बस नंबर पाहून बसमध्ये चढत जाऊ नका; नाहीतर असं होणार

अतुल शिरुडे
Monday, 10 June 2019

कधी-कधी घाईगडबडीत चूक झाल्याने त्याचा आपल्याला काय त्रास होतो. याचे एक उत्तम उदाहरण माझ्या बाबतीत घडलेले. साधारण दोन-तीन वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी चाकणहून पुण्याला गेलो होतो. तिथली दिवसभरातली कामे आटोपल्यानंतर मी चाकणला परत येण्यासाठी पुणे स्टेशनवर आलो.

कधी-कधी घाईगडबडीत चूक झाल्याने त्याचा आपल्याला काय त्रास होतो. याचे एक उत्तम उदाहरण माझ्या बाबतीत घडलेले. साधारण दोन-तीन वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी चाकणहून पुण्याला गेलो होतो. तिथली दिवसभरातली कामे आटोपल्यानंतर मी चाकणला परत येण्यासाठी पुणे स्टेशनवर आलो. रात्रीचे साधारण आठ वाजले होते. राजगुरुनगर, चाकण, भोसरीकडे येणारे भरपूर प्रवासी तिथे बस येण्याची वाट पहात होते. मीही त्यांच्यात सामील झालो.

त्यावेळी पुणे स्टेशनवरुन पुणे स्टेशन ते राजगुरुनगर ही ३५७ नंबरची पीएमपीएमएलची थेट बससेवा चालायची जिच्यात चाकणकडे येणाऱ्या प्रवाशांची थेट सोय व्हायची. आम्ही बस येण्याची वाट पहातच होतो. काही वेळात एक बस तिथे येऊन थांबली जिचा पुढील भाग अगदी ३५७ नंबरच्या बससारखा दिसत होता. मी क्षणाचाही विलंब न करता बसण्याकरता बाक सांभाळण्यासाठी बस राजगुरुनगर जाणारी आहे की नाही ही खात्री न करता बसमध्ये चढलो आणि मोठ्या कष्टाने बसण्यासाठी बाक मिळवले. मला खिडकीकडची जागा मिळाल्याने मी निश्चिंत होऊन बसलो. माझ्याकडे दैनिक पास असल्यामुळे तिकीट काढण्याची आवश्यकता नव्हती.मी आता बाकावर आरामशीरपणे बसलो. 

एव्हाना बस सुरु झाली होती. दिवसभराच्या फिरण्याने मी थकलो होतो त्यामुळे बाकाला टेकताचं माझे लगेच डोळे लागले. साधारण पाऊण तासानंतर मला जाग आली. लागलीच मी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. बस भोसरीजवळ आली होती. चाकण यायला अजून अर्धा तास असल्याने मी पुन्हा निश्चिंत होऊन बसलो. भोसरीतुन थोडे पुढे गेल्यावर बस अचानक पुणे-नाशिक महामार्ग सोडून डाव्या बाजूला जाऊ लागली. मला सर्वप्रथम ती डेपोत जात असेल असे वाटले. परंतु बस जरा जास्तच पुढे जात असल्याचे बघून मी घाबरलो व बाकावरुन उठून पुढे गेलो. पुढेच उभ्या असलेल्या प्रवाशास मी बस कुठे जात असल्याचे विचारले, त्यावर त्याने कल्पना नसल्याचे सांगितले.

मी मात्र त्याला "मुर्खा, बस कुठे जातेय हे माहिती नसतांना बसमध्ये बसलाच कसा?"असे बोलून सुनावले. खरे पाहता तो सहप्रवासी मला हेच उलट उत्तर देऊन भांडू शकला असता पण माझे सुदैव त्याने तसे केले नाही. मी लागलीच पुढे गेलो. चालकाला बस कुठे जात असल्याचे विचारले, त्यावर त्यांनी बस पुणे स्टेशन-इंद्रायणी नगर असून ती इंद्रायणी नगर, भोसरी येथे जात असल्याचे सांगितले.
 

घाईगडबडीत बसमध्ये चढतांना राजगुरुनगरऐवजी इंद्रायणी नगर बसमध्ये चढल्याचे आता माझ्या लक्षात आले होते. मी चालकाला विनंती करुन बस तिथे थांबविण्यास सांगितले .चालकाने बस थांबवली. मी बसमधून घाईघाईतचं उतरलो. बसमधून उतरताचं मी उर्ध्व दिशेने पुणे-नाशिक महामार्गाच्या दिशेने चालू लागलो.चाकणकडे जाणारी बस पकडण्यासाठी मी वेगात चालत होतो. एव्हाना दहा वाजत आले होते. महामार्गाजवळ येताच सुदैवाने मला भोसरी-राजगुरुनगर बस येताना दिसली. 

मी क्षणाचाही विलंब न करता बसला हात केला. चालकानेही वेळ लक्षात घेऊन थांबा नसतांना बस तिथे थांबवली. मी बसमध्ये चढलो व बरोबर साडेदहा वाजता चाकणच्या आंबेठाण चौकात उतरलो. अशा प्रकारे मग घाईगडबडीत चुकीची बस पकडूनही मी उशिराने का होईना ठिकाणावर सुखरुप पोहचलो. अन् अशा प्रकारे त्या वेळी झालेली माझी छोटीशी चूक आजही माझ्या जशीच्या तशी लक्षात आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News