घडलेल्या तरुणांशिवाय या देशाला तरुणोपाय नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 January 2020

विद्यार्थांनीनी समाजात वावरताना आई- वडिलांचा आदर ठेवावा. माणूस संगतीनेच घडतो व संगतीनेच बिघडतो. आयुष्य जगताना आनंद घ्या आवडीच्या गोष्टी प्रामाणिकपणे करा. मैत्रीमध्ये आदराचा भाव असेल तर नाते टिकते.’

दहिवडी :  चांगली माणसे आयात करता येत नाहीत, ती घडवावी लागतात. म्हणूनच घडलेल्या तरुणांशिवाय या देशाला तरुणोपाय नाही. तरुणांचे हात उगारण्यासाठी नसून, उभारण्यासाठी आहेत, असे प्रतिपादन अक्षय भोसले महाराज यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे येथील दहिवडी कॉलेज दहिवडीमध्ये अग्रणी कॉलेज व समुपदेशन समिती यांचे संयुक्त विद्यमाने ‘तरुणाचे घर व समाजातील जबाबदारीचे वर्तन’ या विषयावर श्री. भोसले महाराज बोलत होते. या वेळी उपप्राचार्य डॉ. बी. एस. बळवंत, दडस उपस्थित होते. अक्षय महाराज म्हणाले, ‘‘विद्यार्थी हा चिखलाचा गोळा असतो व त्या गोळ्याला आकार देण्याचे काम शिक्षक करत असतो. माणूस चुकीतून घडतो, त्या वेळी त्याला कुटुंबातील संस्कार तारत असतात.

मुले संस्कारामुळे घडतात आणि हे संस्कार वाचन, लेखन, चिंतन अशा विविध माध्यमांतून होतात; पण आज वाचन कोणाकडूनही होत नाही. त्यामुळे सखोल ज्ञानाचा अभाव दिसतो. विद्यार्थांनीनी समाजात वावरताना आई- वडिलांचा आदर ठेवावा. माणूस संगतीनेच घडतो व संगतीनेच बिघडतो. आयुष्य जगताना आनंद घ्या आवडीच्या गोष्टी प्रामाणिकपणे करा. मैत्रीमध्ये आदराचा भाव असेल तर नाते टिकते.’’ पालकाच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका.

तारुण्यात प्रत्येकाने एखादी कला शिकावी व त्यात उच्चतम ध्येय गाठावे. यासाठी आपण कोण आहोत? व आपल्यात काय आहे? याचा शोध घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले. उपप्राचार्य डॉ. बी. एस. बळवंत यांनी तरुणांचे घराबरोबरच समाजातील वर्तन हे आदर्श असायला हवे, असे प्रतिपादन केले. आयोजक प्रा. डॉ. के. एम. पवार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रा. डॉ. एस. बी. वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. विजय पाटोळे यांनी आभार मानले. या वेळी प्रा. डॉ. अंकुश बरकडे, प्रा. मीरा देठे, प्रा. महेश भदाणे, प्रा. सुधीर धोंगडे, कला शाखेतील विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News