कोरोना रुग्णांना आता 'ही' औषधी दिली जाणार; वाचा कसा होतो परिणाम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 31 May 2020

आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधे हे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते, असे आयुवेद तज्ज्ञांनी म्हटले होते. त्यावर सरकारने वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली.

मुंबई : कोरोना आजारावर अद्याप कुठल्याही प्रकारचे औषध तयार झालेले नाही. त्यामुळे विषाणूवर मात करायची असल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा एकच पर्याय आहे. यासाठी आता सरकारने कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधांद्वारे उपचार करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना रुग्णांवर पारंपारिक औषधाद्वारे उपचार व्हावेत, यासाठी सरकारला अनेक प्रस्ताव पाठवले गेले होते. या प्रस्तावाला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. महाराष्ट्रात जवळपास साठ हजाराहून अधिक रुग्णसंख्या झाली आहे तर मुंबईत जवळपास 36 हजार करोनाचे रुग्ण आढळले आहेत. वाढते रुग्ण लक्षात घेऊन रुग्णालयात खाटा वाढवणे, अतिदक्षता विभागात खाटा तयार ठेवणे, तात्पुरती रुग्णालये उभारणे तसेच दीड लाख लोकांसाठी 15 जून पर्यंत क्वारंटाइन केंद्र उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कोरोना रुग्णांसाठी सरकार उपाययोजना करत आहे. मात्र, असे असताना या आजारावर उपचार करण्यासाठी प्रभावी औषध तयार झालेले नाही. हे लक्षात घेऊन आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी डॉक्‍टरांनी व त्यांच्या विविध संघटनांनी कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधांचा वापर करू देण्याची मागणी सरकारकडे केली होती.

आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधे हे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते, असे आयुवेद तज्ज्ञांनी म्हटले होते. त्यावर सरकारने वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. कोरोना रुग्णांना होमिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानी औषधे देण्याबाबतचा निर्णय ही समिती घेणार होती. त्यानुसार आता या समितीने कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी, आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे.

याबाबत माहिती देताना वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, याबाबतचा निर्णय सरकार दरबारी आहे. लवकरच यावर निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे. वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा सुरु आहे. आमच्या समितीने याबाबत संबंधित विद्याशाखेच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांशी सखोल चर्चा करून होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानीची कोणती औषधे रुग्णांना द्यायची हे निश्‍चित केले आहे. या औषधांमुळे कोरोना प्रतिबंधास मदत होण्याची शक्‍यता आहे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरावी असे समितीच्या अहवालात नमूद केले आहे. तसेच ताप, घसा खवखवणे अथवा अन्य लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या डॉक्‍टरांशी संपर्क साधण्यास अहवालात स्पष्ट केले आहे. याबाबत होमिओपॅथी डॉ. विद्यासागर उमाळकर म्हणाले की, "एक चांगला निर्णय असून होमिओपॅथी औषधांचा कोरोना रुग्णांमधील प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्‍चित मदत होईल. या औषधातील सुक्ष्मातीसुक्ष्म औषधी द्रव्ये मुळातून काम करतात. यातून कोरोना नसलेल्या रुग्णांमधीलही प्रतिकारशक्ती वाढून कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता दूरावण्यास मदत होते'

अर्सेनिक, कॅमकोर आणि सेपीया आदी औषधे वापरल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्‍चित मदत होईल. होमिओपॅथीच्या या औषधांचा कोरोना रुग्णांना तसेच रुग्ण नसलेल्यांची प्रकृती चांगली ठेवण्यास निश्‍चित मदत होते, असे कल्याण येथील डॉ. विद्याधर गांगण यांनी सांगितले. कल्याण होमिओपॅथी डॉक्‍टर फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही कोरोनाची काळजी घेण्यासाठी आतापर्यंत जेवढ्यांना औषधे दिली त्यांची तपशीलवार नोंद ठेवलेली आहे. कोरोना रुग्णांसाठी मदत करणाऱ्या जवळपास सहाशे कार्यकर्त्यांना आम्ही होमिओपॅथीची औषधे दिली असून यातील एकालाही कोरोना झालेला नाही. तसेच करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांनाही औषधे दिली असून त्यांचीही प्रकृती चांगली असून या सार्या नोंदी तपशीलवार महापालिका व संबंधित यंत्रणेला आम्ही देत आहोत, असे डॉ. विद्याधर गांगण यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News