रुपमध्ये तरूणांनी आज मनसोक्त चर्चा केली. या झालेल्या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया आम्ही येथे देत आहोत.

  
वास्तविक पाहता ही गोष्ट समाजाला अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे. बहुतेक वेळा चांगल्या नोकरीसाठी वशील्याची गरज लागते. पण मग अशा वेळी उच्च शिक्षणाचा उपयोग काय? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी तरुण महत्वाची भूमिका बजावतात आणि जर अशावेळी त्यांच्या गुणांना वाव न मिळणे हे विकासाच्या दृष्टीने घातक ठरू शकते.
-नगेंद्र स्वामी

मला वाटत नाही की, नोकरीसाठी शिफारस पत्राची आवश्यकता आहे. जर वशिला लावून काम करायचे असेल तर मग उ्च्च शिक्षणाचा काय फायदा आहे का? उलट वशिला लावून नोकरी मिळवणे ही, लज्जास्पद गोष्ट आहे. मग इतके वर्ष जे शिक्षण घेतले, त्यासाठी जी मेहनत घेतली त्यांचा तुम्हाला काय फायदा आहे. जर तुम्ही वशिला लागून नोकरी करत असाल तर तुमच्या शिक्षणाचा तुम्हाला काही फायदाच झाला नाही म्हणजे तुम्ही तुमची १७ वर्ष वाया घालवली आहेत. याचा अर्थ तूम्ही वशिला लावता म्हणजे तुमची त्या नोकरीसाठी कुवत नाही.  नोकरी कोणतीही असू पण स्वत:च्या बळावर मिळवली तर त्या नोकरीचा आपल्याला स्वाभीमान वाटतो. परंतु जर तुम्ही वशिला लावून नोकरीला लागत तर तुम्हाला त्या नोकरीचा स्वाभिमान वाटणार नाही आणि या कृत्यामुळे बाकी लोकांच्या नोकरीवर देखील परिणाम होतो.
- रसिका जाधव

नोकरीसाठी शिफारस पत्राची गरजच का लागावी. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते दूध जो पितो तो व्यक्ती वाघासारखा गुरगुर केल्याशिवाय राहत नाही. तसेच उच्च शिक्षित तरुण पदवीधर तरुण हे जर देशाचे भविष्य  घडवू शकतात़. तर मग त्यांना नोकरी करण्यासाठी  कोणत्याही व्यक्तीच्या वशील्याची गरज का पडावी? शिक्षण घेतलेल्या प्रत्येक तरुणांमध्ये  शिस्त, चारित्र्य, देशप्रेम ह्या गोष्टी ठासून भरलेल्या असतात, की ज्यामुळे तो कोणापुढेही लाचार होणार नाही. तरीसुद्धा ह्या तरुणाला चांगल्या पदावर काम करण्यासाठी वशील्याची गरज का पडते. तर आज समाजामध्ये त्या तरुणांमध्ये असलेली कौशल्य, कला, गुण यांचा विचारच केला जात नाही. जर खऱ्या अर्थाने  देशाचा विकास करायचा असेल ना तर तरुणांचे कलागुण, कौशल्य, आणि मुख्य म्हणजे त्यांच्यात असणारे स्किल या गोष्टींवरून त्याला नोकरी दिली पाहिजे. पण सध्या पैसा, आणि एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या ओळखीने जो तरुण त्या नोकरीच्या लायक सुद्धा नसतो, तरी सुद्धा त्याला ती नोकरी दिली जाते. अशा भरपूर घटना आहेत, की ज्यांच्यामुळे चांगले तरुण, समाज, आणि देश हा अधोगतिकडे जात आहे. अस म्हणतात "पुस्तकाने मस्तक सुधारते आणि ते सुधारलेले मस्तक कोणापुढेही उभ्या आयुष्यात नतमस्तक होत नाही". मग वशील्याने मिळवलेल्या नोकरीपेक्षा या देशाच्या तरुणाने स्वतःच्या मनगटाच्या ताकतीवर नोकरी मिळवावी. ती नोकरी झाडूवल्यापासून ते क्लास वन अधिकार्यपर्यंतची कोणतीही असु  द्या. पण स्वतःच्या मनगटावर असेल तर त्याला खरी किंमत आहे. लाचारीने दुसऱ्याच्या जीवावर आयुष्य जगण्यापेक्षा, किंवा कामधंदा मिळवण्यापेक्षा जे असेल ते स्वतःचे आणि समजात चालताना ताठ मानेने चालायला शिकावे. आपल्या विचारांना पोलादा सारखी बळकटी आणि सूरी इतकी धार आणली पाहिजे. स्वतःमध्ये एवढी धम्मक असली पाहिजे की तुम्हाला कोणाच्या वशील्याची गरज लागण्यापेक्षा तुम्ही कोणाचा तरी आदर्श बनाल...
- शिल्पा नरवडे

