गोरक्षक माजिद

संदीप काळे
Saturday, 22 February 2020

पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी देवकर या ठिकाणी एक फार्म आहे. हे फार्म आहे देशी गाईंचं. पाचशेच्या आसपास गाई तिथं आहेत. माजिदखान रज्जाक पठाण यांच्या या अनोख्या फार्मविषयी...

लोणी देवकर इथल्या माजिदखान पठाण यांच्याविषयी मंदार फणसे यांनी मला बऱ्याच दिवसांपूर्वी सांगितलं होतं. ते म्हणाले होते : ‘‘देशी गाईंची, जनावरांची देखभाल, सेंद्रिय शेती याविषयीचा वेगळा प्रकल्प पाहायचा असेल तर आणि गाई-वासरांची संस्कृती जपलेली पाहायची असेल तर माजिदखान (९८६०१ २२२०४) यांच्या ‘रचना खिल्लार फार्म’ला एकदा भेट द्यायला पाहिजे.’’
मी पुण्याहून सोलापूरला निघालो होतो. लोणी या गावाची पाटी पाहून मला फणसे यांचं बोलणं आठवलं. माजिदखान यांचा नंबर मी मिळवला.
‘‘मला तुम्हाला भेटायचं आहे. तुम्ही फार्ममध्ये आहात का?’’ असं विचारून त्यांची वेळ घेतली. मी ज्या ठिकाणाहून त्यांना फोन केला होता त्या ठिकाणाहून वीस मिनिटांच्या अंतरावर माजिदखान यांचं ‘रचना खिल्लार फार्म’ होतं.

