‘पीसीएम’मध्ये पात्रता नाही? जाणून घ्या यामधील पर्याय

हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
Tuesday, 4 June 2019

बारावी परीक्षेचे ऑनलाइन निकाल जाहीर झालेला आहे. अभियांत्रिकी शाखेसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीमध्ये पीसीएम विषयात एकत्रितरीत्या खुल्या गटासाठी ५० टक्के (१५० गुण) व राखीव गटासाठी ४५ टक्के (१३५ गुण) प्राप्त करणे आवश्‍यक आहे. ‘

बारावी परीक्षेचे ऑनलाइन निकाल जाहीर झालेला आहे. अभियांत्रिकी शाखेसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीमध्ये पीसीएम विषयात एकत्रितरीत्या खुल्या गटासाठी ५० टक्के (१५० गुण) व राखीव गटासाठी ४५ टक्के (१३५ गुण) प्राप्त करणे आवश्‍यक आहे. ‘पीसीएम’मध्ये पात्रता नसल्यास पात्रतेसाठी केमिस्ट्रीऐवजी पर्याय म्हणून बायोटेक्‍नॉलॉजी अथवा बायोलॉजी अथवा तांत्रिक व्यावसायिक विषयांपैकी गुण ग्राह्य धरले जातात. तरीही ही पात्रता होत नसल्यास उपलब्ध असलेल्या पर्यायांचा अभ्यास करून निर्णय घ्यावा.
पर्याय १ :

पदविका द्वितीय वर्ष प्रवेश ः

बारावीमध्ये ज्यांना पात्रता नाही, त्यांना पुन्हा श्रेणीसुधार योजनेंतर्गत बारावी परीक्षा पुन्हा देऊन पात्रता प्राप्त करण्याचा मार्ग उपलब्ध असतो; परंतु त्यासाठी एक वर्षाचा कालावधी वाया जातो. त्याऐवजी बारावीनंतर डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश घेणे, दोन वर्षात डिप्लोमा पूर्ण करणे, त्यानंतर द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश घेऊन तीन वर्षांत पदवी प्राप्त करणे अशा पद्धतीने पाच वर्षात अभियंता होणे हाच पर्याय सुलभ आहे. यासाठी फक्त बारावी परीक्षा पास असणे, अशी अट आहे. आपणास पात्रता मिळाली नाही, याचा विद्यार्थी, पालकांनी गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे. जेईई सीईटीकडेच लक्ष दिले, बारावीकडे दुर्लक्ष केले अशी कारणे न देता आत्मपरीक्षण करावे. पात्रता मिळाली नाही, याचा अर्थ अभियांत्रिकी पदवी पूर्ण करणे खूपच कठीण आहे, याची नोंद घ्यावी व पदविका मार्ग निवडावा. आपण नोकरी करणार का? की स्वतःचाच व्यवसाय हेही निर्णय घेताना महत्त्वाचे आहे. स्वतःचा वडिलोपार्जित व्यवसाय असल्यास पदविका घेऊन स्थिरता मिळविणे केव्हाही चांगले.

त्यानंतर मग पदवीचा विचार करावा. मात्र, ज्यांचे नोकरी हेच उद्दिष्ट आहे, त्यांना मात्र प्रचंड मेहनत करावी लागेल. झालेल्या चुका सुधारून नव्या जिद्दीने डिप्लोमामध्ये डिस्टींक्‍शन मिळवणे व डिग्रीला प्रवेश घेऊन कमीत कमी प्रथम श्रेणी मिळवली, तरच स्वप्न पूर्ण होऊ शकते. राज्यातील शासकीय, तसेच खासगी संस्थांमधील प्रत्येक शाखेसाठीच्या मंजूर क्षमतेच्या २० टक्के जागा या थेट डिप्लोमा द्वितीय वर्षासाठी उपलब्ध होतात. याचबरोबर मंजूर प्रवेश क्षमतेमधून शिल्लक राहिलेल्या जागांवरही प्रवेश दिला जातो. सद्यःस्थितीत राज्यात पदवी तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या हजारो जागा रिक्त राहत असल्यामुळे प्रवेश नक्की मिळेलच. शासकीय नियमानुसार आरक्षण उपलब्ध असून, शासनाच्या प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून प्रवेश मिळाल्यानंतर शुल्क सवलती, वसतिगृह व इतर लाभ मिळू शकतो. प्रवेशप्रक्रिया तंत्रशिक्षण विभागातर्फे राबविण्यात येते. प्रवेशाचे नोटिफिकेशन, माहितीपत्रक, वेळापत्रक यासाठी www.dtemaharashtra.gov.inया संकेतस्थळाच्या संपर्कात राहावे.
पर्याय २ :

कृषी शाखेतील प्रवेश ः

अभियांत्रिकीबरोबरच कृषी शाखेतील प्रवेश हे राज्य शासनाच्या एमएचटीसीईटी-२०१९ मधून होणार आहेत. कृषी प्रवेशासाठी पीसीएममध्ये खुल्या गटातून ५० टक्के व राखीव गटातून ४० टक्के गुण अशी पात्रता आहे. अभियांत्रिकीमध्ये राखीव गटातून ४५ टक्के (१३५ गुण) अशी पात्रता आहे. राखीव गटातील विद्यार्थ्यांना पीसीएममध्ये १२० गुणांची पात्रता असल्याने ते कृषी शाखेतील काही शाखांमधील प्रवेशासाठी पात्र आहेत. बी.टेक कृषी अभियांत्रिकी, बीटेक अन्नतंत्रज्ञान यासाठी पीसीएम विषय चालतो. बीएस्सी कृषी पदवी, उद्यानविद्या पदवी, कम्युनिटी सायन्स व बीटेक जैवतंत्रज्ञान यासाठी पीसीबी अथवा पीसीएम विषय असला तरी चालतो.

थोडक्‍यात, या पर्यायांचाही अवश्‍य विचार करावा. पीसीएम विषयासह फार्मसी करणाऱ्यांनाही ५० टक्के व ४५ टक्के गुणांची अट असल्यामुळे पीसीएम पात्रता नसणाऱ्यांना फार्मसी प्रवेशाचा मार्ग कायमस्वरूपी बंद झालेला आहे.पीसीएम पात्रता नाही, अशावेळी मॅनेजमेंट अथवा अभिमत विद्यापीठातूनही अभियांत्रिकी प्रवेश मिळत नाही, याची नोंद घ्यावी. आपली पात्रता अगदी कमी गुणांवर गेली असल्यास बारावी गुणांची फेरतपासणी करणे, हाही पर्याय वापरून पाहावा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News