#DhoniKeepTheGlove - लॉर्डसवर पुश-अप्स काढलेल्या पाक संघाला कोणती शिक्षा?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • सुमारे दोन वर्षांपूर्वीचा हा प्रसंग आठवण्याचे कारण खरे तर वेगळे सांगण्याची गरज नाही.
  • इंग्लंडमधील क्रिकेट सामन्यांचा संदर्भ आणि त्यातील लष्कराशी संबंधित कृती असा विषय आहे.

दिनांक - 14 जुलै 2016 
स्थळ - लॉर्डस क्रिकेट ग्राउंड 
प्रसंग - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कसोटी क्रिकेट सामना 
दृश्‍य - पाकिस्तानचा फलंदाज मिस्बा उल हक याने शतक काढले. त्यानंतर त्याने दहा पुश-अप्स काढल्या.
संदर्भ - या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने अब्बोटाबाद येथील काकूल आर्मी स्कूलमध्ये बूट कॅम्पमध्ये भाग घेतला होता. 

उद्देश - उपजत गुणवत्तेची देणगी लाभली असली तरी फिटनेसचा अभाव आणि गचाळ क्षेत्ररक्षणामुळे त्यास पूर्ण न्याय देता येत नाही. या आघाडीवर मोर्चेबांधणी म्हणून पाकिस्तानी क्रिकेट मंडळाच्या पुढाकाराने कॅम्पचे आयोजन 
प्रसंग दुसरा - 17 जुलै 2016 रोजी चौथ्याच दिवशी पाकिस्तानने 75 धावांनी कसोटी जिंकली. चार कसोटींच्या मालिकेत पाकने 1-0 अशी आघाडी घेतली. विजयानंतर पाकिस्तानच्या संघातील सर्व खेळाडूंनी दहा पुश-अप्स काढल्या

सुमारे दोन वर्षांपूर्वीचा हा प्रसंग आठवण्याचे कारण खरे तर वेगळे सांगण्याची गरज नाही. इंग्लंडमधील क्रिकेट सामन्यांचा संदर्भ आणि त्यातील लष्कराशी संबंधित कृती असा विषय आहे. पाकिस्तानने सरस पूर्वतयारीच्या जोरावर सरस कामगिरी करून इंग्लंडला लॉर्डसवर हरविले. त्यावेळी त्यांच्या अशा सेलिब्रेशनचे इंग्लंड क्रिकेट मंडळाने सुद्धा कौतुक केले होते. त्यावेळी मिस्बा शतकानंतर म्हणाला होता की, अब्बोटाबादमधील कॅम्पदरम्यान माझी जवानांशी चांगली दोस्ती झाली. इंग्लंडमध्ये शतक काढले तर तुमच्याप्रती आदर म्हणून मी दहा पुश-अप्स काढेन असे प्रॉमिसच मी त्यांना दिले होते. सुदैवाने लॉर्डसवर मी शतक झळकाविले. मग मी माझे प्रॉमिस पूर्ण केले. 

मिस्बाने नंतर सलाम सुद्धा ठोकला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने विजय मिळविला तेव्हा पुश-अप्स काढल्यानंतर सलाम ठोकला होता. तेव्हा पाक संघाची तंदुरुस्तीच्या पातळीवर प्रगती कौतुकास्पद ठरली होती. 

तेव्हा इंग्लंडच्या संघाने पाकच्या कृतीला आक्षेप घेतला नव्हता. कारण त्यामागे राजकारण नव्हते. हेच जेव्हा भारताचा संदर्भ येतो तेव्हा मात्र भूमिका बदलते. आयसीसी चूक की बरोबर हे ठरविण्याचा आपल्याला अधिकार नाही. आयसीसीला जाब विचारण्याचा अधिकार मात्र नक्कीच आहे. वकील जुन्या संदर्भांचे दाखले, आधीच्या प्रकरणांतील न्यायालयाने दिलेले निकाल, त्याविषयी घेतलेली भूमिका, असे निकष लावून खटले लढवीत असतात. काळ जसा पुढे सरकतो तसे जुन्या संदर्भांचे नवे अर्थ लावले जातात. धोनीच्या सन्मानचिन्हाच्या वादानंतर एक भारतीय म्हणून असे संदर्भ देणे आणि चर्चा घडवून आणणे ही कृती देशभक्तीचीच ठरावी. 

लष्कराविषयी आदर म्हणून तसेच त्यांच्याविषयी सन्मानाची कृती म्हणून एखादा संघ फार पूर्वी नाही, पण दोनच वर्षांपूर्वी अशी कृती करतो तेव्हा आयसीसी त्याची दखल घेत नाही. आता जर आयसीसीने धोनीला नुसता ग्लोव्हजवरील लोगो काढून टाकावासा सांगत असेल तर मग कुणी कोर्टात धाव घेऊन मिस्बा आणि कंपनीच्या कृतीविषयी आक्षेप घेतला आणि त्यांना दहा उठाबशा काढायला सांगा अशी याचिका दाखल केली तर...तर आयसीसी काय निर्णय घेणार... 

आपण भारतीय आहोत. आपल्या देशात लोकशाही आहे. जेथे मुळातच व्यक्तिस्वातंत्र्य आहे आणि त्याही पुढे जाऊन आपण क्रिकेटप्रेमी असू तर व्यक्तीस्वातंत्र्याचा स्ट्राईक रेट वाढतोच...असे असताना चर्चा करून जाब विचारणे समयोचितच ठरावे.... 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News