कोरोनामुळे तरूणांना नोकऱ्या मिळणे कठीण..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020
  • कोरोनाचे संकट वाढले त्याच बरोबर लॉकडाऊन देखील वाढत गेले, परंतु त्या अनेक लोकांच्या नोकऱ्या सुध्दा गेल्या आहेत.
  • अर्थशास्त्राचं नोबेल पटकावणाऱ्या अभिजीत बॅनर्जी आणि एस्टर ड्युफलो यांनीही तेव्हाच सांगितले होतं की, जगभरातल्या देशांना मोठ्या लोकसंख्येला चरितार्थाची साधनं पुरवावी लागतील कारण सगळ्यांना रोजगार मिळू शकणार नाही.

मुंबई :-  कोरोनाचे संकट वाढले त्याच बरोबर लॉकडाऊन देखील वाढत गेले, परंतु त्या अनेक लोकांच्या नोकऱ्या सुध्दा गेल्या आहेत. अर्थशास्त्राचं नोबेल पटकावणाऱ्या अभिजीत बॅनर्जी आणि एस्टर ड्युफलो यांनीही तेव्हाच सांगितले होतं की, जगभरातल्या देशांना मोठ्या लोकसंख्येला चरितार्थाची साधनं पुरवावी लागतील कारण सगळ्यांना रोजगार मिळू शकणार नाही.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मुद्यावरून बराच खल सुरू होता. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या माध्यमातून कोणती कोणती कामे होऊ शकतील? कोणाच्या नोकऱ्या राहतील आणि वाचतील? एकीकडे जगभरातील उद्योगपती सगळं काम स्वयंचलित पद्धतीने कसे होईल याची स्वप्ने बघत होते, तर दुसरीकडे सरकार आणि समाजातील अनेकांना कोट्यवधी तरुणांच्या रोजगाराचे काय याची चिंता लागून राहिली होती.

युवाल नोआ हरारी यांनी 21 lessons for the 21st Century या पुस्तकात एकविसाव्या शतकातील २१ गोष्टी सांगतात. त्यात रोजगार दुसऱ्या क्रमांकावर आहे. नव्या पिढीसाठी हा धोक्याचा इशारा आहे. आता शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या पिढीला हे सांगणे आहे की, जेव्हा तुम्ही काम शोधू लागाल तेव्हा कदाचित नोकऱ्या नसतील. संगणक आणि रोबो नजीकच्या भविष्यात बहुतांश नोकऱ्यांवर गदा आणतील अशी परिस्थिती नाही मात्र हे चित्र प्रत्यक्षात यायला फार वर्ष जाणार नाहीत. ते २०५० वर्षाचं कल्पनाचित्राची मांडणी करतात.

'डेटा इज न्यू ऑईल' असं का म्हटलं जातं?

याच धर्तीवर एलेक रॉस यांनी पुढच्या दहा वर्षातील आव्हानांची मांडणी केली. येत्या दहा वर्षांत जे नवे तंत्रज्ञान येईल, नवे शोध लागतील यामुळे आपले काम आणि आपला घरातला वावर कसा बदलेल याचा त्यांनी अभ्यास केला. जग कसे बदलेल, डेटा इज न्यू ऑईल असं का म्हटलं जात आहे, कंप्युटर प्रोग्रॅमिंगहून माणसाच्या प्रोग्रॅमिंगपर्यंत पोहोचलेलं तंत्रज्ञान या सगळ्याचा आढावा रॉस यांच्या The Industries of The Future पुस्तकात घेण्यात आला आहे. वेगाने बदलणाऱ्या जगात केवळ टिकून राहण्यासाठी नव्हे तर प्रगती करायची असेल तर हे पुस्तक गाईड म्हणून काम करू शकेल.

यामध्ये डेटा काय किमया करू शकते याची झलक आहे. रोबो आपली कामे कशी करू शकतो हेही दिले आहे. कॉम्प्युटर कोडिंगचा वापर हत्यार म्हणून कसा केला जाईल याचीही शक्यता मांडण्यात आली आहे. जमिनीवर होणाऱ्या तसेच हवेत होणाऱ्या लढायांपेक्षा सायबर युद्ध व्हर्च्युअल युद्धाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिसऱ्या जगातील देश म्हणजेच विकसनशील देशांना अमेरिकेसारखी सिलिकॉन व्हॅली उभी करता येईल का? तरुणांची बुद्धिमत्ता आणि गुणकौशल्ये यांचा योग्य उपयोग करून घेऊन चांगला समाज त्यांना घडवता येईल का?

