बाबो! आयपीएलसाठी प्रति सेकंद १२ लाख रुपये जाहीरात दर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 5 July 2020
  • आयपीएलचे ब्रॉडकास्टर असलेल्या स्टार स्पोर्टस आणि डिस्ने इंडियाचे प्रमुख उदय शंकर यांची माहिती.

मुंबई : कोरोना महामारी आणि त्यामुळे आर्थिक क्षेत्रात आलेली मंदी याचा फटका सर्वांनाच बसला आहे. एरवी पैशाचा ओघ असलेल्या आयपीएलला आर्थिक पाठबळ देण्यासाठी यंदा मार्केटमध्ये निरुत्साह आहे, असे विधान आयपीएलचे ब्रॉडकास्टर असलेल्या स्टार स्पोर्टस आणि डिस्ने इंडियाचे प्रमुख असलेल्या उदय शंकर यांनी केले आहे.

पुढील दोन महिन्यातही या परिस्थितीत सुधारणा होणे कठीण असून आयपीएलचा यंदाचा मोसम झाला, तरी जाहिरातींमध्ये हजारो कोटींची उलाढाल होणे अशक्‍य असल्याचे उदय शंकर यांचे म्हणणे आहे. जाहिरातदार पैशाच्या थैल्या घेऊन उभे असणारी एकमेव स्पर्धा आयपीएल आहे. कारण स्पर्धेच्या लोकप्रियतेतून त्यांच्याही प्रोडक्‍टचे मार्केटिंग होत असते; परंतु कोरोनानंतर आलेल्या मंदीमुळे मार्केटला मोठा धक्का बसलेला आहे. पुढील काही महिन्यात परिस्थिती मूळ पदावर येण्याबाबत प्रत्येक कंपनी साशंक आहे, असे उदय शंकर यांनी सांगितले.

यंदा होते तीन हजार कोटींचे लक्ष्य

स्टार स्पोर्टस ने 2017 मध्ये पुढील पाच वर्षांसाठी आयपीएलच्या प्रक्षेपणाचे हक्क 16,347.5 कोटींनां मिळवले होते. एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार स्टार स्पोर्टसने पहिल्या दोन वर्षांत प्रत्येक मोसमासाठी 2000-2200 कोटींमध्ये उत्पन्न मिळवले आहे. 2020 च्या आयपीएलसाठी त्यांनी तीन हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते.

आयपीएल महागडी स्पर्धा आहे. प्रक्षेपणाचे हक्क मिळवण्यासाठी आम्ही मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीतून मोबदला मिळवण्यासाठी जाहिरातींचा ओघ कायम असणे आवश्‍यक आहे. पण सध्याची मार्केटची परिस्थिती पाहता यंदाच्या म्हणजेच 2020 च्या आयपीएलसाठी जाहिरातदार उत्सुक असतील का, याबाबत शंका आह. आता तर पावसाळा सुरू झाला आहे. मैदान आणि स्टेडियम उपलद्ध नाहीत. पावसाळा संपेल त्यावेळी कोरोनाही संपलेला असेल आणि त्यानंतर आपण नव्याने स्पर्धेचा विचार करू शकतो, असा आशावादही उदय शंकर यांनी व्यक्त केला.

कसे होते जाहिरात दराचे अर्थकारण

गत आयपीएलसाठी स्टार इंडियाने जाहिरात दर दहा सेकंदासाठी 11 ते 12 लाख रुपये इतका होता; तर यंदाच्या स्पर्धेसाठी 65 टक्के बुकिंग झाले होते. यंदाच्या दरात 10 ते 12 टक्के वाढही करण्यात आली होती. ड्रिम इलेव्हन, बायजूस, विवो, फोनपे, एशियन पेंटस्‌ यांच्यासह खाताबुक, ऍमेझॉन यांनी इच्छा दर्शवली होती; परंतु सध्याच्या परिस्थितीत काही कंपन्यांनी अगोदरच माघार घेतल्याचेही वृत्त आहे.

मुळात यंदाची आयपीएल होईल की नाही, हे आत्ताच सांगता येणार नाही. बीसीसीआयही सर्व प्रयत्न करत आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत; परंतु पूर्ण सुरक्षा असेल तरच आयपीएल होऊ शकते.
- उदय शंकर, स्टार इंडियाचे प्रमुख

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News