असे करा हे दंडयामन जानुशिरासन
- आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. सुरवातीला भिंतीच्या आधाराने हे आसन करावे. म्हणजे तोल सांभाळणे सोपे जाईल.
हे दंडस्थितीमधील, म्हणजेच उभ्याने करायचे आसन आहे. मुले याला बंदूकासन असेही म्हणतात. हे तोलात्मक, स्पर्धात्मक आसन आहे. प्रथम ताठ उभे राहावे. त्यानंतर उजवा पाय गुडघ्यात वाकवून थोडा वर घ्यावा. आता हळूहळू कंबरेतून पुढे वाकावे.
उजव्या पायाची टाच दोन्ही हातांनी पकडावी. ती व्यवस्थित पकडल्यानंतर हळूहळू पाय गुडघ्यातून समोरील दिशेला ताठ करावा. उजवा गुडघा पूर्ण ताठ झाल्यावर कंबरेतून अजून पुढे वाकून हनुवटी किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला टेकविण्याचा प्रयत्न करावा. डावा पायही ताठच असावा. छायाचित्राप्रमाणे आसन करण्याचा प्रयत्न करावा. नजर स्थिर ठेवावी. श्वसन संथ सुरू ठेवावे. गुडघे वाकणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
आसनस्थिती पूर्ण झाल्यानंतर दोन्ही पायांमध्ये काटकोन असावा. त्यानंतर आसन सोडताना सावकाश सोडावे. डाव्या पायानेही आसन करावे. या आसनाच्या सरावाने पायातील शिरा ताणल्या जातात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. स्नायू सुदृढ होतात. पायात वात येण्याचे प्रमाण कमी होते. लवचिकता व एकाग्रताही वाढते. आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. सुरवातीला भिंतीच्या आधाराने हे आसन करावे. म्हणजे तोल सांभाळणे सोपे जाईल.