भारतीय खो-खो महासंघाच्या कार्यकारिणी समितीचा एक राज्य, एक मत हा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 August 2020
  • महाराष्ट्राच्या संघाबरोबरच विदर्भ, कोल्हापूर यांचेही संघ राष्ट्रीय स्पर्धेत असतील, असे भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सिधांशू मित्तल यांनी सांगितले.

मुंबई:  भारतीय खो-खो महासंघाच्या कार्यकारिणी समितीने एक राज्य, एक मत हा निर्णय घेतला आहे; पण त्याचा खेळाडूंवर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्राच्या संघाबरोबरच विदर्भ, कोल्हापूर यांचेही संघ राष्ट्रीय स्पर्धेत असतील, असे भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सिधांशू मित्तल यांनी सांगितले.

दिल्ली उच्च न्यायालयाने देशातील 57 क्रीडा महासंघांची संलग्नता सध्या रद्द केली आहे. ही संलग्नता परत मिळवण्यासाठी देशातील क्रीडा महासंघ क्रीडा आचारसंहितेनुसार घटनेत बदल करीत आहेत. खो-खो महासंघानेही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
खो-खो या मराठमोळ्या खेळात महाराष्ट्रातून "महाराष्ट्र', "विदर्भ' आणि "कोल्हापूर' हे तीन संघ खेळतात. "एक राज्य- एक संघटना- एक मत' या नियमाची अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्राचा एकच संघ होईल. त्याचा फटका राज्यातील खेळाडूंना बसेल; मात्र महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोल्हापूर यांच्याबरोबरच मध्य प्रदेशातील मध्य भारतला सहयोगी सदस्यत्व देता येईल आणि त्यांचे संघ राष्ट्रीय स्पर्धेत स्वतंत्रपणे खेळू शकतील, असे भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष मित्तल यांनी "सकाळ'ला सांगितले. मित्तल हे भारतीय ऑलिंपिक संघटनेचेही उपाध्यक्ष आहेत.

"एक राज्य, एक मत' हा निर्णय झाला असला, तरी राष्ट्रीय स्पर्धेत सध्याप्रमाणे संघ खेळू शकतात. महाराष्ट्रातून सध्या एकंदर सहा मते आहेत, त्याऐवजी दोनच मते असतील; तर मध्य प्रदेशात चारऐवजी दोन मते असतील; मात्र खेळाडूंवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे मित्तल यांनी स्पष्ट केले.

एक राज्य, एक युनिटबाबत समिती
एक राज्य आणि एक युनिट तसेच क्रीडा आचारसंहितेच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल, असे भारतीय खो-खो महासंघाचे सचिव महेंद्र सिंह त्यागी यांनी सांगितले. आता महाराष्ट्र, कोल्हापूर आणि विदर्भ यांना आता एकत्रितपणे मताचा अधिकार असेल. त्यांना स्वतंत्र मतदान करता येणार नाही. ही समिती सहसदस्यत्वाबाबत निर्णय घेईल, त्याच वेळी देशाच्या घटनेपेक्षा काहीही मोठे असू शकत नाही, याकडेही आम्ही लक्ष देणार आहोत, असेही ते म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News