१७ वर्षांच्या सुयोगने करिअरसाठी दहावीनंतर विज्ञान विषय घेतला. शिक्षणाशी फारसा संबंध नसताना विज्ञान विषयातून चांगलं करिअर घडेल, म्हणून त्याने विज्ञान विषय घेतला. मात्र, बारावीपर्यंतही त्याला तो झेपला नाही. केवळ करिअरचा उत्तम मार्ग म्हणून कसाबसा मनाला समजावत होता. पण, त्याची रासायनिक समीकरणांशी गट्टी जमलीच नाही. आता तर बारावीची परीक्षा सुरू झाल्यावर त्याचं हे टेन्शन अधिकच वाढलं.
प्रिलिम्समध्ये कसाबसा पास होण्याइतपतच गुण मिळाले. बारावी पूर्ण केल्याशिवाय करिअरसाठी दुसरा विषय घेणं शक्य नाही. त्याला आतापर्यंतचे पेपरही काही लिहिता आले नाही. आता निकालाच्या टेन्शनमुळे तो अधिकच बिथरला आहे. विज्ञान विषयाच्याऐवजी दुसरं करिअर पर्याय म्हणून शोधूया. या विचारात गेल्या वर्षभरापासून माझा आणि झोपेचं वाकडं झालं, सुयोग रडवलेल्या अवस्थेत सांगत होता. त्यानं ही समस्या फॅमिली डॉक्टरला परीक्षा सुरू झाल्यानंतर सांगितली. हा मानसिक ताण नसून, निद्रानाशाची समस्या असल्याचं डॉक्टरांनी त्याला सांगितलंय.
सध्या तरी सुयोगवर झोपेच्या औषधांसह उपचार सुरू आहेत. ही झाली कुमारवयीन तरुणाची कहाणी. परंतु, वयाच्या एका पातळीवर पोहोचल्यानंतर ही समस्या प्रौढांमध्येही आढळते. घरातलं आर्थिक गणित, मुलांचं भविष्य, वाढतं आजारपण ही टिपिकल मध्यमवर्गीयांची कहाणी. तर लेटनाईट पार्ट्यांमुळे रोजचं वेळापत्रक बदलणाऱ्या उच्चभ्रू व्यक्तींमध्येही निद्रानाशाची समस्या दिसून येते. यापैकी कित्येक समस्यांचं कारणंच नसतं. केवळ झोप लागली नाही, रात्रीचे सिनेमे बघत बसलो, तीच सवय जडली आणि आता मध्यरात्रीपर्यंत कितीही प्रयत्न केला तरीही झोप येत नाही, अशांना औषधांचा पर्याय हमखास ठेवला जातो. प्रत्येक केसेसनुसार निद्रानाशाची समस्या वेगळी असते.
प्रत्येकाचीच निद्रानाशाची समस्या गंभीर स्वरूपाची असतेच असे नाही. कित्येकदा ७०हून अधिक निद्रानाशाचे रुग्ण अल्पावधीत बरे होतात. उर्वरित ३० टक्के रुग्णांना डिप्रेशन, वैफल्य, वाढता मानसिक ताण आदींमुळे गंभीर स्वरूपाचा आजार जडण्याची भीती असते. यातील कित्येकांना औषधोपचाराचा सल्ला दिला जातो. मुळातच निद्रानाश हा चुकीच्या जीवनशैलीमुळे जडलेला आजार असल्याचं यापूर्वीही सांगितलं गेलं आहे. त्यामुळे निद्रानाश ओळखणं महत्त्वाचं ठरतं.
- वेळेवर झोप न लागणं
- अर्धवट झोप होत पुन्हा झोप न लागणं
खरं तर मेंदूपासून शरीरातील इतर अवयवांना काही काळासाठी आराम देण्यासाठी किमान आठ तासांची झोप मिळणं आवश्यक असतं. मात्र, कमी तासांची मोडततोडत घेतलेली झोप मुंबईत प्रामुख्याने निद्रानाशाला आमंत्रण देत असल्याचं डॉक्टरांचं निरीक्षण आहे.