साताऱ्याचे औद्योगिक क्षेत्र दहशतीने अशांत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ )
Tuesday, 11 June 2019

क्रेडिट रेटिंग एजन्सींचा अहवाल; जिल्ह्याला सी (-) रेटिंग, मोठा उद्योग येण्याची चिन्हे पुन्हा धूसर 

सातारा: साताऱ्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळण्याऐवजी अधोगतीच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे. विविध क्रेडिट रेटिंग एजन्सींनी सातारा जिल्ह्याला सी(-) ग्रेड दिली आहे. त्यात जिल्ह्यात राजकीय दहशत असून, कामगार संघटनांच्या माध्यमातून राजकीय ढवळाढवळ होत असल्यामुळे औद्योगिक शांतता बिघडू शकते, असा शेरा या ग्रेडमध्ये मारण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात मोठा उद्योग येण्याची चिन्हे धूसर झाली आहेत. बिघडलेले हे वातावरण बदलून जिल्ह्याला पुन्हा एएए (+) ग्रेड मिळत नाही, तोपर्यंत जिल्ह्यात मोठा औद्योगिक प्रकल्प येऊ शकणार नाही. 

सातारा औद्योगिक वसाहत ही प्राथमिक स्तरावर औद्योगिकदृष्ट्या अत्यंत मोक्‍याची व चांगली आहे. जागा, लाइट, पाणी, दळणवळण, कामगार, कामगार संघटना तसेच मागील इतिहास, छोटे पूरक उद्योग या सर्व बाबतीत सल्लागार कंपन्यांनी अनुकूलता नोंदवली आहे. परंतु, राजकीय हस्तक्षेप व कामगारांना हाताशी धरून औद्योगिक शांतता बिघडू शकते. उत्पादन कायमस्वरूपी किंवा वर्षानुवर्षे बंद पडू शकते, असा नकारार्थी आणि अत्यंत घातक शेरा या सल्लागार कंपन्यांनी मारलेला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या औद्योगिक शांतता, उच्च राजकीय संबंध प्रस्थापित करून मिटवू शकतात. परंतु, साताऱ्याच्या बाबतीत स्थानिक स्तरावर चांगले राजकीय संबंध प्रस्थापित करून औद्योगिक कलह मिटवणे शक्‍य नाही. त्यामुळे तिरकस व नकारार्थी अहवाल असल्याने साताऱ्यात बहुराष्ट्रीय कंपन्या येण्यास धजावत नाहीत. 

जोपर्यंत आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपन्या साताऱ्यातील राजकीय हस्तक्षेपाबाबतचा सकारात्मक आणि अनुकूल अहवाल लिहित नाहीत, तोपर्यंत साताऱ्याचा औद्योगिक विकास होणे अशक्‍य आहे. त्यामुळे साताऱ्यात बहुराष्ट्रीय कंपन्या येऊन तरुणांना वारेमाप पगार मिळेल, ही बाब सत्यात उतरणे आता अवघड झाले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या आपला नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आवश्‍यक जागा, भविष्यात विस्तारीकरणासाठी जादा जागा, दळणवळणाची सोय (रस्ते, रेल्वे, विमान, जलमार्ग), पुरेसा वीज पुरवठा, मुबलक पाणी, स्वस्त पण कुशल मनुष्यबळ या प्राथमिक बाबी तपासतात. जेथे प्रकल्प उभारला जाणार आहे, तेथील राजकीय परिस्थितीलाही प्राधान्य दिले जाते. कंपनी ज्या देशात स्थापित झाली आहे, त्या देशाचे व कंपनीचा नवीन प्रकल्प ज्या ठिकाणी उभारला जाणार आहे, त्या देशांचे मित्रत्वाचे संबंध असतील तरच पुढे पाऊल टाकले जाते. 

करामध्ये वाजवी व भरघोस सवलती मिळू शकतात काय, याचीही चाचपणी केली जाते. त्यानंतर नियोजित प्रकल्पाची भौगोलिक परिस्थिती तपासण्यात येते. प्रकल्पाची जागा एखाद्या राजकीय मतदारसंघात येते, तेथील राजकीय इतिहास पडताळून पाहिला जातो. राजकीय हस्तक्षेप होणार नसेल व मैत्रीपूर्ण वातावरण असेल तर मागील इतिहास तपासून अशा बहुराष्ट्रीय कंपन्या प्रकल्प आणण्याचे नियोजन करतात. पण, सातारा जिल्ह्याला विविध क्रेडिट रेटिंग एजन्सींनी सी (-) ग्रेड दिली आहे. यामध्ये जिल्ह्यात राजकीय दहशत असून, उद्योग आणि तेथील कामगार संघटनांत राजकीय ढवळाढवळ होत असल्याने औद्योगिक शांतता बिघडू शकते, असे ग्रेडमध्ये म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात मोठा उद्योग येण्याची चिन्हे पुन्हा एका धूसर झाली आहेत. हे बिघडलेले वातावरण बदलून जिल्ह्याला पुन्हा एएए (+) ग्रेड मिळत नाही, तोपर्यंत जिल्ह्यात मोठा औद्योगिक प्रकल्प येऊ शकणार नाही. 

लोकप्रतिनिधींनी शांततेवर भर देण्याची गरज 
औद्योगिक क्षेत्रासाठी क्रेडिट रेटिंग एजन्सींकडून मिळालेले हे सी मायनस रेटिंग बदण्यासाठी राजकीय आणि उद्योजकांनी पुढाकार घेऊन पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सध्या अस्तित्वात असलेल्या औद्योगिक वसाहतीत वातावरण शांत करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच नव्याने येऊ पाहणाऱ्या उद्योगांना जागा उपलब्ध करण्यासाठीही प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करायला हवेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत या विषयावर बोलण्यास कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे. 
........................................................ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News