पश्‍चिम महाराष्ट्रातलं वैभव आणि उसाची सुरू असलेली वाहतूक बरंच काही सांगून जात होती. जे वैभव मराठवाड्याच्या किंवा विदर्भाच्या वाट्याला कधीच आलं नाही ते वैभव चांगल्या माणसांच्या रूपानं आणि चांगल्या निसर्गाच्या रूपानं पश्‍चिम महाराष्ट्राला मिळालं होतं.
मी रचना फार्मच्या आवारात आलो. समोर एक वेगळंच चित्र होतं. फार्मच्या आवारात वृद्ध मंडळींसह अनेक जण शिरत असलेले दिसले. गाईंचे विकसित झालेले प्रकार, उत्तम शेती हे सगळं पाहण्यासाठी ही मंडळी आलेली असावी असं मला वाटलं.
तिथं उभ्या असलेल्या एका आजीबाईंना मी त्याविषयी विचारलं.  
‘‘आजाराचं निदान करून घेण्यासाठी मी इथं आले आहे,’’ असं त्यांनी सांगितलं. ‘रचना फार्म’विषयीची ही नवीन माहिती मला मिळत होती.
फार्मच्या आतल्या भागात गेल्यावर मी माजिदखान यांच्याविषयी विचारणा करू लागलो. एक व्यक्ती माझ्याकडे धावत आली. झुबेर असं त्या व्यक्तीचं नाव. माजिदखान यांचा तो धाकटा भाऊ होता.
तो म्हणाला : ‘‘तुम्ही येणार आहात असा दादांचा फोन मला आत्ताच आला होता. दादा थोड्या वेळानं येतील. तोपर्यंत आपण जरा फिरू या. मी तुम्हाला इथली सगळी माहिती देतो.’’
बाजूलाच गाईंचा मोठा कोंडवाडा होता. त्या जागेत गाई मोकळ्या सोडलेल्या होत्या. कोंडवाड्याच्या फाटकासमोर झुबेर उभा राहिला.
गाईंकडे बघून त्यांची नावं उच्चारत त्यानं एक जोरदार हाळी दिली...‘ए मस्तानी, ए गंगा...’
आवाज ऐकताच मस्तानी आणि गंगा या गाई फाटकाच्या दिशेनं धावतच आल्या. त्यानं हातातली भाकरी गाईंना चारली.
गाई-बैलांना, अन्य प्राण्यांना, जनावरांना आवडीनं, हौसेनं वेगवेगळी नावं दिली जातात हे आपल्याला माहीत असतं. मात्र, नाव पुकारल्याबरोबर संबंधित जनावरं आवाजाच्या दिशेनं पळत येतात हे जरा नवलाचं होतं. झुबेरनं एकेक करून लक्ष्मी, गौरी, शोभा, रूपा अशी नावं घेतली आणि संबंधित गाई त्याच्या दिशेनं धावत आल्या. सगळ्या गाई देशी होत्या.  
‘‘तुम्ही काय करता?’’ मी झुबेरला विचारलं.  
झुबेर म्हणाला : ‘‘बाबांच्या आणि दादांच्या या गाईंसंदर्भातल्या  प्रोजेक्‍टवर मी अधूनमधून येत असतो; पण मला अधिक रुची आहे ती नेमबाजीत. होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना त्यात प्रावीण्य मिळवून देण्यात मला जास्त आनंद मिळतो.’’
झुबेरनं एकेक करत मला तिथल्या जनावरांच्या वेगळेपणाविषयी माहिती दिली. जनावरांची तिथं माणसाप्रमाणे काळजी घेतली जात होती. जनावरं धुणं, त्यांचं अंग पुसणं, त्यांना औषध देणं, त्यांच्या ‘डाएट’नुसार त्यांना चारा देणं हे सगळं करण्यात किमान
दहा-पंधरा तरी माणसं गुंतलेली होती. एक महिला दुधाचा ग्लास घेऊन माझ्याजवळ आली आणि म्हणाली : ‘‘भैया, ये ले लो.’’
‘आपला चहा म्हणजे यांच्याकडचं दूध’ हे माझ्या लक्षात आलं!
मी दूध प्यायलो. चव वेगळी असल्याचं लक्षात आलं.
‘‘या दुधाची चव वेगळीच आहे,’’ मी झुबेरला म्हणालो.
तो म्हणाला : ‘‘हो; हेच दूध औषध म्हणून वापरलं जातं. आपल्याकडे प्रसिद्ध असणाऱ्या खिल्लारांचं हे दूध आहे. जवळजवळ सर्व देशी गाईंच्या दुधाची चव अशीच असते. तुम्ही ती माणसं पाहताय ना, त्या माणसांवर याच दुधाच्या माध्यमातून अनेक प्रयोग केले जातात. त्यातून ती बरी होत आहेत.’’
मी रांगेतल्या त्या माणसांकडे पाहिलं.
मी झुबेरला म्हणालो : ‘‘चला, त्या माणसांना आणि त्यांना तपासणाऱ्या डॉक्‍टरांना भेटू या.’’
आत गेलो. तिथं डॉ. राहुल मदने नावाचे डॉक्‍टर एका रुग्णाला तपासत होते. तरुण असलेले ते डॉक्‍टर स्वतःच्या वेगळ्या शैलीत सर्वांशी बोलत होते. गाईंच्या संदर्भात खूप शास्त्रीय माहिती त्यांच्याकडे होती.
कर्करुग्ण, शुगर असलेले, मणक्‍याचे आजार असलेले, गुडघ्याचे आजार असलेले, वजन कमी करण्याच्या उपचारांसाठी आलेले असे अनेक प्रकारचे लोक तिथं होते.  
मी एका काकांना बोलतं केलं : ‘‘तुम्ही कधीपासून येताय इथं? इथला तुमचा अनुभव कसा आहे?’’
ते म्हणाले : ‘‘मला कर्करोग होता. सगळीकडे उपचार करून पाहिले; पण काही फरक पडेना. या डॉक्‍टरांच्या उपचारांमुळे आता मी नव्यानं जगतोय. माझ्यातला आजार जवळजवळ नाहीसा झाला आहे. खूप खर्च केल्यावरही फरक पडला नव्हता. मात्र, आता मी इथं बरा होत आहे.’’ सोलापूरच्या सतीश जाधव यांच्यासारखे अनेक रुग्ण तिथं आले होते, उपचार घेत होते आणि ‘आपण बरे होत आहोत,’ असं समाधान व्यक्त करत होते.

