एक महिना बंद असलेले डायलिसिस सेंटर रुग्णांच्या सेवेत दाखल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 April 2020

उपचारांसाठी आलेला रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समजल्यानंतर हा विभाग बंद करण्यात आला होता.

मुंबई : भायखळा येथील जे. जे. रुग्णालयातील डायलिसिस सेंटर मंगळवारी (ता. 28) पुन्हा सुरू झाले. सकाळपासून 4 रुग्णांवर डायलिसिस करण्यात आल्याची माहिती नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. गीता शेठ यांनी दिली. उपचारांसाठी आलेला रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समजल्यानंतर हा विभाग बंद करण्यात आला होता. तब्बल एक महिना या रुग्णावर उपचार सुरू होते. उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्यामुळे डायलिसिस बंद करून त्याला घरी पाठवण्यात आले. त्यानंतर हा रुग्ण कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचे समजले.

भायखळा येथील जे. जे. रुग्णालयात काही दिवसांपूर्वी 55 वर्षांचा रुग्ण दाखल झाला होता. किडनीच्या आजाराचे निदान झाल्यामुळे त्याला नेफ्रोलॉजी विभागात दाखल करण्यात आले. 16 मार्च ते 16 एप्रिलदरम्यान त्याच्यावर 14 वेळा हिमोडायलिसिस करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्याला 17 एप्रिलला घरी पाठवण्यात आले. त्यानंतर हा रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले डॉक्‍टर्स, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्डबॉय व सफाई कामगारांची कोव्हिड चाचणी करण्यात आली.

दोन कर्मचाऱ्यांना लागण

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या चाचणीचा अहवाल 21 एप्रिलला मिळाला. त्यापैकी एक वॉर्डबॉय आणि एक सफाई कामगार अशा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. या विभागाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी 21 ते 24 एप्रिलदरम्यान फ्युमिगेशन करण्यात आले. या काळात फक्त अत्यावश्‍यक रुग्णांचे डायलिसिस केले जात होते. त्यानंतर 27 एप्रिलला इतर तंत्रज्ञांची पुन्हा कोव्हिड चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर डायलिसिस विभाग पूर्ववत सुरू करण्यात आला आहे, असे नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. गीता शेठ यांनी सांगितले.

डायलिसिस विभाग 23 एप्रिलपासून फक्त अत्यावश्‍यक रुग्णांसाठी सुरू होता. सोमवारी कोरोना चाचणी केलेल्या तंत्रज्ञांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता हा विभाग पूर्ववत सुरू झाला आहे. मंगळवारी सकाळपासून 4 रुग्णांचे डायलिसिस करण्यात आले आहे.
- डॉ. गीता शेठ, नेफ्रोलॉजी विभागप्रमुख, जे. जे. रुग्णालय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News