दिनकरन यांची यापूर्वीच हकालपट्टी; मुख्यमंत्र्यांची माहिती

Tuesday, 29 August 2017

चेन्नई: पक्षातून बाहेर फेकले गेलेले टी.टी.व्ही. दिनकरन यांची पक्षाच्या उपसरचिटणीस पदावरून यापूर्वीच हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत केलेले बदल अर्थहीन असल्याची माहिती तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी दिली.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आज मुख्यालयात पार पडली. या बैठकीत पलानीस्वामी बोलत होते. ""दिनकरन यांची 10 ऑगस्ट रोजी सरचिटणीस पदावरून हकालपट्टी करण्यात आली असल्याने त्यांना दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी नियुक्त केलेल्यांना त्यांच्या पदांवरून हटविण्याचा काहीएक अधिकार नाही. तसेच, त्यांनी या संदर्भात केलेल्या घोषणा पक्षावर बंधनकारक नाहीत,'' असा ठराव या बैठकीत घेण्यात आला. पक्षनियमानुसार, शशिकला यांची सरचिटणीस, तर दिनकरन यांची उपसरचिटणीसपदी झालेली नियुक्ती ही प्राथमिक स्वरूपाची असून, ती अनधिकृत आहे. निवडणूक आयोगानेही या नियुक्‍त्यांना मान्यता दिलेली नाही, असे याबाबतच्या ठरावात नमूद आहे.

तुरुंगात असलेल्या पक्षाच्या प्रमुख व्ही. के. शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी लवकरच पक्षाच्या राजकीय समितीची एक बैठक बोलविण्यात यावी, असेही या बैठकीत ठरले. सदर समितीचे सदस्य व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसारच याबाबतचा ठराव घेण्यात आल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या बैठकीस कोणकोणते नेते उपस्थित होते हे अद्याप स्पष्ट झाले नसून, अनेक नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. याबाबत वरिष्ठ नेत्यांकडे विचारणा केल्यानंतर अनुपस्थित नेते कामकाजानिमित्त राज्यातून बाहेर गेल्याचे कारण देत वेळ मारून नेली.

केवळ सरचिटणीसांकडे अधिकार
पक्षाच्या राजकीय समितीची बैठक बोलविण्याचा अधिकार केवळ पक्षाच्या सरचिटणीसांकडे असल्याचा दावा दिनकरन यांच्या गटाने करत पलानीस्वामी गटाच्या ठरावावर आक्षेप घेतला. पक्षाच्या मुख्यालयात उपमुख्यंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत आपल्याला आमंत्रित करण्यात आले नव्हते, असा खुलासाही दिनकरन गटाने केला आहे.

थंगमणी यांची सचिवपदावरून हकालपट्टी
अण्णा द्रमुकचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन यांनी आज तमिळनाडूचे ऊर्जामंत्री थंगमणी यांची नमक्कल जिल्हा सचिवपदावरून हकालपट्टी केली. त्यांच्याजागी एस. अनबझगन यांची वर्णी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. तत्पूर्वी दिनकरन यांनी पक्षाचे मुख्य प्रतोद एस. राजेंद्रन यांची अरियालूर, तर मुख्यमंत्री पलानीस्वामी यांची सालेम जिल्हा सचिव पदावरून हकालपट्टी केली आहे. द्रविडी पक्षातील पदांनुसार जिल्हा सचिव हे पद अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News