परिक्षेच्या काळात 'डीजे'ची धूम सुरुच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 15 March 2020
  • परीक्षार्थींप्रमाणेच लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्तींना डीजेच्या आवाजामुळे त्रास होतो.

गंगापूर  : डीजेवर उच्च न्यायालयाची बंदी असताना परीक्षेच्या काळात लग्नसमारंभात बेधडकपणे डीजेची धूम सुरू आहे. दहावीचा गुरुवारी  गणिताचा पेपर होता; पण डीजेच्या आवाजाने विद्यार्थी हैराण होते. याकडे पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

वर्षभर केलेला अभ्यास अवघ्या काही तासांत कागदावर उतरवण्याची कसोटी पार पाडताना डीजेचा अडथळा ठरत आहे. शहरातील न्यू हायस्कूल, जिल्हा परिषद व धूत कन्या शाळेत दहावीची परीक्षा केंद्र आहेत. गुरुवारी परीक्षा सुरू असताना लग्नसमारंभात डीजेचा कोलाहल करणाऱ्या संबंधित डीजेचालकाला आवाजाची मर्यादा पाळण्याविषयी काही नागरिकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्याकडे साफ दुर्लक्ष केले.

शहरात मंगल कार्यालयांची मोठी संख्या झाली आहे. पोलिसांनी थेट मंगल कार्यालय चालकांनाच नोटीस देण्याची मागणी होत आहे. डीजेचालक आणि वाद्य वाजविणाऱ्यांकडून आवाजाची मर्यादा नेहमीच ओलांडली जाते. परीक्षार्थींप्रमाणेच लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्तींना डीजेच्या आवाजामुळे त्रास होतो. परीक्षेच्या काळातही आचारसंहिता पाळली जात नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. 

डीजे वाजविण्यास पूर्णपणे बंदी आहे. तरीही शासनाचा नियम मोडून अनेक लग्नांत डीजेची परवानगी नसतानाही डीजे वाजविला जातो. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना त्रास होतो. डीजे वाजवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
- मच्छिंद्र सुरवसे

 

आज गणिताचा पेपर होता. शहरातील डीजेचा स्पष्ट आवाज वर्गात येत होता. परीक्षेच्या काळात तरी डीजेचा आवाज बंद व्हावा, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेतलेली असते. शांत वातावरणात पेपर सोडविण्यात डीजेमुळे अडथळा येतो. 
- मनसुब तांबे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News