पदवी अभ्यासक्रमांना आंतरवासिता सक्तीची विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 August 2020
  • पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण द्यावे लागत असल्याची ओरड उद्योगांकडून सातत्याने होत असते.
  • या विद्यार्थ्यांनाही नोकरीचा अनुभव यावा, या उद्देशाने या अभ्यासक्रमांमध्ये आंतरवासिता (इंटर्नशिप) सक्तीची करण्यात येणार आहे.

मुंबई :-  पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण द्यावे लागत असल्याची ओरड उद्योगांकडून सातत्याने होत असते. या विद्यार्थ्यांनाही नोकरीचा अनुभव यावा, या उद्देशाने या अभ्यासक्रमांमध्ये आंतरवासिता (इंटर्नशिप) सक्तीची करण्यात येणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) नुकत्याच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

सध्या केवळ अभियांत्रिकी, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता सक्तीची करण्यात आली आहे. मात्र प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान या पदवी अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना आंतरवासितेची संधी मिळत नाही. नवीन शिक्षण धोरणात याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार विद्यापीठांना अभ्यासक्रमात एक पूर्ण सत्र हे आंतरवासितेसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर याच्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे, अशी सूचनाही केली आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी २० टक्के क्रेडिट देण्याच्या सूचनाही यात करण्यात आल्या आहेत.
 

कंपन्यांशी सामंजस्य करार करावेत

दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे व ते नोकरीस सक्षम व्हावे, या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. यासाठी उद्योगांचे विचारही लक्षात घ्याव्यात, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ही आंतरवासिता कोणत्याही स्थितीत महाविद्यालयांच्या परिसरामध्ये न होता कंपन्यांमध्ये व्हावी, अशी सूचनाही यात केली आहे. यासाठी शैक्षणिक संस्थांनी कंपन्यांशी सामंजस्य करार करावेत, अशी सूचनाही यात देण्यात आली आहे. याचे मूल्यमापन करताना कंपनीकडून येणारे मूल्यांकनही विचारात घ्यावे, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News