लॉकडाऊन काळात १ लाख १२ हजार जनांवर गुन्हे दाखल: अनिल देशमुख

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 23 May 2020

४ लाख ९७ हजार व्यक्ती काँरंटाईन; पोलिसांवर हल्ल्यांच्या २४६ घटना ८२७ व्यक्तींना अटक

मुंबई: राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १२ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २४६ घटना घडल्या. त्यात ८२७ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात २२ मार्च ते २२ मे या कालावधीत कलम १८८ नुसार  १, १२, ७२५ गुन्हे नोंद झाले असून २२, ७५३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी २२ लाख ९८ हजार ४७७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
         
१०० नंबरवर  तक्रारीचा भडिमार

पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात  या १०० नंबर वर प्रचंड भडिमार झाला . ९५, ४६७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ६८० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ४, ९७, ७०५ व्यक्ती Quarantine आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ४, १५, ५९१ पास देण्यात आले आहेत. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३१७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ६९, ४३५ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. 

पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष
  
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील १० पोलिस व १ अधिकारी असे एकूण  ११, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण १, ए.टी.एस. १ ठाणे शहर १ व  अशा १८ पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात सध्या १३२ पोलीस अधिकारी व ९९१ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. 
   
राज्यात एकूण १६८० रिलिफ कँम्प आहेत. तर जवळपास १,१६,७१७  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी.  त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.  लॉकडाऊनच्या काळात सर्व नियमांचे पालन करून कोरोनाशी मुकाबला करण्यास सहकार्य करावे. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. लॉकडाऊन मध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लॉकडाऊन संपले असे नाही. उलट या काळात  सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News