दिलासादायक! कोरोनारुग्ण बरे होण्याचे प्रमाण 43 टक्के   

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 June 2020

कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 70,013 तर 30,108 रुग्ण कोरोनामुक्त 

मुंबई : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी राज्यात रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. सोमवारी रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 43 टक्‍क्‍यांवर गेले. सोमवारी एकूण 779 रुग्ण बरे झाले असून राज्यात आजपर्यंत एकूण 30,108 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सोमवारी राज्यात 2361 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 70,013 झाली आहे. सोमवारी 76 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 2362 वर पोचला आहे.

सोमवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई 40, मीरा-भाईंदर 6, नवी मुंबई 6, वसई विरार 3, रायगड 2, कल्याण-डोंबिवली 2, ठाणे 1, नाशिक, पुणे 8, पिंपरी-चिंचवड 1, औरंगाबाद मनपा 3, जालना 1, बीड 1 आणि नागपूर मनपा हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 45 पुरुष; तर 31 महिला आहेत. या 76 रुग्णांपैकी 51 जणांमध्ये (67 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोव्हिड- 19 मुळे राज्यात झालेल्या मृतांची संख्या आता 2362 झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 54 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत; तर उर्वरित मृत्यू हे 14 मे ते 28 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 22 मृत्यूंपैकी मुंबई 9, नवी मुंबई- 5, औरंगाबाद- 3, रायगड- 2, बीड 1, मीरा-भाईंदर 1 आणि ठाणे 1 असे आहेत.

रुग्णांचा रिकव्हरी रेट समाधानकारक

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) समाधानकारक वाढला असून तो 43 टक्के एवढा आहे; तर राज्यातील मृत्यू दर 3.37 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 5,67,552 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वॉरंटाईन सुविधांमध्ये 72,704 खाटा उपलब्ध असून सध्या 36,189 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News