धक्कादायक! 250 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन; 1 हजार क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 April 2020

कोरोनावर उपचार करताना वैद्यकीय कर्मचारी योग्य खबरदारी घेत आहेत.

मुंबई : सार्वजनिक आणि खासगी अशा 20 रुग्णालयांतील 250 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे; तर किमान हजार कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पालिकेच्या चर्चगेट येथील नाक, कान, घसा रुग्णालयातील तीन कर्मचारी कोरोनाबाधित आहेत; तर 30 जणांची कोरोना चाचणी करून त्यांना क्वारंटाईन केले आहे. याशिवाय शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील डॉक्‍टर आणि वॉर्ड बॉयला कोरोनाची बाधा झाली आहे; तर त्यांच्या संपर्कात आलेल्या 80 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यात 10 डॉक्‍टरांचा समावेश आहे.

महानगर पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर, परळ येथील केईएम आणि शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील 41 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. वोक्‍हार्ट, जसलोक, भाटिया या महत्त्वाच्या खासगी रुग्णालयांतील कर्मचारीदेखील कोरोनाबाधित आढळले आहेत.

कोरोनावर उपचार करताना वैद्यकीय कर्मचारी योग्य खबरदारी घेत आहेत. तरीही त्यांना कोरोना होण्याचा धोका असतोच; मात्र मुंबईत कोरोनाचे उपचार करताना लागण होण्याचे प्रमाण क्वचितच आहे. यात रुग्ण दुसऱ्या आजारासाठी रुग्णालयात आला, पण त्याला कोरोनाची बाधा असल्याने कर्मचाऱ्यांनी संसर्ग झाला असे प्रमाण जास्त आहे. वैद्यकीयदृष्ट्या अशा प्रकारे डॉक्‍टरांना कोरोनाची बाधा होणे हे गंभीर असल्याचे पालिकेच्या एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News