रडणारे पांडव... 

संदीप काळे
Sunday, 22 September 2019

पाचही जणांच्या राहत असलेल्या खोलीपासून अगदी जवळ असलेली पांडवलेणी. याच ठिकाणी हे पाचही जण रोज सकाळी सात वाजता भेटायचे म्हणजे भेटायचेच. आजची ही त्यांची शेवटची भेट होती, म्हणून रोज गडबडीनं निघणारी पावलं आज मात्र या लेण्यांजवळून हलत नव्हती. त्यांच्याकडचे सर्व पर्याय आता संपले होते. रोज हसत राहणाऱ्या या पांडवांवर आज मात्र अश्रूभरल्या नयनांनी एकमेकांना ‘अलविदा’ म्हणायची वेळ आली होती. केवळ पांडव लेण्यांच्या सान्निध्यात वाढणाऱ्या या पांडवांच्याच डोळ्यात अश्रू नव्हते; तर मंदीच्या आगीत होरपळून निघणाऱ्या प्रत्येकावरच आज रडण्याची वेळ आली होती.

भटकंती ही माझ्या व्यवसायाला पूरक अशी गोष्ट. प्रत्येक गावाचं एक टेक्‍श्चर असतं अन्‌ माणसांचंही. एकदा हे वाचायची सवय लागली म्हणजे शहरं, माणसं आपसूक उमजायला लागतात, ओळखीची होतात, मनात उतरतात अन्‌ कागदावरही. त्या दिवशी सकाळी सहा वाजता माझी नाशिकची सकाळ पावसाच्या स्वागतानं सुरू झाली. सातपुऱ्यात आमचं ‘सकाळ’चं देखणं ऑफिस आहे. त्याच्या बाजूला मी राहायला होतो. तिथून मी नाशिकमधलं भुरळ घालणारं वातावरण डोळ्यांत साठवून पुढं पुढं जात होतो. माझा लहान भाऊ परमेश्वरनं मला पांडव लेण्यांच्या पायथ्याला आपल्या गाडीतून सोडलं आणि तो जॉबसाठी आपल्या वाटेनं परत निघाला. एकेक पायरी चढत वर लेण्यांपर्यंत पोचलो.

