कोरोनामुळे लगीनसराई झाली सोपी

शिल्पा नरवडे
Sunday, 9 August 2020
  • कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीत आणि कमी खर्चात लग्न सोहळे होत आहेत, पुढेही ही पद्धत कायम अशीच चालू ठेवावी असे मला वाटते.
  • लग्न सोहळा हा थाटामाटात साजरा करण्याची एक प्रकारची आपल्या समाजात जणूकाही चालरितच पडून गेली होती.

कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीत आणि कमी खर्चात लग्न सोहळे होत आहेत, पुढेही ही पद्धत कायम अशीच चालू ठेवावी असे मला वाटते. लग्न सोहळा हा थाटामाटात साजरा करण्याची एक प्रकारची आपल्या समाजात जणूकाही चालरितच पडून गेली होती. पण या लग्न पद्धतीमध्ये गरीब बापाचा जीव होरपळून निघत होता याचे भानच समाजाला राहिले नव्हते. प्रत्येक बापाला वाटतं आपली मुलगी दिल्या घरी सुखाने नांदावी तिला कुठल्याही प्रकारचा सासुरवास नको त्यासाठी तो जमेल तश्या पद्धतीने कर्जबाजारी होऊन मोठया थाटामाटाने लग्न लावून देतो. मग ज्या घरामध्ये एकापेक्षा जास्त मुली असतात त्या बापाला तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कधीकधी तर आपला जीव सुद्धा गमवावा लागतो.

आज कोरोनोसारख्या महामारीने तर गरीब श्रीमंत यांना एकच शिकवण दिली. आयुष्यभर काबाडकष्ट करून रक्ताचं पाणी करणारा बाप मुलीच्या लग्नासाठी फक्त एका दिवसात लाखोरुपयांचा खर्च करतो त्या खर्चाची काहीही गरज नसून अगदी मोजक्याच माणसांमध्ये आणि आपल्या एपतीनुसार सुद्धा लग्न होऊ शकते हे संपूर्ण जगाला दाखवून दिले.  माणसाने नेहमी अंथरून पाहून पाय पसरावे. ही म्हण काही वावगी ठरणार नाही.

लग्नसोहळ्याना प्रचंड प्रमाणात खर्च करण्यापेक्षा तेच दोन पैसे मुलीच्या शिक्षणासाठी वापरा म्हणजे ती स्वतःच्या पायावर उभी राहिल. किंवा तिच्या नावावर टाका म्हणजे भविष्यात तिला कधी गरज पडली तर त्याचा उपयोग ती करू शकेल.

लग्न म्हणजे फक्त थाटामाटाचा सोहळा नसून दोन जीव ,दोन घर, दोन गावे, दोन तालुके, दोन जिल्हे  जोडणार नात आहे. त्या नात्याची किंमत पैशाचे सोंगडोंग घेऊन न करता जमेल तितक्या साध्या पद्धतीने करावी. सध्या जी लग्न पध्दत चालू आहे अशीच पुढे कायमस्वरूपी चालू ठेवण्याचे काम आपले सर्वांचे, या संपूर्ण समाजाचे आहे, त्यामुळे हीच पद्धत पुढे चालू ठेवण्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News