कोरोनाग्रस्तांना मिळणार समुपदेशनाचा आधार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 19 May 2020

नायर रुग्णालयातील डॉ. उन्नती देसाई यांनी कोरोनाबाधितांवरील औषधोपचारांसोबतच समुपदेशन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मुंबई : कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर प्रचंड तणाव असतो. त्यामुळे महापालिकेच्या नायर रुग्णालयात कोरोनाग्रस्तांना औषधे देण्यासोबत समुपदेशनही केले जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्यावर रुग्णाच्या मनावर दडपण येते. आपल्यासोबत कुटुंबीयांनाही क्वारंटाईन व्हावे लागेल, अशी भीती असते. रुग्णांशी सतत संपर्क असल्यामुळे डॉक्‍टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यावर तणावाखाली आले होते. त्यांनी तिथेच उपचार घेण्याचे ठरवले. डॉक्‍टरांशी बोलल्यानंतर आपण बरे होऊ, असा विश्वास त्यांना वाटू लागला.

नायर रुग्णालयातील डॉ. उन्नती देसाई यांनी कोरोनाबाधितांवरील औषधोपचारांसोबतच समुपदेशन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे रुग्णांमधील आशावाद वाढतो, असे त्या सांगतात. वॉर्डमध्ये आलेला रुग्ण मानसिक तणावात असतो. त्यामुळे विचारपूस करून त्याला मानसिक आधार देणे गरजेचे असते. औषधोपचारांना समुपदेशनाची जोड मिळाल्यावर तीन दिवसांतच रुग्णांच्या प्रकृतीत सकारात्मक फरक पडला, असे त्यांचे निरीक्षण आहे. तेथे कोरोनायोद्‌ध्यांसाठी सुरू केलेल्या विशेष वॉर्डची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

कोरोनाची लागण झालेले रुग्ण रुग्णालयात, तर त्यांचे कुटुंबीय क्वारंटाईन सेंटरमध्ये असतात. त्यामुळे तणावाखाली असलेल्या रुग्णांना मानसिक आधार देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी रुग्णालयातील समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाते.
- डॉ. उन्नती देसाई, प्राध्यापक, श्वसनविकार विभाग, नायर रुग्णालय

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News