मात्र हे सगळे चित्र २०२० मध्ये प्रचंड प्रमाणात बदलले. जे व्हायला नको ते घडून गेलं आहे. जगभरातील माणसं आरोग्य संकटाचा सामना करत आहेत. अनेक शंकाकुशंका सत्यात उतरल्या आहेत. निम्म्याहून अधिक जगाने लॉकडाऊनचा अनुभवलं आहे. जगभरात एकाच वेळी विमान सेवा, हॉटेल-पर्यटन, ट्रेन बंद होणे ही अशक्यप्राय वाटलेली गोष्ट प्रत्यक्षात घडले आहे. या बरोबरीने रोजगाराचे संकट गहिरे झाले. या समस्येबरोबरीने बाकी अडचणीही उभ्या ठाकल्या. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना अर्थात आयएलओ याच प्रश्नाचा अभ्यास करत आहे की कोरोनामुळे किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

एप्रिलच्या अखेरीस म्हणजे यंदाच्या वर्षातील तिमाहीत जगभरात १८ कोटी नोकऱ्यांवर गदा आली आहे. पूर्णवेळ नोकऱ्यांची ही आकडेवारी आहे. अर्धवेळ किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या माणसांची आकडेवारी नाही. ऑगस्ट महिन्यात जारी करण्यात आलेली आकडेवारी भयावह आहे.

असे घडू शकते असा विचार केला होता त्यापेक्षा परिस्थिती भीषण आहे. एप्रिल ते जून या कालावधीत जगभरात १४  टक्के काम होऊ शकलेलं नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ४० तासांचा आठवडा या हिशेबात पाहिलं तर ४८ कोटी नोकऱ्या गमावण्यासारखे आहे.

यामध्ये भारतात किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या याची आकडेवारी नाही. परंतु भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना एकत्रित म्हणजे दक्षिण आशियात तीन महिन्यात साडेतेरा कोटी नोकऱ्या गेल्या असण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे.

आता पुढे काय वाढून ठेवलं आहे?

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने तीन शक्यता वर्तवल्या आहेत. आगामी काळात सगळं सुरळीत होऊन पूर्वपदावर आले, जेणेकरून कोरोनावर काही उपाय निघाला तर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ शकते.

मात्र तरीही ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत जगभरात ३४ लाख नोकऱ्या जाण्याची भीती आहे. सगळे काही सुरळीत झाले नाही तर मात्र परिस्थिती फार चिघळली नाही तरी नोकऱ्या जाण्याची संख्या १४ कोटी असू शकते.

परिस्थिती ढासळली तर ३४  कोटी आणि त्यापेक्षाही जास्त लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. यापैकी कोणती शक्यता खरं होण्याच्या जवळ जाणारी आहे?

याचे उत्तर जगातले कुणीच देऊ शकत नाही. कोणत्याही जाणकारांना विचारले तर त्यांचे म्हणणे एकच आहे, तुम्ही सांगा कोरोनाचा धोका कधी संपुष्टात येणार? त्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात. त्याचे उत्तर तूर्तास कोणाकडेच नाही.

तरीही नुकसान किती होईल याचा अंदाज घेणं सुरू आहे. बरी परिस्थिती, चांगली स्थिती, ढासळलेली अवस्था याचे आडाखे बांधले जात आहेत. कोरोनामुळे न्यू नॉर्मल अर्थात जगण्याची पद्धतच बदलली आहे. त्याआधीही जगण्याचे तंत्र बदलत चालले होते. कोरोनाने त्याचा वेग वाढवला आहे.

आताच्या घडीचा सगळ्यांत मोठा प्रश्न म्हणजे जास्तीत जास्त माणसांचा जीव कसा वाचवता येईल. त्यानंतरचा प्रश्न म्हणजे माणसांच्या रोजगाराचं काय. लोकांना काम कसं मिळवून देणार? ज्यांच्याकडे काम आहे ते कसं टिकवणार? नोकरी गेलेल्यांसाठी काय करता येईल?

