तुमचेही दिवसातले 8 तास ऑनलाईन व्हिडीओ पाहाण्यात जातात?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 21 November 2019

जगभरातील नागरिक आठवड्यातील सहा तास ४८ मिनिटे ऑनलाईन व्हिडीओ
भारतीय मात्र आठ तास ३३ मिनिटे ऑनलाईन व्हिडीओ पाहतात.
‘स्टेट ऑफ ऑनलाईन व्हिडीओ २०१९’च्या अहवालातून ही बाब उघड

मुंबई : जगभरातील नागरिक आठवड्यातील सहा तास ४८ मिनिटे ऑनलाईन व्हिडीओ पाहण्यासाठी खर्ची करत असताना भारतीय मात्र आठ तास ३३ मिनिटे म्हणजेच, जागतिक सरासरीपेक्षा एक तास ४५ मिनिटे अधिक खर्ची करतात. ‘लाईमलाईट नेटवर्क्‍स’द्वारे करण्यात आलेल्या ‘स्टेट ऑफ ऑनलाईन व्हिडीओ २०१९’च्या अहवालातून ही बाब उघड झाली आहे. 

भारतासह फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, यूके आणि अमेरिकेतील १८ व त्यापुढील वयोगटातील ४५०० नागरिकांच्या प्रतिसादांवर लाईमलाईट नेटवर्क्‍सचा अहवाल आधारित आहे. हे नागरिक प्रत्येक आठवड्यात एक तास किंवा त्याहून अधिक वेळ ऑनलाईन व्हिडीओ पाहतात. त्याकरिता भारतीय नागरिक स्मार्ट फोनचा सर्वाधिक वापर करतात. त्यापाठोपाठ संगणक, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही व इतर डिजिटल उपकरणांचा वापर होतो. सलग एखाद्या कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहण्याच्या प्रमाणाला ‘बिंज’ म्हणतात.

यात भारतीयांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत २३ टक्के वाढ झाली असून हे प्रमाण सरासरी २ तास २५ मिनिटे आहे. सर्वसाधारणपणे भारतीय नागरिक घरी असताना ऑनलाईन व्हिडीओला पसंती देतात. प्रवासात ऑनलाईन व्हिडीओ पाहणेही त्यांना आवडत असल्याचे अहवालात म्हटले आहे. टीव्हीचे कार्यक्रम आणि बातम्यांबाबतही भारतीयांची सर्वाधिक पसंती असून त्यानंतर चित्रपट आणि समाजमाध्यमांवर व्यावसायिकदृष्ट्या विकसित सामग्रीचा क्रमांक लागतो. भारतात समर्पित स्ट्रीमिंग उपकरणांचा अवलंबही हळूहळू वाढत आहे असेही अहवालात म्हटले आहे.

इंटरनेट स्वस्त झाल्याने शहरांसह ग्रामीण भागांतही स्मार्ट फोनचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेक गावेही डिजिटल तंत्रज्ञान व सेवांच्या कक्षेत येत आहेत. दर्जेदार प्रोगामिंगसाठी भारतीय डिजिटल व्यापारपेठ विस्तारत आहे.
- अश्‍विन राव, विक्री संचालक, लाईमलाईट नेटवर्क्‍स

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News