दहावी-बारावीच्या विद्यार्थी-पालकांसाठी समुपदेशन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये कमी गुण मिळाले किंवा अपयश आले तर ते काही आयुष्यभराचे अपयश असत नाही.

नवी मुंबई - दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये कमी गुण मिळाले किंवा अपयश आले तर ते काही आयुष्यभराचे अपयश असत नाही. त्यामुळे निराश होण्याचेही कारण नाही, पण अनेक विद्यार्थी आणि पालकांना ही समस्या भेडसावते. ‘सकाळ’ने त्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असून, विद्यार्थी तसेच पालकांच्या समुपदेशनाचा उपक्रम हाती घेतला आहे. 

‘सकाळ सोशल फाऊंडेशन’ व ‘स्टेट सायकॉलॉजिस्ट असोसिएशन’ यांच्या वतीने हा उपक्रम संपूर्ण राज्यात होत आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेले किंवा अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आलेला तणाव, नैराश्‍य, वाटणारी चिंता आणि भविष्याची काळजी याबद्दल मानसशास्त्रज्ञ शास्त्रोक्त पद्धतीने समुपदेशन करणार आहेत. अपयश कसे पचवावे, नैराश्‍यातून बाहेर कसे पडावे याविषयीच्या समुपदेशनासह पालकांची काळजी कमी होण्यासाठी या उपक्रमाची मदत होऊ शकेल. पुढील शिक्षण आणि परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना वाटणारी भीती आणि तात्पुरते अपयश आले असले तरी त्यावर मात करून पुढे काय करायचे यासंदर्भातही मार्गदर्शन मिळणार आहे.

राज्यात ‘सकाळ’च्या सर्व आवृत्त्यांच्या ठिकाणी सोमवारी (ता. १०) आणि मंगळवारी (ता. ११) उपक्रम होईल.  हे समुपदेश व्यक्तिगत पातळीवर 
होणार आहे. समुपदेशन सत्रे मोफत असली तरी सहभागासाठी ९८२१९६११५२ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करणे व समुपदेशनाची वेळ निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. समुपदेशन सत्रासाठी येताना गुणपत्रिका व उपलब्ध असल्यास कलचाचणीचा अहवाल सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या सत्रांमध्ये अनुभवी तज्ज्ञ व मानसशास्त्रज्ञ शास्त्रोक्त समुपदेशन करणार आहेत. भविष्याविषयीच्या शंकांबाबत विद्यार्थी आणि पालकांनी त्यांची मदत घ्यावी.
- डॉ. संदीप सिसोदे, अध्यक्ष, स्टेट सायकॉलॉजिस्ट असोसिएशन

विद्यार्थी व पालक समुपदेशन कार्यक्रम
सोमवार (ता. १०) आणि मंगळवार (ता. ११)
वेळ - सकाळी ११ ते सायं. ४
 स्थळ - ‘सकाळ’ कार्यालय, प्लॉट क्र. ४२ बी, सेक्‍टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई.
अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क - ९८२१९६११५२ (सकाळी ११ ते सायं. ४ पर्यंत)

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News