होस्टेजेस : कथेची विस्कळित मांडणी

विशाखा टिकले पंडित
Saturday, 8 June 2019

मूळ कथानक चांगलं असल्यानं मालिकेची घसरलेली गाडी शेवटच्या भागात काहीशी रुळावर येते. तरीही अनेक प्रश्‍न अनुत्तरित राहतातच. त्याच्या उत्तरांसाठी सीजन-२ ची वाट पाहायला हवी.

हॉस्टेजेस या इस्त्रायली टीव्ही कार्यक्रमावर बेतलेलं कथानक, सुधीर मिश्रा यांचं दिग्दर्शन, रोनित रॉय, टिस्का चोप्रा अभिनित होस्टेजेस ही वेबसीरिज ट्रेलर रिलीज झाल्यापासून चांगलीच चर्चेत होती. १० भागांची ही वेबसीरिज नुकतीच हॉटस्टारवर दाखल झाली आहे. चांगलं कथानक, ताकदीचे अभिनेते असतानादेखील अनेक पात्रांची सरमिसळ आणि उपकथानकांमुळे मालिका भरकटल्याची प्रचिती होस्टेजेस पाहताना येते. 

डॉ. मीरा आनंद (टिस्का चोप्रा) एक प्रतिथयश डॉक्‍टर. मुख्यमंत्र्यांच्या ऑपरेशनची जबाबदारी मीरावर सोपवली जाते. या निर्णयावर मीरा ज्यांच्या मार्गदर्शनात शिकली, ते डॉ. अली नाराज असतात. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी मीरा, तिचा नवरा आणि दोन्ही मुलांना घरातच बंदी बनवलं जातं. त्यांच्या जीवाच्या बदल्यात मीराकडून एकच अपेक्षा असते, ती म्हणजे मुख्यमंत्र्यांचा मृत्यू. मीराने इंजक्‍शन देवून त्यांना मारावं असा प्लान असतो. सुरुवातीला या प्रकाराला दाद न देणारी मीरा नवरा-मुलांच्या जीवाखातर हे धाडस करायला तयार होते. दुसऱ्या दिवशी चतुराईने ती ऑपरेशन तीन दिवस पुढे ढकलते. या तीन दिवसात अनेक घडामोडी घडतात. 

सीरिजच्या पहिल्या भागात पृथ्वीसिंह (रोनित रॉय) हा कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतो. काही वेळातच रोनित डॉ. मीराच्या घरात बंदी बनवणारा अपहरणकर्ता म्हणून दिसतो. एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याने असं का करावं? या प्रश्‍नांचा प्रवास यामध्ये दाखवला आहे.

एका डॉक्‍टरला वेठीस धरून अतिशय व्यवस्थित केलेल्या प्लानिंगमध्ये प्रेक्षक सुरुवातीपासूनच गुंतत जातो. डॉ. मीरा या प्लानमध्ये फसतात, का हुशारीने त्या यातून मार्ग काढतात, पृथ्वीसिंग नायक की खलनायक या प्रश्‍नांची उत्तरे शोधताना सीरिज भरकटते. उधार पैसे घेतलेला मीराचा नवरा, अवघ्या १८ वर्षांची गरोदर मुलगी अशा मीराच्या घरातील व्यक्तींच्या उपकथानकांमुळे मूळ कथानकाकडे दुर्लक्ष होतं. सुरुवातीला मालिका प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत नेते, पण नंतरच्या भागात प्रेक्षकांवरची पकड सैल पडत जाते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News