अंधारबन ट्रेक; बाजूला दरी.. वरुन पाऊस.. जंगलातून रस्ता!

अजिता मल्लाडे
Wednesday, 17 July 2019

चिखल तुडवत जाताना बुटांमध्ये पाणी जातंय या भावनेनेच कससंच होत होतं, पण काही वेळाने चिंब भिजून ओढ्यातून जाताना, झाडाझुडुपांतून वाट काढताना, निसरड्या पायवाटेवरून चालताना पायांचे अस्तित्वही जणू जाणवेनासे झाले.

अंधारबन... काळोखाचं जंगल... नावच अगदी रहस्यमय वाटावं असं.. ताम्हिणी घाट आणि कुंडलिका दरीच्या बाजूने जाणारा ट्रेक.. अंधारबनच्या पायथ्याशी असलेल्या पिंपरी गावातून चालायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा पुढ्यात काय वाढून ठेवलंय याची जराही कल्पना नव्हती. मान्सून ट्रेकला जाताना रेनकोट नाही, तर पावसात भिजत चालण्याची तयारी लागते हे नव्याने कळलं. पाऊस कधी रिमझिम तर कधी मुसळधार असतो, पण तो काटेरी पण असतो हे चालताना जेव्हा पावसाच्या थेंबांचा रपारप मारा बसत होता तेव्हा जाणवलं.

सुरुवातीला चिखल तुडवत जाताना बुटांमध्ये पाणी जातंय या भावनेनेच कससंच होत होतं, पण काही वेळाने चिंब भिजून ओढ्यातून जाताना, झाडाझुडुपांतून वाट काढताना, निसरड्या पायवाटेवरून चालताना पायांचे अस्तित्वही जणू जाणवेनासे झाले.

सगळंच खूप छान होतं, फक्त रविवार असल्यामुळे आमच्यासारखेच अनेक हौशी लोक (जवळपास १०००) तिकडे होते. त्यामुळे मध्ये चालताना १-१ पाऊल टाकायला १-१ मिनिट जात होता. मध्येच जोराचा पाऊस आल्यावर धबधब्याकडे जाण्यासाठी जवळपास तासभर वाट पाहावी लागली. मध्यंतरी हिमालयातील ट्रॅफिक जामचा फोटो व्हायरल झाला होता, तसाच आम्ही सह्याद्रीतील ट्रॅफिक जामचा अनुभव घेतला.

बरं, आपण गर्दीला नावेदेखील ठेवू शकत नाही कारण आपणही त्याच गर्दीचा एक हिस्सा असतो ना.. फक्त अशा ट्रेकला जाताना संपूर्ण तयारीनिशी जायला हवं आणि आपल्या मजामस्तीमुळे, फोटोशूटमुळे इतरांचा खोळंबा होत नाही ना याची दक्षता घेऊन लोकांनी वागायला हवं. 

असो! ती गर्दी, ते वाट बघणं या सगळ्याचं नंतर काही वाटलं नाही कारण निसर्गाचं इतकं सुंदर रूप सभोवताली होतं. आतापर्यंत धबधबा फक्त लांबून पाहिला होता पण धबधब्यावरून चालत जातोय ही भावनाच वेगळी होती.

एका बाजूला दरी, वरून बरसणारा पाऊस, जंगलातून जाणारा रस्ता, बेडकांचा आणि पक्ष्यांचा आवाज, धुक्याने भारलेलं वातावरण, खळाळणारा ओढा, नजर जावी तिकडे दिसणारे लहानमोठे धबधबे... स्वप्न आणि वास्तव यातली सीमा जणू धुसर झाली होती. कोणत्या तरी निसर्गचित्राचा आपण भाग आहोत किंवा 'टारझन', 'द जंगलबुक' यासारखा सिनेमा सुरु आहे अगदी तसं वाटत होतं . 

आणखी काय सांगू. काही क्षण हे कॅमेऱ्यात कैद करण्यापलीकडचे असतात, ते फक्त अनुभवायचे आणि मनात साठवून ठेवायचे. 

काही जागा अशा असतात जिथून तुम्ही फक्त शरीराने परत येता, पण तुमचं मन तिथेच मागे घुटमळत असतं आणि मग अशावेळी चालण्याचे कष्ट, ते भिजणं हे सगळं मागे पडतं आणि तो अनुभव आठवून वाटतं की याचसाठी केला होता अट्टहास!

Photos

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News