कोरोनानंतर हा प्रश्न अधिकच गंभीर होत जाईल. अनेक उद्योग ठप्प झाले आहेत. जे सुरू झालेत, ते किती प्रमाणात चालतील याविषयी साशंकता आहे. जे उद्योग सुरू झालेत, त्यातून किती नोकऱ्या मिळतील याविषयी खात्री देता येत नाही. लोकांना काम कसे द्यायचे यावरून सगळे विचारचिंतन सुरू आहे.

जेवढे अहवाल येत आहेत, त्यात एक यादी आहे, ती म्हणजे कोव्हिड प्रूफ जॉब्सची. ही सूची आताच्या घडीला महत्त्वाची आहे. या क्षेत्रात कार्यरत माणसांच्या नोकऱ्यांना धोका नाहीये. यामध्ये एफएमसीजी, अग्रो केमिकल, केमिकल, ईकॉमर्स, हेल्थकेअर, हायजीन, लॉजिस्टिक्स, ऑनलाईन ट्रेनिंग अँड एज्युकेशन, आयटी यांचा समावेश आहे.

भारतात या यादीत सरकारी नोकऱ्याही आहेत. मात्र याच्या बरोबरीने आणखी काय यादी तुम्ही पाहायला हव्यात. अशा नोकऱ्या किंवा कामं जे आताच्या घडीला अत्यावश्यक सदरात मोडतात. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या नोकरीवर किंवा कामावर गदा येण्याचा प्रश्नच नाहीये. परंतु त्यांचं आयुष्य धोक्यात आहे, तेही कामामुळे.

यामध्ये कोणकोण आहे? कोरोनाविरुद्धच्या लढाईतील योद्धे. यामध्ये डॉक्टर, नर्स, हॉस्पिटलचा सगळा कर्मचारी वृंद, पोलीस, सफाई कर्मचारी, पॅथॉलॉजी लॅब, डायग्नोस्टिक सेंटर, फिल्डवर जाऊन काम करणारी मंडळी, आशा सेविका.

या क्षेत्रात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मागणी दररोज वाढते आहे. त्यांनी या क्षेत्रात राहावं यासाठी चांगल्या ऑफर दिल्या जात आहेत. परंतु इथे जोखीम खूप आहे.

सातत्याने वाढणारी अनिश्चितता

सतत हे सांगितलं जात आहे की, कोणत्याही निष्कर्षाप्रत येण्याची ही वेळ नाही. परंतु त्याचवेळी क्षणोक्षणी अनिश्चितता वाढत चालली आहे. नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे, नोकरी टिकली तर पगारात कपात होते आहे.

भारतातील सगळ्यांत मोठ्या स्टाफिंग कंपनी टीमलीजचे चेअरमन मनीष सभरवाल सांगतात, "लॉकडाऊन काळात बेरोजगारीच्या आकडेवारीचा हिशोब मांडणे योग्य नाही. रविवारच्या दुपारी बेरोजगारीचा आलेख नेहमीच उंचीवर असतो."

त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, बेरोजगारीचं खरं चित्र सगळे उद्योगधंदे पूर्वपदावर येऊन सुरू होतील तेव्हाच कळू शकतं. त्यासाठी कोरोना लवकरात लवकर जाणं आवश्यक आहे. त्यावर औषध मिळावं किंवा लस तयार व्हावी. एक गोष्ट नक्की की जग पहिल्यासारखं नसेल.

औषध आणि लस आल्यावर हे चित्र बदलेल का?

कोरोनाचा धोका औषध किंवा लसीनंतर कमी होईल पण आपल्या मानसिकतेवर, राहणीमानावर, कामकाजावर झालेला परिणाम तसाच राहील. सगळं काही बदलत आहे. या बदलानंतर कोणते उद्योगधंदे तेजीत येतील. कोणावर मंदीचा परिणाम होईल. हे समजून घेणं आवश्यक आहे. परिस्थिती किती चिंताजनक आहे याचा अंदाज यातून येऊ शकतो ते म्हणजे टीमलीज कंपनी गेली अनेक वर्ष एम्प्लॉयमेंट आऊटलूक अहवाल बनवते. मात्र यंदा वाचण्याचं परिमाण बदललं आहे.