अत्यंत मोहक असं इथलं वातावरण. अत्यंत कोरीव, रेखीव काम आणि जबरदस्त कारागिरी या लेण्यांच्या प्रत्येक दगडावर जणू बोलत होती. स्वच्छ आभाळ आणि झाडांच्या दोन फांदीमधनं दिसणारं नाशिक आजही माझ्या डोळ्यांसमोरून जात नाही. आपल्या आसपास असणाऱ्या प्रत्येक शहरामध्ये असं वेगळेपण आहेच आहे, फक्त आपण ते अनुभवत नाही आणि सौंदर्याच्या दृष्टीनं पाहत नाही, हे खरं आहे. लेण्यांच्या वरच्या बाजूनं खाली ठिबकणाऱ्या पाण्यामुळं लेण्यांचं सौंदर्य अजून खुलून दिसत होतं. त्या काळातल्या लेण्यांच्या कलाकृतीलाही लाजवेल असं ‘आय लव्ह यू’, आपल्या प्रियसीचं नाव वगैरे ‘कोरीव काम’ प्रेमी युगुलांनी तिथं केलं होतं. आपल्या प्रेयसीच्या विरहाचा सगळा राग त्यांनी त्या कोरीव दगडांवर काढून आपणही एक वेगळे कलाकार आहोत, हे दाखवून दिलं होतं. थोड्या अंतरावर दोन वेगळी जोडपी मला पाहायला मिळाली. एक जोडपं तरुण होतं; ज्यामध्ये मुलगा मुलीचे वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढण्यात दंग होता; तर दुसऱ्या जोडप्यामध्ये एक आजी आपल्या नवऱ्याला ‘मला बरोबर येऊ द्या की’ म्हणून हाक मारत होती. निसर्गाच्या सान्निध्यात वावरणाऱ्या या दोन जोडप्यांच्या वर्तनातून काळाचा महिमा कसा अजब असतो, हे दिसत होतं. तिथली लेणी, तिथल्या कलाकृती, शासनानं लावलेले वेगवेगळे बोर्ड मी सगळं बारकाईनं पाहत होतो, वाचत होतो. फोटो काढण्यासाठी नक्कीच कुणाची तरी मदत घ्यावी, या हेतूनं मी मान बाजूला वळवली. बाजूला पाच मुलं गप्पा मारत बसली होती. त्यांच्यापैकी एकाकडे बघत मी त्याला हाक मारली. ‘‘दादा, माझे फोटो आणि व्हिडिओ जरा शूट करता का?’’ मी ज्याला हाक मारली होती त्यानं दुसऱ्या मुलाकडं बघत इच्छा नसतानाही माझा मोबाईल हातात घेतला. मी शूटच्या माध्यमातून त्या लेण्यांचं महत्त्व, तरुणांनी इथं कसं यायला पाहिजे वगैरे बोलत होतो. माझं बोलणं संपल्यावर जो शूट करत होता त्यानं मोबाईल माझ्याकडं परत देत विचारलं : ‘‘सर, तुम्ही पत्रकार आहात काय? कुठल्या गावचे तुम्ही?’’ मी म्हणालो : ‘‘हो, मी मूळचा नांदेडचा; पण आता राहायला मुंबईला आहे.’’ त्याला मी विचारलं : ‘‘तुम्ही कुठले?’’ तर तो म्हणाला : ‘‘मी बीडचा.’’ मी परत म्हणालो : ‘‘अरे, आपण तर मराठवाड्यामधलेच. अहो, मग बीडचं म्हणा ना.’’ तो हसला. बीडच्या भाषेबद्दल मला जाण आहे, हे त्याच्या लक्षात आलं. त्याच्यासोबत असणाऱ्या इतर चार मित्रांची त्यानं ओळख करून दिली. सचिन जावळे जालन्याचा, विनोद राठोड नांदेडचा, मनोज परब बुलडाण्याचा, संतोष जायेभाये अकोल्याचा आणि जो माझ्याशी बोलत होता तो दीपक खरात बीडचा. हे पाचही जण मराठवाडा आणि विदर्भ इथले. साधे कपडे घातलेले, अत्यंत प्रामाणिक असलेले आणि गरिबीतून मिळालेल्या संस्काराची जबरदस्त झालर असलेली सगळी मंडळी. आम्ही सगळे जण तिथं बोलत बसलो.

बोलता बोलता मध्येच दीपक म्हणाला : ‘‘आजचं आपलं हे भेटणं इथलं हे शेवटचं असेल, नाही का?’’ दीपक असं बोलताना अत्यंत उत्साहानं बोलणारे सगळे जण एकदम शांत चेहऱ्यानं खाली माना घालून उदास होऊन बसले होते. मला काही कळलंच नाही. उत्साहानं बोलणारी मुलं, दीपकच्या या बोलण्यानं अचानक शांत का झाली? थोड्या वेळानं दीपकनं सगळ्यांची समजूत काढली आणि सगळे जण जरा रिलॅक्‍स झाले; पण तरीही सर्वांच्या मनावर एक दडपण कायम आहे, हे मला जाणवत होतं. आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि हळूहळू या दडपणाचं कारणही मला उलगडत गेलं. त्या सर्वांच्या गप्पांमधून आणि चर्चांमधून जे वास्तव आलं, ते फार धक्कादायक होतं. आज आपला देश, आपला महाराष्ट्र कुठल्या परिस्थितीतून जात असेल, याचं सगळं चित्र डोळ्यांसमोरून जात होतं.

