अपंगांची माहिती आता ऑनलाईन उपलब्ध होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

#जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना सरकारी विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणे हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांनी आपला सहभाग नोंदवावा व नोंदणी करून घ्यावी. 
- दिलीप भोईर, 
सभापती, समाजकल्याण विभाग

अलिबाग : जिल्ह्यातील विविध २१ प्रकारांमधील दिव्यांगांना सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा परिषद दिव्यांग सर्वेक्षण सॉफ्टवेअर विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यानुसार ग्रामसेवकांमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. याच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांगांना लवकरच ऑनलाईन जोडण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना ऑनलाईन माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील दिव्यांगांची २०१२- २०१३ मध्ये माहिती घेण्यात आली. त्यामध्ये अस्थिव्यंग, कर्णबधिर, मतिमंद, अंध, कुष्ठरोगमुक्त, थेरेबल पाल्सी हे प्रकार दिसून आले. त्यात १७ हजार ८५४ दिव्यांग आढळून आले; मात्र आता दिव्यांगांची माहिती ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आला आहे. दिव्यांगांच्या कल्याणासाठी जिल्हा परिषद विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून २०१९-२० मध्ये दिव्यांगांचे २१ प्रकारानुसार सर्वेक्षण करण्याचे निश्‍चित करण्यात आले.

ग्रामपंचायत पातळीवर संबंधित ग्रामसेवकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यास सुरुवात करण्यात आली. डाटा एंट्री ऑपरेटरच्या मदतीने दिव्यांगांची माहिती ऑनलाईन स्वरूपात भरण्याचे काम सुरू केले आहे. दिव्यांग सर्वेक्षण १५ मार्चपर्यंत असणार आहे. या सर्वेक्षणानंतर प्राप्त होणारी दिव्यांगांची माहिती ऑनलाईनवर ठेवण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे.-

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News