चहा किंवा कॉफी पिताय! तर जाणून घ्या 'या' गोष्टी

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Tuesday, 1 October 2019

पाणी जसं जीवनासाठी आवश्यक असतं तसच काही लोकांसाठी चहा किंवा कॉफी हे पेय आवश्यक आहे. त्यामुळेच दिवसाची सुरुवात ही चहा किंवा कॉफीने झाली की दिवस चांगला जातो.

पाणी जसं जीवनासाठी आवश्यक असतं तसच काही लोकांसाठी चहा किंवा कॉफी हे पेय आवश्यक आहे. त्यामुळेच दिवसाची सुरुवात ही चहा किंवा कॉफीने झाली की दिवस चांगला जातो असा बहुतांशी लोकांचा समज असतो. तसेच चहा- कॉफी म्हणजे ‘अ‍ॅसिडिटी’ किंवा ‘निद्रानाश’ असा शिक्का मारून या पेयांना दूर ठेवणारेही बहुतेक जण आहेत. चहा- कॉफी चांगली की वाईट, ही पेये किती प्रमाणात प्यावीत, त्यातून काय- काय मिळतं, याविषयी सांगताहेत डॉ. वैशाली जोशी… 

चहा किंवा कॉफी ही दोन्ही पेयं मुळीच वाईट नाहीत. कारण या दोन्ही पेयांमध्ये ‘अँटिऑक्सिडंट’चे प्रमाण चांगले असते. चहातल्या ‘फ्लॅव्हेनॉइड’ या घटकातून ‘कॅटेचिन’ हे अँटिऑक्सिडंट मिळते, तर कॉफीत ‘क्लोरोजेनिक अ‍ॅसिड’ हे अँटिऑक्सिडंट असते. अँटिऑक्सिडंट शरीरातील पेशींचे आरोग्य आणि एकूणच रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. तसेच काही प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, वय वाढण्याशी संबंधित समस्या, अल्झायमर अशा आजारांना प्रतिबंध करतात. त्यामुळे त्या दृष्टीने ही पेये उत्तमच.

चहा आणि कॉफीची महत्त्वाची समस्या म्हणजे या दोन्ही पेयांमध्ये साखर असते. कॅपेचिनोसारख्या कॉफीमध्ये क्रीमही असते. त्यामुळे सतत चहा- कॉफी पिणाऱ्यांच्या पोटात कॅलरीजदेखील जास्त जातात. या अतिरिक्त कॅलरीजमुळे वजन वाढण्याची शक्यता असते. हा मुद्दा लक्षात घेतला तर चहा- कॉफी दोन्हीही कमी साखरेचे किंवा साखर न घातलेले घ्यावे. शक्यतो त्यात दूधही न घातलेले चांगले.

दूध न घालण्याचे कारणही समजून घेणे गरजेचे आहे. दुधात ‘केसिन’ नावाचे प्रथिन असते. हे प्रथिन चहा- कॉफीतील अँटिऑक्सिडंटस्चा प्रभाव कमी करते. पण मग कोऱ्या चहा-कॉफीने ‘अ‍ॅसिडिटी’ होणार नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. ज्यांना चहा-कॉफीने अ‍ॅसिडिटी होते त्यांनी या पेयांमध्ये थोडेसे दूध घातले तर हरकत नाही. अन्यथा दूध किंवा क्रीम घालणे टाळावेच. त्यामुळे ‘ब्लॅक टी’ किंवा ‘ब्लॅक कॉफी’ चांगली. दूध घातल्याशिवाय चहा- कॉफी पिणे शक्यच नाही, अशी परिस्थिती असेल तर त्यात म्हशीच्या दुधापेक्षा गाईचे दूध घालणे चांगले. कारण गाईच्या दुधात स्निग्धांश कमी असतो. ‘आइस टी’ म्हणजे थंड चहा हेदेखील उत्तम पेय आहे. पण त्यातही भरपूर साखर असल्यामुळे कमी साखर घालून तो प्यायल्यास बरे.

दिवसभरात जास्तीत जास्त ३ ते ४ कप चहा किंवा कॉफी प्यायली तर चालू शकेल. त्यापेक्षा अधिक प्रमाणात आणि वारंवार ही पेये पिणे मात्र टाळावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी ४ ते ६ तास चहा- कॉफी पिऊच नये. अगदी प्यायचीच असेल तर या काळात ‘डीकॅफिनेटेड कॉफी’ पिता येईल. अगदी कमी कॅफिन असलेली ही कॉफी हल्ली बाजारात मिळते. त्यात प्रतिकप १० मिलिग्रॅमइतकेच कॅफिन असते. चहा किंवा कॉफी पिऊन लगेच झोपणे मात्र चुकीचेच. काही जणांना रात्री उशिरापर्यंत किंवा अतिताणाचे काम करण्यासाठी वारंवार चहा किंवा कॉफी प्यावीशी वाटते. असे करणे बरोबर नाही हे कळून देखील ही मंडळी ते टाळू शकत नाहीत. चहा- कॉफीमधून कॅफिन पोटात गेले की तरतरी येते हे जरी खरे असले तरी त्याला एक पर्याय आहे. उशिरापर्यंत सातत्याने काम करावे लागणाऱ्यांनी दर दोन तासांनी काहीतरी खाल्ले तर शरीरातील शक्ती टिकून राहील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News