सचिन नाशिकमधल्या एका कंपनीमध्ये इंजिनिअर आहे. विनोद आणि मनोज दोघं जण एका कंपनीमध्ये फिटर म्हणून काम करतात. संतोष आणि दीपक दोघं जण एका कंपनीमध्ये मदतनीस म्हणून काम करतात. एकाचा एक मित्र, दुसऱ्याचा दुसरा मित्र असं होत होत हे पाचही मित्र दोन वर्षांपासून एकत्र राहतात. पांडव लेण्यांच्या आसपासच ते जिथं काम करतात त्या कंपन्या आहेत. जिथं हे सगळे काम करतात, तिथून जवळच ते भाड्याच्या खोलीमध्ये राहतात. पाचही जणांना ‘या महिनाभरात तुम्हाला काम सोडावं लागेल, कंपनी आता तुम्हाला कामावर ठेवणार नाही,’ असं सांगण्यात आलं आहे. बरं, या बदल्यात कंपनी त्यांना काही रक्कम देणार नाही, त्यांना मोबदलाही मिळणार नाही. कंपनीनं फर्मान दिल्याला आज पंधरा दिवस झाले. या पंधरा दिवसांत आपल्याला काम मिळावं यासाठी या पाचही जणांनी अनेक कंपन्यांचे उंबरठे झिजवले; पण सगळीकडं भरती बंद; नाही तर ‘कंपनी बंद’ असे बोर्ड लागलेत. कंपन्या बंद झाल्यामुळं वस्त्याच्या वस्त्या रिकाम्या होऊ लागल्या आहेत. एक कंपनी बंद पडते, तेव्हा त्या कंपनीमध्ये काम करणारा माणूस बेरोजगार होणं एवढंच घडत नाही, तर त्या माणसाभोवती असणारी सगळी मोठी चेन कोलमडून पडते. कंपनीच्या परिसरात भाड्यानं मिळणारी घरं, किराणा दुकानं, भाड्यानं आणि विकत मिळणाऱ्या प्रत्येक वस्तू आणि त्या वस्तूंभोवती असणारं सगळं अर्थकारण कोलमडून पडतं. मी त्या दिवशी दिवसभर नाशिकमध्ये कोलमडलेल्या या अर्थशास्त्राचा अभ्यास करत होतो. तेव्हा माझ्यासमोर जे भयाण वास्तव आलं, ते आज मला कागदावर उतरवण्याची हिंमत होत नाही. मंदीच्या लाटेत नाशिकमध्ये या आठ महिन्यांत कित्येकांच्या नोकरीवर गंडांतर आलं असेल. कंपन्यांचं नुकसान किती कोटी रुपयांत होतंय, हे तर सांगायला नको. सरकारी ध्येयधोरणं, नोटाबंदी, जीएसटी, या सर्वांभोवती या नोकरकपातीचा आणि कंपनी बंदचा कुठं ना कुठं तरी संबंध जोडला गेला आहे. मला यातलं अर्थकारण कळत नाही; पण कुणाची तरी चूल पेटणं बंद झालं आहे, एवढं मात्र कळतं.

सचिन मला सांगत होता, की ‘‘दोन महिन्यांवर माझं लग्न येऊन ठेपलं होतं. मी इंजिनिअर आहे. मोठ्या शहरात राहतो, चांगल्या कंपनीमध्ये काम करतो, याची खात्री केल्यावर माझ्या लग्नाचं फिक्‍स झालं होतं; पण आता मी नोकरी करणार नाही, गावी परत येणार आहे, गावाकडल्या एकरभर शेतीवर मी उदरनिर्वाह करणार आहे, हे कळल्यावर मुलीनं मला लग्नासाठी नकार दिला. आता गावाकडं जायचं, तर कुठल्या तोंडानं जायचं आणि गावी जायचं नाही तर कुठं जायचं? हा प्रश्न मला भेडसावतोय.’’ सचिनच्या डोळ्यांमध्ये मला केवळ काळजी दिसत नव्हती; तर खूप मोठा आकांत घेऊन आलेला काळ दिसत होता. त्या काळाचं रूप एखाद्या अक्राळविक्राळ राक्षसासारखं मला दिसत होतं.

