९० टक्क्यांहून अधिक गुण असून देखील ‘या' कारणामुळे प्रवेशाचा मार्ग खडतर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 July 2020
  • ज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल गुरुवारी १६ जुलैला जाहीर झाला.
  • या निकालात ९० टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे.

मुंबई :-  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल गुरुवारी १६ जुलैला जाहीर झाला. या निकालात ९० टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. तसेच सीबीएसई आणि आयएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांचीही ९० टक्केहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ पाहावयास मिळणार आहे. यातच कोरोनामुळे परदेशी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थीही राज्यात प्रवेशासाठी इच्छुक असल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मोठी स्पर्धा रंगणार आहे.

राज्य मंडळाच्या बारावीच्या निकालात मुंबईत ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ४० टक्‍क्‍यांनी वाढले आहे. याचबरोबर राज्यात हे प्रमाण ६५ टक्के वाढले आहे. तसेच सीबीएसई आणि आयसीएस मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये ९५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमालीची वाढली आहे. यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थांमध्ये मोठी चढाओढ पाहावयास मिळेल, अशी भीती व्यक्त होत आहे. शहरातील अनेक नामांकित महाविद्यालयांचे निकाल १०० टक्के लागले आहेत; तर काही महाविद्यालयांचे निकाल ९० टक्के लागले आहेत. या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित आहेतच; मात्र बाहेरील विद्यार्थ्यांना फारशी संधी मिळणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे; मात्र जसे इंजिनिअरिंग आणि मेडिकलची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल तसे विद्यार्थी इतर अभ्यासक्रमांकडे वळतील. त्यामुळे दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी कट ऑफ नक्कीच खाली येतील असे एका प्राचार्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी परदेशात जातात. यंदा कोरोनामुळे हे विद्यार्थीही येथेच प्रवेश घेतील, अशी आता तरी परिस्थिती दिसत आहे. यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशात चांगलीच चढाओढ होईल, असेही प्राचार्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News