दिल्लीतील कचऱ्याची उंची ताजमहालाएवढी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या राजधानी नवी दिल्लीत कचऱ्याचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

नवी दिल्ली - जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या राजधानी नवी दिल्लीत कचऱ्याचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीतील गाझीपूर कचरा डेपोमधील कचऱ्याचे ढीग उंचीच्या बाबतीत ताजमहाललाही लवकरच मागे टाकतील, असे चित्र आहे.

दिल्लीच्या पूर्व भागात गाझीपूर कचरा डेपो आहे. या डेपोचा विस्तार चाळीस फुटबॉल मैदानांइतका मोठा आहे. येथील कचऱ्याच्या ढिगाच्या उंचीत दरवर्षी दहा मीटरने वाढ होते. अशी भयावह परिस्थिती असूनही यात सुधारणा होण्याची शक्‍यता सध्या तरी दिसत नाही. सध्या या ढिगाची उंची २१३ फूट झाली म्हणजे ६५ मीटर झाली आहे. ताजमहालची उंची ७३ मीटर आहे. कचऱ्यामध्ये होणारी वाढ लक्षात घेता पुढील वर्षापर्यंत हे कचऱ्याचे ढीग ताजमहालापेक्षा अधिक उंचीचे असतील. या परिसराच्या जवळून जाणाऱ्या जेट विमानांना धोका पोचू नये म्हणून या ढिगांवर इशाऱ्याचे लाल दिवे लागण्याचे आदेश गेल्याच वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 

गाझीपूर कचरा डेपोमध्ये दररोज सुमारे दोन हजार टन कचरा टाकला जातो. गेल्या वर्षी पावसामुळे कचऱ्याचा एक ढीग कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही या जागेला दुसरा पर्याय शोधता आलेला नाही. या कचऱ्यातून निघणाऱ्या मिथेन वायूमुळे येथे वारंवार आग लागण्याचे प्रकारही घडतात. शिवाय, या वायूमुळे हवाही मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊन श्‍वसनाचे विकार बळावत आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News