खेळातील या करिअरच्या संधी तुम्हाला माहित आहेत का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

‘खेळ’ या विषयाला खूप महत्त्व प्राप्त झाल्याने शासनाने त्याचा अभ्यासक्रमात अंतर्भाव केला आहे. खेळासाठीचा वेगळा अभ्यासक्रम तयार करून इयत्तेप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाते.

‘खेळ’ या विषयाला खूप महत्त्व प्राप्त झाल्याने शासनाने त्याचा अभ्यासक्रमात अंतर्भाव केला आहे. खेळासाठीचा वेगळा अभ्यासक्रम तयार करून इयत्तेप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाते. शारीरिक शिक्षणाला इ.1ली ते 8वीसाठी आठवड्याला चार तासिका आणि इ.9वी, 10वीसाठी आठवड्याला तीन तासिकांची योजना केली आहे. या तीन व चार तासिकांमध्ये क्रीडाशिक्षकांनी विद्यार्थ्यांची शारीरिक सुदृढता सुधारणे; विद्यार्थी तंदुरुस्त झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणे; छोट्या-मोठ्या आजारांपासून परावृत्त करणे आणि मुख्य म्हणजे खेळाची आवड निर्माण करणे, त्याचबरोबर खेळातील मुलांचा सहभाग वाढवणे अपेक्षित आहे.

तंदुरुस्त राहून निरोगी जीवन जगता आले पाहिजे.शासनाने शालेय स्तरावर वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धा म्हटले की, हार-जीत ही आलीच. खेळात भाग घेणारा खेळाडू जिंकण्याच्या इर्षेनेच मैदानात उतरतो. त्यामुळे त्याला हार खूपच जिव्हारी लागते. शालेय स्तरावर सहभागी होणारे खेळाडू पुढे विभाग स्तरावर, राज्य स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर खेळू शकतात. जे खेळाडू प्रथम क्रमांकाने यश मिळवतात त्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी शासनाने दहावी व बारावीमध्ये शिकत असताना जर राज्य व राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी सहभागी झाला, तर त्याला एकूण गुणांत 29 गुण देण्याचीही योजना केली आहे. तसेच, पुढे राष्ट्रीय स्तरावर खेळाडूने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले; तसेच सलग तीन राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग घेतला तर राज्यशासन व केंद्रशासन विविध पुरस्कारांनी खेळाडूंचा गौरव करतात.

केंद्रशासनामार्फत व राज्यशासनामार्फत वेगवेगळ्या सरकारी क्षेत्रांत अशा खेळाडूंना नोकरीसाठी आरक्षण असते. प्रत्येक क्षेत्रात 5% जागा या राष्ट्रीय खेळाडूंसाठी राखीव असतात. रेल्वेचे क्षेत्र, एल.आय.सी. वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत बँका, पोलीसीदल, राज्यराखीव पोलीस दल, केंद्रसरकार राखीव पोलीस दल, शिक्षण विभागात व्यवस्थापकपदी, कस्टम विभाग, नौदल, भूदल, वायूदल अशा क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना भरती करून घेतले जाते. त्यांना वरिष्ठपदही दिले जाते.

खेळातून आपले जीवन घडवायचे म्हटले, तर इतरही अनेक क्षेत्रे आहेत की, ज्यामध्ये खेळाच्या माध्यमातून आपण आपले जीवन घडवू शकतो. आवड आणि गती असलेल्या खेळामध्ये एखादा विद्यार्थी उत्तम खेळाडू होऊ शकतो. त्याचबरोबर त्या खेळाचा प्रशिक्षक म्हणूनही तो काम करू शकतो. पत्रकारितेच्या क्षेत्रातही खेळाडू आपले करिअर करू शकतात. पत्रकारितेत प्रोग्रॅम बनवावा लागतो. तो प्रोग्रॅम तयार करून, खेळाडूंना त्याची माहिती देता येते. तसेच, सध्या काही खेळांमध्ये स्कोअररची आवश्यकता असते. स्कोअर कसा लिहायचा, कम्प्युटरवर कशी मांडणी करायची, यामध्येही खेळाडू आपले करिअर करू शकतात.

तसेच, पुढील क्षेत्र म्हणजे खेळाडूंचा शारीरिक ठेवणीचा आलेख तयार करून त्याच्या शरीराच्या हालचालींना कोणता आहार योग्य असेल त्याप्रमाणे त्याची आखणी करणे. शारीरिक हालचालींची नोंद घेऊन त्या खेळाडूला कोणत्या प्रकारचा आहार द्यावा, याची नोंद ठेवणे. तसेच, फिजिओथेरपिस्ट म्हणूनही काही खेळाडू आपले करिअर करू शकतात. आज डॉक्टरांच्या बरोबरीने फिजिओथेरपिस्टची वेगवेगळ्या खेळांत होणार्‍या इजा बर्‍या करण्यासाठी गरज भासते. प्रत्येक खेळाच्या संघाबरोबर एकतरी फिजिओथेरपिस्ट असतोच. खेळाडूला होणार्‍या दुखापती आणि शरीरावर येणारा ताण हे फिजिओथेरपिस्ट कमी करतात. तसेच, खेळाचे साहित्य बनवणे हाही एक खेळाच्या माध्यमातून करिअर करण्याचा एक मार्ग आहे. तसेच, योगाथेरपी हाही एक मार्ग आहे. खेळाच्या माध्यमातून आज समाजाला योगाची अत्यंत आवश्यकता आहे.

याबरोबरच शाळा महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षण या विषयाचे शिक्षक म्हणूनही खेळाडूंना काम करण्याची संधी आहे.अशा अनेक क्षेत्रांच्या माध्यमातून खेळाडूंना आपले करिअर करण्याची संधी असते. त्याची माहिती असेल, तर खेळाडू त्या त्या क्षेत्रात जाऊ शकतात आणि आपले भावी आयुष्य योग्य प्रकारे घडवू शकतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News