मुंबई : बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अनेकांची स्ट्रगल स्टोरी आपण ऐकली आहे. प्रत्येकाने काही न काही स्ट्रगल करून आपली ओळख निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये विनोदी आणि ऍक्शन चित्रपट देणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा देखील स्ट्रगल तेवढाच आहे. आज बॉलिवूडमध्ये त्याने दिग्दर्शनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र सुरुवातीच्या काळात त्यानं देखील स्पॉटबॉय म्हणून काम केलं आहे.
अनेक अभिनेत्रीचा स्पॉटबॉय म्हणून त्याने काम केलंय. यामध्ये तब्बू, काजोल, यांचा देखील समावेश आहे. तब्बूच्या 'हकीकत' या चित्रपटासाठी त्याने साड्या इस्त्री करून देखील दिल्या आहेत. यासोबतच आज अजय देवगनसोबत काम करताना त्याने अनेक चित्रपट काढले आहे. मात्र त्याने अजय देवगनच्या स्पॉटबॉयचे काम देखील पाहिलं आहे. आज कोट्यवधींचा मालक असलेल्या रोहितला सुरुवातीला केवळ ३५ रुपये मानधन मिळत होते.
त्यानंतर काही सिनेमांसाठी त्याने सहाय्य्क दिग्दर्शनाचे काम देखील पहिले आहे. तेवढं स्ट्रगल करून आता त्याने दिग्दर्शन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'गोलमाल', 'सिंघम' 'सिम्बा', 'चेन्नई एक्स्प्रेस' यांसारखे हिट चित्रपट देऊन प्रेक्षकांच्या मनावर राज केलं आहे. ऍक्शन आणि विनोद याचा मेल साधत आज अफलातून हिट चित्रपट देण्यात तो यशस्वी ठरला आहे.
आपल्या जिद्द, चिकाटी आणि हुशारीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे. अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर रोहित आता आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. त्याच्या बहुचर्चित 'सूर्यवंशी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अजय देवगन, रणवीर सिंग, अक्षय कुमार, कतरीना कैफ अशी तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुन्हा बॉक्सऑफिसवर धम्माल होणार हे नक्की..!