स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचंय? प्रामाणिकपणे अभ्यास करा 

शब्दांकन : संतोष शाळिग्राम
Tuesday, 26 February 2019

स्पर्धा परीक्षा साधी नसते. त्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास करावा लागतो. आपले ध्येय कायम ठेवून अभ्यास केल्यास यशस्वी होण्यात कोणतीही अडचण येत नाही.

- नंदकुमार, प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग, राजशिष्टाचार

प्रशासकीय क्षेत्रात येण्याचा निर्णय कोणत्या टप्प्यावर घेतला?
: रायपूरमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होतो. तेथे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्‍न निर्माण व्हायचे, त्या वेळी जिल्हाधिकारीच सर्व निर्णय घ्यायचे. हा पगडा मनावर बसला. तोपर्यंत आयएएस काय आहे, हे माहीत नव्हते. तिसऱ्या वर्षात असताना आएएस होण्याची मनात इच्छा निर्माण झाली, पण इंग्रजी जमत नव्हते. मात्र, भाषा आत्मसात केली आणि परीक्षा दिल्या. तिसऱ्या प्रयत्नात आयएएस झालो.

परीक्षेचा अभ्यास कसा केला? 
: मी दररोज दोन वर्तमानपत्रांचे अग्रलेख आणि कॉम्पिटिशन सक्‍सेस रिव्ह्यू वाचत राहिलो. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर आयआयटी दिल्लीत गेलो. तिथे पूर्ण वातावरणच बदलू गेले. इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान यांची तयारी तेथेच केली. तीनदा परीक्षा दिली. मी तीन वर्षे मन लावून दहा तास अभ्यास करायचो. प्रत्येक वेळी यश मिळायचे; पण आयएएस केडर मिळायचे नाही. तिसऱ्या वेळी ते मिळाले. 

प्रशिक्षणाचा अनुभव कसा होता? 
: प्रशिक्षण दोन वर्षांचे असते. आयआयएम आणि वेगवेगळ्या संस्थांतील लोकांना बोलावून त्यांची व्याख्याने घेतात. ते खूप चांगले असते. सभाधीटपणा आणि लोकांशी संवाद मी तिथेच शिकलो. क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष अधिकारी म्हणून काम करावे लागते. यात तहसीलदार, बीडीओ, ग्राम विकास अधिकारी, सर्कल, तलाठी म्हणून काम केले. त्याचा खूप फायदा झाला. प्रत्यक्ष काम करण्याचा तो अनुभव होता.

प्रत्यक्ष अधिकारी म्हणून कामाचा अनुभव कसा आहे?
: अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सर्व कर्मचारी स्वत:हून काम करीत असतील, असे वाटले होते. पण तसे दिसले नाही. चेहऱ्यावर आत्मविश्‍वास दिसणारे अनेक लोक होते. पण त्यांना काम जमत नव्हते. मग कारवाई करण्यास सुरुवात केली. पण लोकांना त्याचा राग येत होता. मग संप झाले. मी कायदाच राबवत होतो; पण त्यांना अन्याय वाटत होता. नंतर लोकांना शिकवा आणि काम करून घ्या, हे तंत्र अवलंबले. ही माझ्यासाठी शिकवणच होती.

स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना काय सांगाल?
:  आयएएस व्हायचे एकदा डोक्‍यात आले की बाकी सगळे सोडून द्यायला पाहिजे. काही लोक म्हणतात नोकरी करता करता किंवा एमपीएससीची परीक्षा देता देता यूपीएससी देऊ. पण ते योग्य नाही. जे दोन्ही करू पाहतात, त्यांना थेट आयएएस होण्याची इच्छा नाही, असा त्याचा अर्थ आहे. ही स्पर्धा परीक्षा आहे. त्यामुळे जे करायचे, ते प्रामाणिकपणे करा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News