व्हाॅट्सअॅप, हाईक असो किंवा टिंडर, बम्बल. आपल्या बाॅयफ्रेंड, गर्लफ्रेंड किंवा डेटबरोबर झालेल्या संभाषणाचे स्क्रीनशाॅट घेण्याची इच्छा कोणाला होत नाही? ती योग्य कि अयोग्य यावर प्रत्येकाचे मत वेगळं असू शकतं पण असे स्क्रीनशाॅट आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हमखास सापडतील हे तितकंच खरं...
म्हणूनच आम्ही हा विषय तरुणाईच्या पुढे मांडला आणि त्यांची मते जाणून घेतली. अर्थात मत व्यक्त करताना सगळेजण आपण किती सोज्वळ आहोत हेच दाखविण्याचा प्रयत्न करत होते तर काहीजण आपल्या ग्रुपमधल्या मित्र-मैत्रिणींच्या गुपितावर बोलू की नको अशा द्विधा मनस्थित आढळले. ते अर्थातच आम्हाला समजलं ते त्यांच्या कोड लँग्वेजमध्ये चाललेल्या संभाषणावरून. पण अनेक प्रतिक्रिया या मजेशीर होत्या.
सुरुवातीला काही तरुणांनी या विषयावर बोलणे टाळले तर काही तरुणांनी प्रमाणिक उत्तरे दिली. नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटींवर काही तरुणांनी बोलक्या प्रतिक्रीया दिल्या, त्यातील काही निवडक प्रतिक्रीया आम्ही देत आहोत.
एका तरुणाने सांगितले, "मला माझ्या प्रेयसी सोबत मोबाईलवर मेसेज करून बोलायला खूप आवडते. तुम्हाला पण आवडत असेल... आम्ही वेगवेगळ्या शहरात शिक्षण घेत असल्यामुळे जास्त वेळ मिळत नाही. आम्ही रात्री चॅटींग करत असताना आमच्या दोघांमध्ये कोणतीही गोष्ट एकमेकांबरोबर शेअर करतो. पण ती काही सांकेतिक पद्धतीने किंवा स्पेशल भाषेत करतो. तिच्या मेसेजमधील चांगल्या गोष्टी, अविस्मरणीय अशा शेअर केलेल्या आठवणी गोष्टींचा स्किनशॉट काढून ठेवतो. त्यामुळे गोष्टी आठवणीत राहतात."
सुनील कोटकर म्हणतो, "एकमेकांवर विश्वास असेल तर कुठल्याच समस्या निर्माण होत नाहीत. नवविवाहित मुलगी आपल्या पतीला पूर्ण विश्वासानेआपल्या वैयक्तीक गोष्टी सांगतेच ना. त्याचप्रमाणे पर्सनल चॅटींगमध्ये नवीन मेसेज आणि जुने मेसेज यांजी जुळवा जुळवा करण्यासाठी मला स्किनशॉट काढावसा वाटतो."
सूरज कांबळे म्हणाला, "हा विषय खूप मजेशीर आहे, प्रेम सर्वाना होते पण जास्त लोक दाखवत नाहीत. मुले पर्सनल मेसेजचे स्क्रिनशॉट घेतात कारण त्या मेसेजमध्ये काहीतरी चांगले प्रेमाचे बोललेले असेल किंवा त्याला तो मेसेज आवडला असेल, त्याला तो मेसेज त्याच्या मित्राला दाखवायचा असेल. हे पण एक कारण असू शकते. दुसरे कारण म्हणजे मुलगी किंवा मुलगा बोलत असताना त्यांच्यात अनेक गप्पा गोष्टी होतात. जर नंतर कधी भांडण झाले किंवा त्यांची गोष्ट घरच्यांपर्यंत गेली तर चूक दाखवून देण्यासाठी या स्क्रिनशॉटचा वापर केला जातो."
पुण्यातल्या एका काॅलेजमध्ये शिकणारी वेदिका देसाई म्हणते, "स्क्रीनशाॅट हे एक दुधारी शस्त्र आहे. ते मुलींसाठी जितकं फायद्याचं आहे तितकंच तोट्याचंही. कारण बाॅयफ्रेंडने एखादी गोष्ट मनाविरुद्ध केली आणि पुढे जाऊन काही उद्योग केलाच, तर त्या सगळ्या भानगडीपासून स्वतःला वाचवता येतं, पण आपल्या मनातल्या भावना जर आपण कधी बिनधास्त व्यक्त केल्या तर ब्रेकअपनंतर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो ही भीती असतेच. डिलीट कर म्हणून सांगितले तरी अशा इमेजेस कोण कुठे सेव्ह करून ठेवेल हे सांगता येत नाही."
हनुमान येडमे म्हणाला, "भांडण झाले तर 'यात माझी काही चुक नाही' हे सिद्ध करण्यासाठी प्रियकर- प्रियसी स्क्रिनशॉट काढून ठेवतात."
एकजण नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाला, "मला पूर्वी स्किनशॉट काढून ठेवायची सवय होती, मात्र, रिया चक्रावर्ती प्रकरणात स्क्रीनशाॅट व्हायरल झाल्याचे पाहून तो लोच्या बंद केला. 'कब किस पे कैसा वक्त आयोगा कौन जानता है!' त्यामळे आता स्किनशॉट काढायला थोडी भीती वाटतेच!"
आणखी एकाने त्याच्या आयुष्यात नुकताच घडलेला प्रसंग सांगितला. तो म्हणाला, "माझ्या प्रियसीने तिच्या व्हाॅट्सअॅपवरील मेसेजचे काही स्किनशॉट काढून ठेवले होते. ते एक दिवस तिने मला दाखवले. ते पाहून मला धक्काच बसला, कारण माझ्या एका मित्रानेच तिला प्रपोज केल्याचे ते स्क्रीनशाॅट होते. माझा चांगला मित्र असा बदमाशपणा करु शकतो याची जणीव या स्क्रीनशाॅटमुळे झाली."
चांगलं-वाईट तुम्हीच ठरवा!
स्क्रीनशाॅट घेणं ही जितकी टेक्निकल गोष्ट बनली आहे तितकीच ती मानसिक स्वास्थ्य आणि नाते संबंधांसाठी प्राॅब्लेमॅटिक होत चालली आहे. एखादं नातं टिकवण्याबरोबरच अनेक प्रसंगांमध्ये नातं तुटण्यामागेही असे स्क्रीनशाॅट कारणीभूत ठरले आहेत. काही मानसोपचारतज्ज्ञांच्या मते मोबाईलवर झालेल्या चांगल्या वाईट संभाषणाचे असे पुरावे सतत जवळ बाळगल्यामुळे काहीजणांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. सातत्याने त्याच गोष्टींचा विचार, विशेषतः कोणाकडून दुखावले गेले असल्यास, अशा स्क्रीनशाॅटमुळे ती गोष्ट किंवा प्रसंग, शब्द विसरले जात नाहीत. त्याचा खोलवर परिणाम आपल्या मनावर होत असतो. त्यामुळे एखादा वादविवाद जिंकण्यासाठी किंवा तुम्हाला सुखद वाटणाऱ्या घटनांच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी तुम्ही असे स्क्रीनशाॅट काढत असाल तर त्याच्या चांगल्या वाईट परिणामांचाही विचार करा आणि मगच निर्णय घ्या.