नोकरी देणाऱ्या कंपन्यांना विचारलं जातं की किती लोकांना नोकरी देण्यास ते उत्सुक आहेत. आतापर्यंतचं चित्र असं राहिलं आहे ते म्हणजे गेल्या वर्षी या सहामाहीत जेवढ्या नोकऱ्या दिल्या, त्यापेक्षा किती जास्त किंवा कमी नोकऱ्या देण्याचा विचार आहे. यंदा हा प्रश्न बदलून असा झाला आहे- कंपन्या नोकरी देण्याचा विचार करत आहेत की नाही? अशा परिस्थितीत कोणती माणसं, कोणाला नोकऱ्या देणार हे समजायला हवं. याचं उत्तर तुम्हाला कंसल्टंसी कंपन्या आणि अध्ययन संस्थांच्या अहवालात मिळू शकेल. सगळ्यांत आधी आणि त्वरेने नोकऱ्या तेजीत चालणाऱ्या उद्योगांमध्ये मिळू शकतील.

ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी अमेझॉनने मे महिन्यात 50 हजार लोकांना हंगामी तत्त्वावर नोकरी दिली. याआधीच अमेझॉनने घोषणा केली आहे की 2025 पर्यंत भारतात 10 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या जातील. लॉकडाऊनमध्ये बहुतांश माणसं घरुन काम करत आहेत. घरुनच खरेदी करत आहेत. याचा परिणाम इकॉमर्सवर, फूड डिलेव्हरी अॅप चालवणाऱ्या कंपन्यांवर पाहायला मिळाला. खाण्यापिण्याचं सामान, साबण, तेल अशा वस्तू ज्या दैनंदिन गरजेच्या आहेत, त्या तयार कंपन्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

वर्क फ्रॉम होम करण्यासाठी तुम्हाला जे काही हवं आहे, त्या सगळ्यासाठीही माणसं हवी आहेत. इंटरनेट आणि फोनचा वापर वाढणं टेलिकॉम क्षेत्रासाठी सुवार्ता आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. अनेक कंपन्या सध्याच्या काळात पैसा कसा वाचवता येतील या प्रयत्नात आहेत, त्यासाठी त्यांना कंसल्टंटची आवश्यकता आहे. नेटवर्किंग साईट लिंक्डनने एका ब्लॉगमध्ये 10 अशा कामांची यादी बनवली आहे, ज्यामध्ये माणसांची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात या क्षेत्रात आगेकूच करता येण्याची शक्यता अधिक आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, प्रोजेक्ट मॅनेजर, आयटी अडमिनिस्ट्रेटर, कस्टमर सर्व्हिस स्पेशालिस्ट, डिजिटल मार्केटियर, आयटी सपोर्ट, हेल्प डेस्क, डेटा अॅनालिस्ट, फायनान्शियल अॅनालिस्ट, ग्राफिक्स डिझायनर.

या यादीत काही क्षेत्रं वाढू शकतील. तूर्तास ही कामं आहेत ज्यामध्ये काम करणारी माणसं शांततेत जगू शकतात. नवी माणसं या क्षेत्रांना आवश्यक गोष्टी शिकू शकतात. हे आताचं चित्र आहे. यात हेल्थकेअर, ऑनलाईन एज्युकेशन, ईकॉमर्सची सगळी कामं यात येऊ शकतात. लॉजिस्टिक्स म्हणजे ट्रक, ट्रेन, विमानं यांच्यापासून शहरांमध्ये खाणंपिण्याचं वितरण करणं, किराणा तसंच दारुविक्री करणं तसंच कागगपत्रं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं अशी कामं वेगाने वाढू शकतात. भविष्यात यापैकी कोणती कामं संगणकांच्या किंवा रोबोच्या हाती जातील याविषयी कल्पना नाही

