प्रेम विवाहाला लिव्हइन वातावरणाची नजर लागली का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत...
  • एकमेकांवर प्रेम असूनही विवाह होत नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात तरुणाई लिव्हइन रिलेशनशिपकडे वळली आहे. 

मुंबई : बहुसंख्य तरुणाई प्रेम विवाहाकडे आदर्श नजरेने पाहते, मात्र समाजात आजही प्रेम विवाहाला मान्यता दिली जात नाही. एकमेकांवर प्रेम असूनही विवाह होत नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात तरुणाई लिव्हइन रिलेशनशिपकडे वळली आहे. 'प्रेम विवाहाला, आजच्या लिव्हइन वातावरणाची नजर लागली का? प्रेमविवाह, लिव्हइन याकडे तुम्ही कसे पाहता?' या विषयावर 'यिनबझ'च्या अनेक ग्रुपमध्ये तरूणांनी आज मनसोक्त चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मते आणि प्रतिक्रिया आम्ही येथे देत आहोत.

विविधतेने नटलेल्या आणि एकोप्याने राहत असलेल्या भारतीय समाजात आजही लग्न ही गोष्ट जातीव्यवस्थेत अडकली आहे. समाज प्रगत झाला असलातरी आंतरजातीय विवाह केल्यानंतर होणा-या घटना आजही थांबलेल्या नाहीत. लिव्ह इन समजायला आणि समजून घ्यायला आपल्या समाजाला अजून अनेक वर्षे लागतील.
- महेश घोलप

भारतीय समाजात विवाहाला एक संस्कार मानलं गेलं आहे. जो वयाच्या एका टप्प्यात होणे गरजेचे मानले गेले होते. पूर्वापार आलेल्या परंपरेनुसार घरातील वयस्कर मंडळी लग्न जुळवून आणत असतं पण, बदलेल्या काळानुसार अन् झालेल्या जगतिकरणामुळे इतर संस्कृती आपण स्वीकारली. अगदी प्लेटमध्ये असलेल्या चायनीज पासून पोशाखमध्ये असलेली जीन्स, किंवा 14 तारखेला साजरा केला व्हॅलेन्टाईन दिवस असो. या सर्व सांस्कृतिक गोष्टींना आपण आपला एक भाग मानला आहे. मानसशास्त्र मध्ये एक टर्म आहे ज्यामध्ये अस सांगितलं जातं की, जी गोष्ट आपल्याला सोपी दिसते ज्याचं अनुकरण केल्यावर आपल्याला एका प्रकारचा आनंद मिळतो. अश्या गोष्टींचा स्वीकार आपण अगदी सहज करतो. यामध्ये दोन युगुलामधील प्रेम असो वा हळूहळू उदयास येणारी लिव्ह इन रिलेशनशिप ची गोष्ट. बॉलिवूड सिनेमांचा आपण प्रवास पहिला तर प्रेम या गोष्टीला त्याने सहज स्वीकारले होते. जे जनमानसात अगदी मोकळेपणाने रुजलं गेलं. त्याप्रमाणे लिव्ह इन देखील आताच्या सिनेमात आपल्याला सहज दिसतं. तरुणांनी लिव्ह इन रिलेशनशिपला स्वीकारलं आहे, पण अजूनही एक वर्ग असा आहे ज्याना हे त्यांच्या तार्किक बुद्धीच्या पलीकडचं वाटत पण येणाऱ्या काळात लिव्ह इन देखील आपल्या समाजात रुजालेलं पाहायला मिळेल. हे निश्चित असेल
- विनायक पाटील