विनोद राठोडच्या घरी सहा लोकांचं कुटुंब. आई-वडील आणि तीन बहिणी. एक बारावीला शिकते आणि दुसरीचं लग्न ठरलंय. या सगळ्या लग्नाची आणि कुटुंबाची जबाबदारी विनोदवर. पोटाला चिमटा द्यायचा आणि कुटुंबासाठी सगळ्या पद्धतीचं कॉम्प्रमाईज करायचं. आपली सगळी स्वप्नं बाजूला ठेवून आधी बहिणींचा विचार करायचा. आता मात्र अवघड झालं आहे. सगळं काठावरती कसंतरी जमून येत असे. आता या मंदीनं काठांनाही जागा ठेवली नाही. महिनाभरापूर्वीच बहिणीच्या लग्नासाठी दिल्या जाणाऱ्या हुंड्याचे चाळीस हजार रुपये नवऱ्या मुलाकडं द्यायचे होते; पण आता हाताला काम नसल्यामुळं हे पैसे द्यायचे कुठून, असा प्रश्न सचिनसह त्याच्या आई-वडिलांना पडला होता. ‘‘तुम्ही दिलेला शब्द आणि वेळ पाळली नाही,’’ असं म्हणत मुलाकडच्यांनी विनोदच्या आई-वडिलांशी बोलणंही बंद केलं होतं. म्हणजे तसं लग्न मोडल्यातच जमा होतं, असं विनोद सांगत होता. त्याच्या दोन्ही लग्नाच्या बहिणींची त्याला काळजी वाटत होती.

दीपकसमोर एक मोठा प्रश्न होता. दीपकची आई नाशिकमध्ये एका वृद्धाश्रमात असते. दीपक काही कामानिमित्त आपल्या मित्रासोबत नाशिकला आला, त्यानंतर महिनाभरात त्याचे वडील गेले; त्यामुळं त्याच्या आईला सोबत घेऊन येण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता आणि दुसरा पर्याय तो एकत्र राहू शकत नव्हता. आता आईला घेऊन जायचं कुठं आणि खायचं काय, असा प्रश्न दीपकनंच मला विचारला होता. मी दीपक, सचिन, विनोदची समजूत काढत होतो. संतोष आणि मनोज हे दोघंही विवाहित. या वर्षी ते आपल्या कुटुंबाला नाशिक इथं घेऊन एकत्र राहण्याचं नियोजन करत होते; पण त्यांच्या या स्वप्नावरही पाणी पडलं होतं. या पाचही जणांच्या राहत असलेल्या खोलीपासून अगदी जवळ असलेली पांडवलेणी. याच ठिकाणी हे पाचही जण रोज सकाळी सात वाजता भेटायचे म्हणजे भेटायचेच. आजची ही त्यांची शेवटची भेट होती, म्हणून रोज गडबडीनं निघणारी पावलं आज मात्र या लेण्यांजवळून हलत नव्हती.त्यांच्याकडचे सर्व पर्याय आता संपले होते. पाचही जण भावनाविवश झाले, तेव्हा त्यांची समजूत काढताना मीही हतबल होऊन गेलो. दोन वर्षं सतत हसत-खेळत राहणारे हे पांडव, पांडव लेण्यांच्या सान्निध्यात रममाण झाले होते. रोज हसत राहणाऱ्या या पांडवांवर आज मात्र अश्रूभरल्या नयनांनी एकमेकांना ‘अलविदा’ म्हणायची वेळ आली होती. आज रडणाऱ्या पांडवांच्या अश्रूंना जबाबदार आहे तरी कोण, असा प्रश्न माझ्या मनाला पडला होता.

केवळ पांडव लेण्यांच्या सान्निध्यात वाढणाऱ्या या पांडवांच्याच डोळ्यात अश्रू नव्हते; तर मंदीच्या आगीत होरपळून निघणाऱ्या प्रत्येकावरच आज रडण्याची वेळ आली होती. जड पावलांनी ते पाचही जण माझ्यासमोरून निघून गेले; पण कालपर्यंत या पांडवांच्या हसण्याला प्रफुल्लित करणाऱ्या त्या लेण्यांवरून माझे पाय खाली उतरण्यासाठी धजत नव्हते. खाली पाहिलं, तर पांडवांच्या डोळ्यातील अश्रू मला दिसत होते आणि वर पाहिलं, तर कालचं त्यांचं हसरेपण माझ्यासमोर येत होतं. मी जड पावलांनी शहराकडे चालत राहिलो. जणू त्यांच्या गळ्यात दाटून आलेले कढ माझ्या पायातल्या बेड्याच बनल्या होत्या. शहरात आलो, तेव्हा सुरवातीला पावसाची ओल सोबत होती, अन्‌ आता ही ओल... पण दोन्हीत किती अंतर होतं नाही?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News