भविष्यातील परिस्थिती कशी असेल याची झलक जाणून घ्यायची असेल तर अतुल जालान यांचं 'Where will man take us?' हे पुस्तक वाचावं. मनुष्य आणि त्यानेच निर्माण केलेलं तंत्रज्ञान यांच्यातील द्वंद्वार हे पुस्तक सुरेख भाष्य करतं. भविष्याची एक झलक दर्शवते जी काही वेळेला तुम्हाला घाबरवते, काही वेळेस आशावाद निर्माण करतं. जगातील सगळ्यांत मोठी कन्सल्टिंग कंपनी गार्टनरनुसार, कामाची पद्धत कोरोनामुळे बदलणार आहे. कंपन्या अधिकाअधिक काम हंगामी लोकांकडून करवून घेतील. कायमस्वरुपी नोकऱ्या कमी कमी होत जातील. कोरोनानंतरची स्थिती यावर त्यांनी केलेल्या अहवालानुसार, 32 टक्के कंपन्या पैसा वाचवण्यासाठी स्टाफ कमी करून त्यांच्या जागी हंगामी लोकांची नियुक्ती करतील.

साइकी (SCIKEY) अशा लोकांसाठी टॅलेंट कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. जॉब पोर्टलचं नवं रूप. त्यांनीही आगामी काळाचा नूर ओळखला आहे. कायमस्वरुपी नोकऱ्या कमी होत जाणार आणि असाइनमेंट तत्त्वाने काम करणाऱ्यांची म्हणजे गिग वर्कर खरे कामगार होतील. डिजिटल आणि दूरस्थ पद्धतीने होणारं काम वाढू लागेल. पगार किंवा मानधन ठोस नसेल. ते कमी-जास्त होत राहील.

चीनव्यतिरिक्त आशिया खंडातील अन्य देशांमध्ये इंडस्ट्रियल वर्करसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. चीनहून कारभार आटोपून कंपन्या इथे आल्या तर संधी वाढू शकतात. हे सोडूनही अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. उमेदवाराची पदवी किंवा प्रमाणपत्र यापेक्षाही तो किंवा ती कामासाठी सक्षम आहे या निकषावर पात्र ठरते का? यावर अवलंबून असेल. याबरोबरीने वयस्कर होत जाणाऱ्या माणसांना सातत्याने नव्या गोष्टी शिकून घेणं आवश्यक होईल. थेट कॉलेजातून कामाच्या ठिकाणी येणाऱ्यांना कामासाठी आवश्यक गुणकौशल्यं, तंत्रं शिकावी लागतील. कंपन्या उमेदवाराला कामावर घेऊन दोन वर्ष प्रशिक्षण देत बसणार नाहीत. तातडीने कामाला भिडू शकतील अशा मनुष्यबळाची कंपन्यांना गरज आहे. याचीही तयारी सुरू आहे. एप्रिल महिन्यात लिंक्डनने घेतलेल्या सर्वेक्षणात हे स्पष्ट झालं की, नोकरी करणाऱ्यांपैकी 63 टक्के माणसं इ-लर्निंगवर अधिक वेळ व्यतीत करत आहेत.

आपण ज्या उद्योगात काम करतो त्याविषयी अधिक माहिती त्यांना जाणून घेणाऱ्यांचं प्रमाण ६० टक्के आहे. ५७  लोकांना आपल्या उन्नतीसाठी हे शिकणं महत्त्वाचं वाटतं. ४५  टक्के लोकांना आपलं म्हणणं प्रभावीपणे सादर करता यावं यासाठी कम्युनिकेशन स्किल्समध्ये सुधारणा करायची आहे. त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळणार हे संबंधित कंपन्यांवर अवलंबून आहे जिथे ते काम करतात. डिलॉयटने अन्य कंपन्यांसाठी एक आव्हान तयार केलं आहे. माणूस आणि तंत्रज्ञान समोरासमोर उभं ठाकले आहेत. नवनवीन तंत्रज्ञान अंगीकारणाऱ्या कंपन्यांच्या शर्यतीत कोणती कंपनी आपली माणुसकी जिवंत राखते. कदाचित यामुळेच आगामी काळातील कंपन्या नफा कमावण्याच्या बरोबरीने असं काही करू इच्छितात ज्यामुळे त्यांना 'ग्रेट प्लेसेस टू वर्क' ही बिरुदावली मिळू शकेल.

 

 

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News