समाजामध्ये आजच्या काळात दोन प्रकारची लोक आहेत. एक नकारार्थी आणि दोन होकारार्थी. प्रेम विवाह म्हटलं की त्यावर विविध तर्क- वितर्क लावल्या जाते. त्या लावलेल्या तर्क - वितर्कांमुळे एका मुलींच्या व मुलांच्या वडीलधाऱ्या माणसांची समाजामध्ये होणारी नामुष्की ही फार मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे प्रेम विवाहाला आपल्या समाजामध्ये पाहिजे तसे स्थान दिल्या जात नाही. प्रेम विवाह करणे हा योग्य पर्याय आहे. कारण ज्या व्यक्तींना आपण कधीच ओळखत नव्हती अशा व्यक्तीसोबत पूर्ण आयुष्य काढणे कठीण आहे. हुंड्याची मोठ्या प्रमाणात होणारी मागणी त्यातून मुलींच्या वडिलांची होणारी आर्थिक पिळवणूक त्या नंतर त्यांच्या मध्ये निर्माण होणारे वाद. घटस्फोटाचे वाढते प्रमाण त्यामुळे त्यांच्या मुलांचे होणारे नुकसान अश्या विविध कारणांमुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्याला तोंड देण्या पेक्षा प्रेम विवाह करणे कधी चांगले. परंतु, समाजाचा पाहन्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जणजागृती करावी लागेल, तेव्हाच हे यशस्वी होऊ शकते.
-आकाश चिंचोलकर

प्रेम विवाह बद्दल बोलायचे झाले तर, आजच्या काळात ही पहिल्यासारखी फार मोठी गोष्ट राहिली नाही. पिढी बदलत आहे आणि त्यानुसार स्थितीसुद्धा. पाहिला प्रश्न प्रेम विवाहाला लिव्हइनची नजर लागली आहे का? तर मला वाटत नाही. कारण लिव्हीइन हा तसा खूप जुना प्रकार आहे. पण सध्या आपण त्याला थोड्या नियम व अटी घालून मॉडर्न बनवला आहे. जुन्या काळी लिव्हइन हा प्रकार उपभोग आणि इतर काही गरजा पूर्ण करण्यासाठी केला जायचा. त्यावेळी ते प्रेम असते का नसते हे ज्यांच्या त्यांच्या मानसिकतेचा प्रश्न असेल. त्यावेळी लिव्हइन हा समजातील नियम पाळून असायचा बहुदा. आजचे लिव्हइन तेच नियम न पाळता करण्यासाठी असावा. जात पात वेगळी असेल आणि प्रेम विवाहाला मान्यता नसेल तर खूपदा आजकाल लिव्ह इन कडे पिढी वळते. पण ज्या स्वावलंबी आहेत. असेच लोक अश्या प्रकारे जगणं पसंद करत असतील. काही लिव्हइन एकमेकांना पूर्ण ओळखण्यासाठी सुद्धा असतात. जे ठराविक नियम पाळून काही कालावधीसाठी करतात. तर प्रेमविवाह याला लिव्हइन याची नजर अजिबात लागली नाही कारण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाला काय आवडेल हे तो करेल. या गोष्टीवर तिसरी बाजू म्हणून आपण निर्णय देणे चुकीचे ठरेल.

प्रेमविवाह, लिव्हइन या गोष्टी आजच्या काळात तश्या काही प्रमाणात योग्यच आहेत. जुन्या काळी एकत्र कुटुंब असल्यामुळे आणि एकमेकांना सांभाळून घेत असल्यामुळे तश्या पद्धतीची लग्न टिकत होती. आजच्या काळात प्रत्येक जण स्वत: च्या आयुष्यात व्यस्त आहे. मग अश्या लोकांसाठी प्रेम विवाह चांगला पर्याय आहे. कारण पुन्हा त्यांनी कोणावर आरोप ठेवू नये की, याकामामुळे एकमेकांना वेळ न देता आल्यामुळे पटत नाही. लिव्हइन हा पर्याय कुटुंबासोबत वापरता येत असेल तर चांगलेच आहे. कुटुंबाला पण समजेल यांचे जुळेल का नाही ते..? शेवटी हा विषय नाजून, तसेच तुमची पात्रता, कुटुंबाची वैचारिक पातळी यावर अवलंबून आहे. की तो योग्य ठरले का अयोग्य.
- शंभूराज पाटील