खरं तर तत्वानुसार नोकरीसाठी शिफारस पत्र आवयश्यक नसले तर वास्तवात त्याची गरज आहे. प्रथम म्हणजे शिफारस देणारा व्यक्ती हा त्याच व्यक्तीची शिफारस देतो ज्याची जबाबदारी तो घेवू शकतो. त्यामुळे त्या कामासाठी पूर्ण नसेल पण किमान लायक असलेल्या उमेदवाराला शिफारस पत्र दिले जाते. आणि जे त्या पदासाठी पात्र नसेल तर त्यांची शिफारस हे वेगळ्या हेतूने केली जाते. दुसरी गोष्ट शिफारस पत्र हे तुमचं समजात असलेले स्थान किंवा तुमची कामाव्यतिरिक्त इतर बाह्य क्षेत्रात असलेली ओळख दाखवत असते. ज्याचा उपयोग इतर अंतर्गत कामासाठी होतो. खाजगी जागा मध्ये वशिला लावल्याशिवाय जॉब मिळत नाही, पण इथेही तोच मुद्दा येतो. महत्वाच्या जागेसाठी खाजगी कंपनी त्या जागेला योग्य आणि पात्र व्यक्तीची निवड करत असतात. पण काही ठिकाणी कंपनी व्यवस्थापनासाठी घरातील अथवा नातेवाईक जे इतर वैयक्तिक कारणाने ठेवावे लागत असतात. शेवटी ती खाजगी कंपनी आहे आणि त्यावर केलेली निवड ही त्याच्या खाजगी मर्जी असते. परंतु प्रत्येक व्यवसायिक अथवा उद्योजक नेहमी आपल्या व्यवसाय वाढीच्या दृष्टीने निर्णय घेत असतो. राहिला प्रश्न शिफारस पत्राचा तर शिफारस पत्र मिळाले म्हणजे तुम्हाला नोकरी मिळेलच असे नाही. शिफारस पत्र फक्त एक मार्ग आहे जो कमी वेळेत तुमच्या ठिकाणावर तुम्हाला पोहचायला मदत करते. आपल्या देशात एवढी गर्दी आहे की कधी कधी पात्रता असूनसुद्धा आपल्याला तिथे पोहचता येत नाही. आणि रांगेत उभे राहून जरी पोहचलो तर तेव्हा वेळ गेलेली असते.२१वय असताना एखादी  गोष्ट तुम्ही पात्र असून तुम्हाला नियमानुसार पाहिजे असेल तर ती मिळण्यासाठी अजुन किती वर्ष जातील याची कोणीच गॅरंटी नाही देवू शकत.त्याचवेळी जर तुमची समजात चांगल्या ठिकाणी ओळख असेल अथवा तुमच्या कामामुळे जर कोण इंप्रेस झाले असेल तर त्याच्या शिफारसी वरून तुम्ही तुमची कला किंवा गुण वेळेत सादर करू शकता.
  
 सध्याचे उदाहरणे घ्या ना..सोशल मीडिया नावाच्या शिफारशीमुळे रानु मंडल,रस्त्यावर लाठी फिरवून उपजीविका करणारी आजीबाई आपल्याला वेळेत भेटल्या ना..
 शिफारस ही मदत असते आणि तुमचे वैयक्तिक आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टीची दखल असते ती.कोणालाही शिफारस मिळत नाही.मान्य आहे यात घरातील लोकांना प्राधान्य दिले जाते.पण तुमच्या अंगात योग्य पात्रता असेल आणि तुम्ही प्रामाणिक आणि विश्वासू असाल तर तुम्हाला सुद्धा नक्कीच कोणाची तरी शिफारस मिळू शकते. शेवटी प्रत्येकीचा बघण्याचा दृषटिकोन आहे की..शिफारस या गोष्टीकडे तुम्ही कसे पाहत आहात.ज्याना त्याचा फायदा करून घेता येतो ते त्याचा योग्य फायदा करून घेतात आणि ज्यांना नाही करून घेत त्यांना मग परिणामी अजून दुसरी कंपनी पाहणे अथवा अजून कष्ट करावे लागतात. मूळ प्रश्नावर येवू.नोकरी साठी शिफारस पत्र आवश्यक आहे का हे नक्की कोणत्या प्रकारची नोकरी आहे त्यावर अवलंबून आहे. तसेच हल्ली खाजगी वाशिल्याशिवय काम होत नाही यावर मला वाटते की, पूर्णपणें हे खरे पण बोलता येणार नाही आणि खोटे पण बोलता येत नाही. कारण खाजगी मध्ये कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही हा त्या मालकाचा प्रश्न आहे.
- शंभूराज पाटील

