दिशा: शब्दवेडी ते दिशा पिंकी शेख व्हाया बुद्धमीरा

डॉ. मारोती कसाब
Thursday, 20 February 2020

मुंबईच्या शब्द प्रकाशनाने तिला काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा शब्द दिला आहे. कार्यकर्ती ते कवी किंवा कवी ते कार्यकर्ती असा तिचा प्रवास आहे.

ती एक परिपूर्ण मानव
ती एक सक्षम जाणीव
तमाम वंचितांची आशा
दाही दिशा घुमविणारी
ती अकरावी दिशा...!

ती बाबासाहेबांची लेक
ती दिशा पिंकी शेख..!!

नव भांडवली जगाने माणसाला लुटण्याचा सपाटा लावलेल्या या काळात काही कार्यकर्ते तग धरून आहेत, त्यातल्याच दिशा या एक आहेत. सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने उदगीर येथील नगर परिषद प्रांगणात त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त शासकीय विश्रामगृहात त्यांची भेट घेतली. यावेळी तासभर त्यांच्याशी विविध सामाजिक प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा झाली. शब्दवेडी दिशा ते दिशा पिंकी शेख व्हाया बुद्धमीरा हा त्यांचा प्रवास समजून घेतला. जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली होती, त्या नाशिक जिल्ह्यातील येवला येथील विमुक्त भटक्यांच्या एका पालात जन्मलेल्या दिशाला बचपणापासूनच पोटाची खळगी भरण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागली. 

वाढत्या वयात तिला आपण दिसायला पुरुष असलो तरी आपल्यात एक स्त्री असल्याची जाणीव झाली. आधीच राहायला घर नाही, जगायला साधन नाही अशी अवस्था. त्यात समाजाकडून पुन्हा तिरस्कृत नजरांचा तिला सामना करावा लागला. शाळेत असताना टारगट मुलांकडून छळ सोसावा लागला. बायल्या म्हणून हिणवले जात होते. स्वतःचे मन खात होते. याच काळात दिशाला कविता गवसली आणि तिच्या जन्माची सखी झाली. दिशा सांगते, सातवी आठवीला असताना शाळेतल्या सरस्वतीच्या फोटोवर मी पहिली कविता लिहिली. तेव्हा पासून माझा छळ कमी झाला. मुले माझ्याकडून कविता लिहून घेत. कवितेच्या प्रेमात पडल्याने मला खूप मित्र मिळाले. मात्र मला स्थैर्य नसल्याने जास्त शिक्षण घेता आले नाही. दिशा सांगते, शंभर टक्के कॉपी करुन अठ्ठेचाळीस टक्के गुण घेऊन मी मॅट्रिक पास झाले. दोन तीन महिने कॉलेजातही गेले पण परिस्थितीमुळे मला कॉलेज सोडावे लागले. कोवळ्या वयातच मला घर सोडून 'कम्युनिटी'त दाखल व्हावे लागले. तिथे LGBTQ समूहाची ओळख झाली. समूहासोबत खूप भटकंती केली पण समाजाकडून होणारी हेटाळणी होत असल्याने खूप अस्वस्थ व्हायचे. त्यातूनच कविता सुचत गेल्या. 

फेसबुकमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. जगायला बळ मिळाले. याच काळात परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून खूप नवे शिकायला मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी मला आरपार बदलून टाकले. बाबासाहेबांकडूनच मला बुद्ध मिळाला. स्थलांतरित आयुष्य जगत असतानाच खूप पुस्तके वाचली. आता फक्त वाचन हाच माझा छंद आहे. दिशा सांगत होती. एखाद्या उंच कड्यावरून पाणी कोसळावे तसे तिचे शब्द माझ्यासमोर वाहात होते... 

दिशाला खूप काही करायचे आहे. भारतीय समाजातील जातव्यवस्था, भांडवलशाही, पितृसत्ता, स्त्रीपुरुष विषमता संपवायची आहे. दिशा हजरजबाबी आहे. ती रोखठोक बोलते. कुणाचा मुलाहिजा न बाळगता आपल्या मतांवर ठाम राहते. मुंबईच्या शब्द प्रकाशनाने तिला काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा शब्द दिला आहे. कार्यकर्ती ते कवी किंवा कवी ते कार्यकर्ती असा तिचा प्रवास आहे. स्वतःच्या शोधात निघालेल्या दिशाला माझ्या मनःपूर्वक मंगल कामना...जय भीम...!!
  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News