प्रेम कधी चंद्रावर जातं. तर कधी तारे तोंडून आणत. हो म्हणूनच तर ते प्रेम असतं. खूप कमी लोकं. आहेत जे प्रेमात पडले नसतील. प्रेमात पडणं सोप्पं आहे पण खरंच. ते निभावणं अवघड आहे. काहींचे विवाह होतात तर काहींच प्रेम त्यांच्या पुरतेच मर्यादित राहते. प्रेम विवाहाला अजून तरी म्हणावी तशी पसंती मिळतेच अस नाही. एखादयाच्या मुला मुलीने प्रेम विवाह केला म्हणजे त्याने नाक कापलं. असाच बऱ्याचदा आरोप होतो. अमुक मुलगी अमुक मुला बरोबर पळून गेली की तिच्या घरच्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो. विशेषतः मुलींच्या आई वडिलांना. खूप मुलं मुली घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्न देखील करतात. पण पुढे जाऊन काही जोडप्यांना पश्चाताप सुद्धा होतो. कारण ऐन करिअरच्या वेळी लग्न करून बसतात. काही जोडपी सुखाने नांदतात. मुलांनीही लग्न करताना हा जरूर विचार करावा की मी ह्या मुलीचा सांभाळ करू शकेल की नाही जर ती तीच घरदार सोडून तुमच्या बरोबर येत असेल तर आणि मुलीनेही नुसतं प्रेम झालाय म्हणून उतावळा नवरा आणि गुढग्याला बाशिंग अस न करता. तो मुलगा खरचं आपला सांभाळ करेल का हा देखील विचार करावा. खूप जोडपी आज खांद्याला खांदा लावून काम करतायेत. लिव्हिंन ही संकल्पना जरी काही तरुणांनी स्वीकारली असली तरी ती रुजेल अस देखील नाही.
- संदिप सुखदेव पालवे

मुळात आजकालच्या प्रेम करणाऱ्या प्रेमयुगुलांचाच प्रेमाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला आहे प्रेम हे निस्वार्थ असत पण आजकालच प्रेम हे स्वार्थी झालेलं आहे एखादं जोडपं अस असत की तिथे मुलगा खुप खर्च करतो आपल्या प्रेयसीसाठी कारण ती खुश राहावी म्हणून पण ती फक्त त्याचा वापर करून घेते आणि एखादं जोडपं अस पण असत जिथे प्रेयसी भरपूर प्रेम करते त्याच्यासाठी वाट्टेल ते करते पण प्रियकर फक्त आपला स्वार्थ साधून घेत असतो. कॉलेजवयीन जीवनातील प्रेम देखील असंच झालेलं आहे आणि चुकून एखादं जोडपं खरं प्रेम करून एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांना त्यांचे आईवडील आडवं येतात आणि झालंच लग्न तर ते जास्त काळ टिकत नाही एखादं अपवाद वगळता.
- श्रीकांत जाधव

प्रेमाविवाहाला कधी लिव्हइनची गरज भासने हेच मुळात चुकीचं आहे. प्रेम म्हणजे दोन मनांचं एक होणं. त्यासाठी लग्नाआधी संबंध ठेवणे हे महत्त्वाचे नसते. पण आजची तरुण पिढी प्रेमाला लिव्हइन समजून पुढे जात आहे, हे खूप चुकीचं आहे ही आपली संस्कृती नाही आहे. प्रेम म्हणजे कोणताही मोह, भीती, राग, लोभ न ठेवता जोडले गेलेले संबंध. पण या लिव्हइन मध्ये तर पूर्णच उलट आहे. त्यामुळे तरुण पिढीने लिव्हइन आणि प्रेम यांना एक न करता प्रेमविवाह करावा. लिव्हइन पासून लांबच राहावे.
-दौलत कणबरकर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News