कोरोनाग्रस्त मृतदेहांना स्मशानभूमीत जागा मिळेना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 23 May 2020
  • मृतदेहाचे खड्डे खोदण्यासाठी मजूरांची वानवा

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांसोबतच मृतांची संख्याही वाढत आहे. त्यांच्यासाठी स्मशानभूमीही अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे पालिकेकडून मृतदेहांसाठी नव्या पर्यायांचा शोध सुरू आहे. स्मशानभूमीतील कर्मचारीही दिवस-रात्र अंत्यसंस्कारातच व्यस्त असल्याने तणावाखाली आहेत. कोरोना मृतदेहांचा आकडा रोज वाढतच असल्याने अंत्यसंस्काराचे कामही कर्मचाऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे.

मुंबईतील विद्युतदाहिन्या कोरोना मृतदेहांसाठी अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे आता मृतदेह दफन करण्यासाठी मोठ्या जागेचा शोध सुरू असल्याचे आरोग्य खात्यातील अधिकाऱ्याने सांगितले. 31 मेपर्यंत रुग्णांचे प्रमाण आणि मृतांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत; मात्र तरीही संख्या वाढत राहिल्यास दफनभूमीसाठी नव्या जागेचा पर्याय शोधावा लागेल, असे त्यांनी सांगितले. परदेशात मृतांची संख्या वाढत असताना त्यांच्यासाठी मोठ्या दफनभूमी तयार करण्यात आल्या. त्यात शेकडो मृतदेह दफन केले जात आहेत. त्या धर्तीवर मुंबईत किंवा मुंबईच्या बाहेर जागेचा शोध सुरू आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

खड्डे खोदण्यासाठी मजूर मिळेना

मुंबईत मृतदेहांचा सर्वाधिक भार चंदनवाडी, दादर, वरळी स्मशानभूमीतील विद्युत दाहिन्यांवर पडत आहे. या स्मशानभूमींमध्ये प्रत्येकी दररोज 15 हून अधिक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जात आहेत. त्यांच्यावर कर्मचारी दिवस-रात्र अंत्यसंस्कार करत आहेत. तीन पाळ्यांमध्ये कामगार काम करत आहेत. त्यांच्यावर कामाचा मोठा ताण पडत आहे. स्मशानभूमीत खड्डे खोदणाऱ्या कामगारांनी कोरोनाच्या भीतीने स्थलांतर केले असल्याने खड्डे खोदण्यासाठी कामगारही मिळेनासे झाले आहेत.

रोज 40 हून अधिक मृत्यू

मुंबईत रोज 40 हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. मुंबईतील कोरोना बाधितांची संख्याही 25 हजारांच्या पुढे गेली आहे; तर मृतांची संख्या 882 वर पोहोचली आहे. रोज 1300 ते 1400 कोरोनाबाधितांची वाढ होत आहे; तर 750 हून अधिक संशयित रुगणांची भर पडत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News