माणसांच्या अप्रत्यक्ष संवादापेक्षा प्रत्यक्ष संवाद खुंटला

सौ. तनया सिद्धनेर्लीकर
Tuesday, 9 April 2019

‘इंटरनेट’च्या जाळ्याने मोबाईलमध्ये क्रांती केली. संभाषण, माहिती देवाण- घेवाण, मनोरंजन आदी अनेक कामे केवळ एका मोबाईलमध्ये होऊ लागली. आता तर काय, सोशल मीडियाने माणसामाणसांतला ‘अप्रत्यक्ष संवाद’ वाढवला आहे; पण प्रत्यक्ष संवाद मात्र खुंटला आहे. मोठी माणसे सोशल मीडियात रमली आहेतच; पण छोटी निरागसताही या जाळ्यात अडकली आहे. 

साधारण २०- २२ वर्षांपूर्वी ‘संगणक’ या यंत्राने सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रवेश केला. सुरवातीला ‘क्‍लिष्ट’, गुंतागुंतीचे’ वाटणारे हे यंत्र सोपे आणि अगदी जीवनाचा अविभाज्य भाग कधी बनले, हे कळलेही नाही. संगणकाची जादू कायमच असताना ‘मोबाईल’ फोन आले. संवाद अधिकच सुलभ झाला. ‘इंटरनेट’च्या जाळ्याने मोबाईलमध्ये क्रांती केली. संभाषण, माहिती देवाण- घेवाण, मनोरंजन आदी अनेक कामे केवळ एका मोबाईलमध्ये होऊ लागली. आता तर काय, सोशल मीडियाने माणसामाणसांतला ‘अप्रत्यक्ष संवाद’ वाढवला आहे; पण प्रत्यक्ष संवाद मात्र खुंटला आहे. मोठी माणसे सोशल मीडियात रमली आहेतच; पण छोटी निरागसताही या जाळ्यात अडकली आहे. 

बाळांना आता जेवताना आईच्या तोंडून हावभावासह सांगितल्या जाणाऱ्या चिऊ- काऊच्या गोष्टींपेक्षा मोबाईलवरील रंगीबेरंगी गाणी जास्त आवडतात... मैदानाऐवजी मोबाईलवरच्या आभासी खेळांच्या दुनियेत आजचं बालपण हरवलंय... एकाच घरातील आई, बाबा, आजी, आजोबा आणि नातवंडांचे संभाषण व्हॉट्‌सॲप ग्रुपवरून होतंय... यंत्रांच्या दुनियेत घराचे घरपण हरवलंय...

अशा परिस्थितीत एखाद्या घरात टीव्हीचा वापर गरजेपुरता होतो. मुले मोबाईल हातातही घेत नाहीत. पुस्तके, नावीन्यपूर्ण खेळांत बालपण छान रमलंय... असं जर का कुणी सांगितलं, तर हे घरच आपल्याला ‘Virtual’ (आभासी) वाटेल ना! अशाच एका जगावेगळ्या घराचा परिचय अलीकडे झाला. पुणे (कोथरूड) येथील सौ. पूनम आठलेकर यांच्या घरी हे छान चित्र दिसतं! या घरातील मुले मोबाईलवर खेळत नाहीत. घरी टीव्हीचा नाही, तर गप्पागोष्टींचा आवाज असतो. आहे ना आश्‍चर्य!

हे कसं घडलं? याविषयी सांगताना पूनम म्हणाल्या, ‘‘मुले अनुकरणशील असतात, त्यांच्यावर पालकांचा प्रभाव अधिक असतो. हे ओळखून मुले लहान असल्यापासूनच घरातल्या मोठ्या माणसांनी टी. व्ही., मोबाईल आदी गॅजेटचा वापर मर्यादित ठेवला. घरातील सगळेच आठवड्यातून केवळ शनिवार- रविवार हे दोन दिवस टीव्हीवरचे दर्जेदार कार्यक्रम पाहतात. शाळेतून आल्यावर मुले मैदानावर मनसोक्त खेळतात. संस्कार वर्गांना जातात. सुटीच्या दिवशी अभ्यासाव्यतिरिक्त वेळ पुस्तक वाचन, मेकॅनोसारखे नावीन्यपूर्ण खेळ, एकमेकांशी गप्पागोष्टी करण्यात घालवतात.

याचा सगळ्यांत मोठा फायदा म्हणजे एकमेकांतले बंध दृढ झाले आहेत. पूनम व कुटुंबीयांनी लहानपणापासून मुलांना या सवयी लावल्या. नवनवीन पुस्तकांची ओळख करून दिली. विशेषतः जेवणाखाण्याच्या वेळी गोष्टी सांगणे, निसर्गाची ओळख करून देणे या गोष्टी केल्या. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे ‘मुलांसाठी वेळ राखून ठेवला आहे. यामुळे गॅजेट्‌सचे आकर्षण राहिलेच नाही; पण गॅजेट्‌सची गरजेपुरती अभ्यासासाठी तोंडओळख मात्र मुलांना नक्की आहे.’

या सगळ्यांत पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. ‘आधी आपण करावे! मग दुसऱ्यासी सांगावे ।।’ या उक्तीनुसार हे सजग पालक गॅजेट्‌सचा वापर स्वतः मुलांसमोर खूप जपून करतात.
किती छान आहे ना हे घर! छोट्यांचे बालपण ‘जपणारं’... घरपण ‘जगणारं’...!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News