कामगारांना नोकरीवरुन काढू नका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 6 July 2020
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यवस्थापकांना आवाहन

मुंबई : कोरोनाच्या कठीण प्रसंगात उद्योगांनी आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडू नये, कारण त्यांचा उद्योग व्यवसाय उभारणीत कामगारांचा मोठा वाटत असतो. त्यामुळेच भलेही काही काळासाठी वेतन कपात केली तरी चालेल, पण कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका. मी स्वत: यासंदर्भात काही व्यवस्थापनांशी बोलणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.

भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आदी सहभागी झाले होते. मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले की, मुंबई आणि पुण्यासारख्या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र एप्रिल अखेरपासून आपण ग्रीन आणि ऑरेंज क्षेत्रातील उद्योग व्यवसायांना अटी आणि शर्तींच्या अधीन राहून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आज अनेक उद्योग त्या ठिकाणी सुरू झाले असून कामगारही रुजू झाले आहेत. पुरेशा क्रयशक्तीच्या अभावी अद्याप बाजारपेठांत ग्राहक नसल्याने काहीशी अडचण आहे; परंतु परिस्थिती सुधारत जाईल. एकीकडे कारखाने हे परराज्यांतील गावी गेलेल्या कामगारांची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे स्थानिक भूमिपुत्र नोकरीसाठी इच्छुक आहे. अशा स्थितीत जे उपलब्ध आहेत, त्यांना लगेच नोकऱ्या द्या आणि व्यवसाय सुरू करा, पण नव्या नोकऱ्या देताना जुन्यांच्या नोकऱ्या घालवू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

औद्योगिक कामगार ब्युरो सुरू

याप्रसंगी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, औद्योगिक कामगारांच्या नोकरीविषयक तक्रारी तुलनेने कमी आहेत; परंतु सेवा क्षेत्र मात्र अडचणी आहेत. मालकांशी सातत्याने संवाद साधून मार्ग काढता येईल. देशातील पहिल्या औद्योगिक कामगार ब्युरोचे उद्‌घाटन आपण करीत आहोत, ज्यामुळे कुशल, अकुशल आणि अर्धकुशल कामगारांना रोजगार मिळेल.

कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या धोक्‍यात

काही व्यवस्थापन परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कामगार कपात करीत आहेत, विशेषत: कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या जात आहेत. सेवा उद्योग अडचणीत आहे. सर्व हॉटेल्स मेटाकुटीला आले आहे, कायम कामगारांवर वेतन कपातीची टांगती तालावर आहे. डिसेंबरपर्यंत ही वेतन कपात करावी, असे सांगण्यात येत आहे. हॉटेल्स, आयटी, लॉजिस्टिकमध्ये कामगारांना कमी करणे सुरू आहे, छोट्या कंपन्यांनी तर कपातीचाच मार्ग अवलंबिला आहे अशा प्रकारच्या अडचणी यावेळी मांडण्यात आल्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News