मुंबईतील 'या' किल्ल्याचा इतिहास माहिती आहे का? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 12 March 2020
  • मुंबईच्या बेटांवर एकूण 11 किल्ले होते. त्यापैकी वरळी बेटाच्या भूशिरावर असलेल्या छोट्याश्या टेकडीवर इंग्रजांनी "वरळीचा किल्ला" बांधला.

मुंबईच्या बेटांवर एकूण 11 किल्ले होते. त्यापैकी वरळी बेटाच्या भूशिरावर असलेल्या छोट्याश्या टेकडीवर इंग्रजांनी "वरळीचा किल्ला" बांधला. या किल्ल्याचा उपयोग समुद्रीमार्गाने होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी केला गेला.

वरळीचे समुद्रात शिरलेले भूशिर, माहिमचा किल्ला आणि बांद्रयाचा किल्ला ही तीन ठिकाणे मिळून इंग्रजी 'यू' या अक्षरा सारखा आकार तयार होतो. ह्या ठिकाणी नैसर्गिक अंतर्वक्र भूशिरामुळे येथे समुद्र नेहमीच शांत असतो. 

त्यामुळे ह्या भागात छोटे मचवे, जहाजे, पडाव यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असे. ह्या जलवाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि या भागाचे रक्षण करण्यासाठी इंग्रजांनी 1675 साली वरळीचा किल्ला बांधला.

वरळीच्या टेकडीवर असलेल्या किल्ल्याची नुकतीच डागडुजी पुरातत्व खात्याने केली आहे. त्यामुळे किल्ला सुस्थितीत आहे. छोट्या दरवाज्याने किल्ल्यात प्रवेश केल्यावर त्या दरवाज्याच्या माथ्यावर घंटा बांधायचा छोटा टॉवर आहे. किल्ल्यात पाण्याची विहीर असून त्याच्या बाजूला अलिकडे बांधलेले छोटे मंदिर आणि व्यायमशाळा आहे.

किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी जीना बांधलेला आहे. ह्या जिन्याने किल्ल्याच्या तटबंदीवर जाता येते. किल्ल्याच्या तटबंदीवरून बांद्रा, माहीम पर्यंतचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या बाहेर समुद्रकिनारी तोफांसाठी बांधलेले 3 चौथेरे दिसतात. 17 व्या शतकाच्या अखेरीस समुद्री चाच्यांचा वाढलेल्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी इंग्रजांनी तोफांची योजना केली होती. किल्ल्यावरून वरळी-बांद्रे सागरी पुल पाहाता येतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News