आज बऱ्याच तरुणानं मध्ये टॅलेंट आहे पण प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा ते त्याचा शोध घेत नाहीत. आज प्रत्येक तरुण तरुणीच्या पालकांना वाटत असतं. की एखादी नोकरी लागली की शीण कमी झाला. नोकरी ही ओळखीवर नाही तर टॅलेंट वर मिळवायला हवी. पण बऱ्याच तरुणानं मध्ये टॅलेंट असून मार्ग माहीत नसतो. शिक्षण ऐका माध्यमात आणि नोकरी भलती कडेच. आज ह्याच करणामुळे क्षमता असून सुद्धा शोषण चालू आहे. बऱ्याचदा एखाद्या खात्यात नोकरी मिळवण्यासाठी वशिला लावायला सुरुवात होते. त्यात बऱ्याच जनांची फसवणूक सुद्धा होते त्यात अमाप पैसा घेऊन फरार होतात. त्या मुळे मुलांनी आपल्या हिमतीवर नवीन संधी शोधायला हव्यात. नवीन तंत्रज्ञान आत्मसाद करायला हवं. जे ने करून तुम्हाला त्यांची नाही तर त्यांना तुमची गरज भासली पाहिजे. 

आज आपण ऑनलाईनच्या जगात आहोत शोधा म्हणजे सापडेल. आज ऑनलाईन एव्हडे पोर्टल आहेत की जिथे आपण नोकरी साठी शोध घेऊ शकतो. जो पर्येंत पैसा कमवण्यासाठी आपण नोकरी करू तो पर्येंत शोषण होत राहणार. आहो आज कित्येक पदवीधर मुलं मुली आहेत. ज्यांचाकडून कमी पगारात क्षमते पेक्षा जास्त काम करून घेतात. आणि ज्यांचं शिक्षण कमी आहे त्यांच काय होत असेल. त्यामुळे सध्याच्या ह्या कॉम्पिटिशनच्या जगात तुम्हाला टिकावचं लागेल. आपल्या आवडत्या क्षेत्राचा शोध घ्यावा लागेल. बऱ्याचदा शिफारस केली जाते पण त्या जागेसाठी ती व्यक्ती योग्य नसते त्याला त्या गोष्टीचा अनुभव किंवा ज्ञान नसते. त्यामुळे जो पर्येंत वशिला हा शब्द तुम्ही डोक्यातून काढत नाही तो पर्येंत मार्ग मोकळा होणार नाही. आणि एखादी संस्था, कंपनी जेव्हा आपल्याला आपल्या कामासाठी पैसे देते तेव्हा आपण सुद्धा मेहनतीने त्या संस्थेचा आणि कंपनीचा विकास कसा होईल आणि त्याबरोबर आपला स्वतःचा कडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. मधल्या काही काळात शिक्षण क्षेत्रात तर इतके अमाप पैसे घेऊन संस्था चालकांनी फसवणूक केली आणि पगार जर पहिला तर अगदी तुटपुंजा. तो जो पैसे त्या शिक्षण चालकाला दिला तो जर व्याजाने दिला असता तर त्याच्या व्याजामध्ये बसून खात आलं असतं. हे नाकारता येणार नाही. अस बऱ्याच क्षेत्रात घडतं. शिफारसी पेक्षा मार्गदर्शन जरूर असावे. बऱ्याच ठिकाणी वशिला लावला जातो हे सुद्धा नाकारता येणार नाही. जो पर्येंत तुमच्यातल्या कलागुणांना वाव मिळत नाही तो पर्येंत अस घडत राहणार त्यामुळे आपल्याला काळानुसार बदलायला हवं. आज कित्येकांना इंटरव्ह्यू सुद्धा देत येत नाही कारण मार्गदर्शन नसते. तो कॉन्फिडन्स नसतो त्या मुळे खाजगी क्षेत्राचा जर विचार केला तर बरेच इंटरव्ह्यू तुमचा तुम्हालाच अनुभव मिळेल आणि एक दिवस नक्की तुमच्या क्षमतेची नोकरी जरूर तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही समाधानी सुद्धा असाल. वशील्याने एखादी जागा अडवून बसण्यापेक्षा मेहनतीच्या जोरावर शोध घ्यायला हवा . 
- संदिप सुखदेव पालवे .

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News