या सगळ्या रुग्णांना भेटल्यानंतर मी साहजिकच डॉक्‍टर मदने यांच्याशीही बोललो.
डॉ. मदने म्हणाले : ‘‘गोमूत्र, दूध आणि तूप यांद्वारे - शास्त्रात  सांगितल्यानुसार - सर्व आजारांवर निदान करता येतं. इथं असणाऱ्या अनेक गाईंच्या माध्यमांतून आम्ही सर्व प्रयोग करतो. नॅचरोपथीच्या उपचारांनंतर रुग्ण बरे होतात, पीडित रुग्ण इथं ९९ टक्के बरे झालेले आहेत असा माझा अनुभव आहे. रुग्णांनीही तुम्हाला हेच सांगितलं आहे.’’
केरळ, तामिळनाडू, राजस्थान, दिल्ली आदी ठिकाणी जाऊन डॉक्‍टर मदने यांनी नॅचरोपथीचा अभ्यास केला आहे. विशेषत: गाय आणि गाईपासून बऱ्या होणाऱ्या आजारांसंदर्भात त्यांचा हातखंडा आहे.
एव्हाना माजिदखान फार्ममध्ये पोचले होते. त्यांनी माझं स्वागत केलं. आपली आवडती बैलजोडी, शेतीमधले आवडते प्रयोग त्यांनी मला दाखवले.
‘‘ ‘गाय आपल्या घरासमोर सतत बांधलेली पाहिजे. तिचं दूध, तिचं गोमूत्र, तिचं शेण आणि तिचं असणं हे आरोग्याच्या दृष्टीनं आणि आयुष्य वाढण्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं ठरतं,’ असं माझी आजी बिस्मिल्लाबी जब्बारखान पठाण हिनं माझ्या वडिलांना - रज्जाक पठाण - यांना सांगितलं होतं, त्यामुळे आजीच्या या सांगण्यावरून माझ्या वडिलांना गाईंबाबतचा छंद जडला...’’ माजिदखान यांनी मला माहिती दिली.
ते म्हणाले : ‘‘सुरुवातीला वडिलांनी चार गाई घेतल्या आणि त्या चार गाईंच्या आज पाचशे गाई झाल्या आहेत. आम्ही एक फार्म हाऊस काढलं आणि त्याच्या माध्यमातून गाईंबाबतचा आलेख दिवसेंदिवस वाढत गेला.’’
माजिदखान यांनी दिलेली माहिती मला खूप वेगळी वाटली.
‘एक जनावर पाळणं म्हणजे वाघ पाळल्यासारखं असतं,’ असं माझे आजोबा, बापू, मला सांगायचे. मात्र, इथं तर शे-पाचशे जनावरांची देखभाल माणसांसारखी केली जात होती. हे आश्चर्याचं होतं.
इथल्या सगळ्या गाईंचं दूध त्यांच्या वासरांना दिलं जातं. जे दूध उरतं त्या दुधाचा वापर औषधांसाठी केला जातो.
गाईंच्या देशी पैदाशीबाबत माजिदखान म्हणाले : ‘‘महाराष्ट्रात गाईंचे पाच प्रकार आहेत. खिल्लार, देवणी, डांगी, गवळव, लालकंधारी. गुजरातमध्ये दोन प्रकार आहेत. भारतातल्या एकूण ३८ जातींपैकी सर्वात जास्त चालणारा सुधारित गाईचा प्रकार म्हणून ‘गिर खिल्लारी’कडे पाहिलं जातं. या सगळ्या प्रकारच्या गाई इथं आहेत. या गाई विकसित करण्यासंदर्भातले अनेक प्रयोग आमच्या फार्ममध्ये  झाले आहेत. म्हणजे, खिल्लार पूर्वी दोन लिटर दूध द्यायची. मी यासंदर्भात प्रयोग केला. ती गाय पंधरा लिटरपर्यंत दूध कसं देईल यावर अभ्यास केला. दोन लिटर दूध देणारी तीच गाय आज पंधरा लिटरपेक्षा अधिक दूध देते. गाभण न राहणाऱ्या गाई अनेक जण आमच्या इथं आणून सोडतात. त्यांच्यावर आम्ही प्रयोग करतो व त्या पुन्हा कशा गाभण राहतील यासाठी आम्ही १०० टक्के यशस्वी प्रयत्न करतो. गाईंच्या टेस्ट ट्यूब बेबीचा पहिला प्रयोग आम्ही आमच्याकडे यशस्वीरीत्या केला. दुष्काळ पडल्यावर अनेकांनी आमच्याकडे जनावरं आणून सोडली. आम्ही चार-पाच महिने त्या जनावरांची देखभाल केली व नंतर ही जनावरं ज्याची त्या मालकाला परत दिली. दूध देणारी चांगली जनावरं असतील तर कसाईसुद्धा अनेक वेळा ती आमच्याकडं आणून सोडतात. कापायला जाणाऱ्या गाई जेव्हा अनेक कार्यकर्ते कसायाकडून पकडतात तेव्हा त्या गाई आमच्याकडे आणून दिल्या जातात. कोणताही कार्यकर्ता कधी गाय पाळण्यासाठी घेऊन जात नाही. शेतकऱ्यांनी गाईचं संगोपन करावं, त्या माध्यमातून सेंद्रिय शेती करावी यासाठी आम्ही अनेकदा प्रशिक्षण-कार्यक्रम घेतले.  शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना आम्ही वर्षातून दोन ते तीन वेळा मदत देण्याचा उपक्रम राबवतो.’’  
माजिदखान यांनी गाईचं महत्त्व वेगवेगळ्या प्रकारे पटवून दिलं. तिथले अनेक यशस्वी प्रयोग मीही माझ्या डोळ्यांनी पाहिले. मीही शेतकरी असल्यानं गाईचं दूध, गाईचं तूप, गाईचं शेण, गोमूत्र वगैरे बाबींचं महत्त्व मला पूर्वीपासूनच माहीत होतं. गाईशिवाय शेती होऊ शकत नाही हेही मला ठाऊक होतं. मात्र, माजिदखान यांच्या माध्यमातून हे सगळे प्रयोग मी आज प्रथमच अनुभवत होतो.

