तणावमुक्तीसाठी नृत्यसाधना उत्तम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 April 2019

नृत्य सर्वोत्तम व्यायामप्रकार आहे, असे नकुल घाणेकर सांगतात. नृत्यामुळे मानसिक व शारीरिक संतुलन राखता येते. शास्त्रीय असो वा पाश्‍चात्त्य प्रत्येक नृत्यात शारीरिक व्यायाम होतो. पाश्‍चात्त्य नृत्यशैलीत स्नायू ताणले जाऊन मांड्या, पाय व कंबर यांचा व्यायाम होतो आणि शरीर लवचिक होते; तर कथ्थकमध्ये पायाच्या ‘ततकार’मुळे पाय खूप मजबूत होऊन शारीरिक क्षमता वाढते आणि देहबोली विकसित होते, असे नृत्याचे शारीरिक फायदे नकुल यांनी सांगितले.

मुंबई : नृत्य ही तणावमुक्तीची एक उत्तम साधना असून, त्याद्वारे मानसिक तणावावर मात करता येते. तुमचे थोडेसे जरी लक्ष विचलित झाले तरी त्याचा परिणाम नृत्यावर होतो. शास्त्रीय नृत्यातील या एकाग्रतेमुळेच आपण मनावरील ताण विसरून जातो आणि नृत्याला सर्वस्व अर्पण करतो, अशा शब्दांत आपल्या जीवनातील नृत्याचे महत्त्व शास्त्रीय व पाश्‍चात्त्य नृत्यकलाकार नकुल घाणेकर यांनी विशद केले. जागतिक नृत्य दिनानिमित्त नकुल घाणेकर यांच्याशी साधलेल्या संवादात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नृत्यप्रवासाविषयी नकुल सांगतात, ‘वयाच्या सात-आठ वर्षांपासून कथ्थक नृत्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर दहावीमध्ये असल्यापासून पाश्‍चात्त्य नृत्याकडे वळलो. त्यानंतर हिपहॉप, जॅझ, कन्टेम्परी आणि सालसा अशा सर्व पाश्‍चात्त्य नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर व्यावसायिक मंचांवर नृत्य करण्यास सुरुवात झाली. पाश्‍चात्य नृत्यप्रकारात सर्वांत जास्त आवडले ते सालसा नृत्य. सालसा-बचाटामध्ये पुढे शिकत गेलो. एमएस्सी सुरू असताना पुन्हा अपूर्ण राहिलेल्या कथ्थक शास्त्रीय नृत्याकडे वळून कथ्थक नृत्यांगना सोनिया परचुरे यांच्याकडे कथ्थक शिकण्यास सुरुवात केली.’

नृत्य ही व्यायामाची कला आहे. माझ्या आयुष्यात नृत्यकलेला फार महत्त्व असून, माझा सर्व जीवनक्रमच नृत्याभोवती फिरतो. या कलेतून मिळणाऱ्या आनंदाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. नृत्यामध्ये संगीत, गायन, वादन आदींचा अंतर्भाव असतो. त्यातून जो परिणाम साधला जातो, तो आध्यात्मिक अनुभव आहे. अभिजात असलेल्या नृत्यातील गर्भित पैलू आपल्याला नाचल्यावर कळतात, अशा शब्दांत नकुल यांनी नृत्याचे महत्त्व विशद केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News