Google Map च्या मदतीने समजणार Corona Hotspot; तुमच्या आसपास किती Covid-19 रुग्ण आहेत, कसं पाहायचं?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 26 September 2020
  • Google Map हे नेहमी लोकांना मार्ग दाखवण्याचे काम करते परंतु आता कोरोना हॉटस्पॉट कुठे आहे हे सांगणार आहे.
  • तुम्ही जात असलेल्या परिसरात कोरोनारुग्णांची संख्या वाढलेली आहे का हे Google सांगू शकेल.

नवी दिल्ली :- Google Map हे नेहमी लोकांना मार्ग दाखवण्याचे काम करते परंतु आता कोरोना हॉटस्पॉट कुठे आहे हे सांगणार आहे. तुम्ही जात असलेल्या परिसरात कोरोनारुग्णांची संख्या वाढलेली आहे का हे Google सांगू शकेल. कोणत्या परिसरात रुग्ण वाढले आहेत याची माहिती द्यायला नवे फीचर Google Map ने सुरू केले आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर क्वारंटाईन, हॉटस्पॉट, कंटेन्मेंट असे एक ना अनेक नवे शब्द मोठ्या प्रमाणावर रोज कानावर पडत आहेत. पण आता अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर धोका असून ही अनेक जण कामासाठी बाहेर पडत आहेत. तुम्ही जाता त्या भागात कोरोना रुग्णांची संख्या किती आहे, ती वाढलेली आहे का हे सांगायला Google Map ने एक नवी संकल्पना विकसित केली आहे. कोरोना हॉटस्पॉटची माहिती गूगल मॅपवर मिळणार आहे.

Google Map App च्या वरच्या बाजूला असलेल्या Covid 19 या पर्यायावर क्लिक केल्यावर एक लाख लोकसंख्येमागे किती रुग्ण विशिष्ट भागात आहेत, याची माहिती मिळेल. या सह विशिष्ट भागात किती रुग्ण वाढले किती कमी झाले ही माहिती ही मिळेल, असे प्रॉडक्ट मॅनेजर सुजॉय बॅनर्जी यांनी सांगितले.

यामुळे लोकांना नक्की कोणत्या भागात जाणे धोक्याचे आहे, कुठे जाणे टाळावे हे ठरवण्यास मदत होणार आहे. ही सर्व माहिती यूजर्स पर्यंत पोहचवण्यासाठी बाल्टीमोरच्या जॉन्स हॉपकिन्स रुग्णालय, न्यूयॉर्क टाईम्स, विकिपीडीया यासारख्या स्त्रोतांकडून हा सर्व डेटा उपलब्ध झाला आहे. यासह जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) माहिती घेण्यात आल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले.

Google Map ने आधी कोरोना साथीच्या संदर्भातील माहिती देणारी टूल्स उपलब्ध करून दिली आहेत. त्यात कुठल्या भागात गर्दी जास्त आहे हे समजते. कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असताना तुम्ही कोणत्या भागात जाणे सुरक्षित असेल याची माहिती Google Map च्या मदतीने तुम्हाला देणे हे महत्त्वाचे ठरणार आहे, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. या कोरोना काळात Google Map नी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

त्यात लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवा कुठे उपलब्ध होतील, याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. या सेवा केंद्रांच्या माहितीसाठी राज्य आणि केंद्र सरकारसोबत राहून अधिकाऱ्यांच्या मदतीने याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली होती. शासकीय यंत्रणेनी उपलब्ध करून दिलेली भोजनाची तसेच निवासाची व्यवस्था लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य या काळात करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये लोकांपर्यंत ही माहिती पोहचवणे हा उद्देश होता, असे सांगण्यात आले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News