माजिदखान यांच्या फार्ममध्ये गाईंच्या दुधाचा उपयोग वासरांसाठी आणि औषधांसाठीच केला जातो. आपल्या चाळीस एकरांच्या वडिलोपार्जित शेतीतली निम्मी शेती गाईंच्या चाऱ्यासाठी माजिदखान यांनी राखून ठेवली आहे. उर्वरित निम्म्या शेतीत ते सेंद्रिय शेतीचे प्रयोग करतात. शासनाकडून त्यांनी केवळ चाऱ्यासाठी बहात्तर एकर जमीन घेतली आहे आणि तीत चारा काढण्याचं काम सुरू आहे. माजिदखान यांचे हे प्रयोग, गाईंविषयीची त्यांची आस्था हे सगळंच थक्क करणारं आहे.
‘माजिदखान हे काम कशासाठी करत आहेत? त्यांना हे करायची काय गरज आहे?’ असे प्रश्न विशिष्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले होते. त्यांच्या फार्मला भेट देऊन, तिथली पाहणी करून या कामावर आक्षेप घेतले होते, त्यांच्यावर आरोप केले होते...मात्र, आता तेच पदाधिकारी माजिदखान यांचे मित्र झाले आहेत.

माजिदखान हे खऱ्या अर्थानं गोरक्षक आहेत. त्यांच्या आजीकडून, वडिलांकडून त्यांना हे संस्कार मिळाले आहेत. ते संस्कार
जपण्या-जोपासण्याबरोरच माणुसकी, तत्त्वं, मूल्ये आणि समाधान मिळवण्याचं प्रभावी माध्यम म्हणून ते या प्रकल्पाकडे पाहतात. तुम्हाला हे सर्व पाहायचं असल्यास सोलापूर-पुणे रस्त्यावरच्या या ‘रचना फार्म हाऊस’ला नक्की भेट द्या.
ठराविक गोष्टी ठराविक जाती-धर्माच्याच लोकांनी केल्या पाहिजे असं काही नसतं. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन चांगलं काम केलं पाहिजे. माजिदखान यांच्यासारख्या गोरक्षकांनी हे कृतीतून दाखवून दिलं आहे.
सलीका जिंदगी जीने का दमदार होना चाहिए।
जो भीड में अलग नजर आए, ऐसा किरदार होना चाहिए।
माजिदखान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी या ओळी लागू होतात.
असे अनेक ‘माजिदखान’ समाजात निर्माण झाले तर सेंद्रिय शेतीबरोबरच इतरही अनेक उपक्रम नक्कीच यशस्वी होतील.
‘केवळ छंद’ म्हणून माजिदखान यांच्या या प्रकल्पाकडं पाहता येणार नाही, तर निसर्गाशी एकरूप होण्याचा तो त्यांचा एक प्रभावी मार्गही आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News