मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीला ८५० कोटी रुपयांचा दणका  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 18 March 2020
  • मराठी चित्रपटसृष्टीचे 40 ते 50 कोटी रुपयांचे, तर हिंदी चित्रपटसृष्टीचे 600 ते 800 कोटींचे नुकसान होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
  • केवळ चित्रपट, फिल्म निर्मिती, वितरणालाच फटका बसणार नसून चित्रपटाच्या चित्रीकरणापासून ते चित्रपट प्रदर्शनापर्यंत सर्वच घटकांवर त्याचा परिणाम होणार आहे.

मुंबई ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट संघटनांनी 31 मार्चपर्यंत चित्रपट, मालिका, वेब सीरिजचे चित्रीकरण बंद ठेवले आहे. त्यामुळे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता आहे. मराठी चित्रपटसृष्टीचे 40 ते 50 कोटी रुपयांचे, तर हिंदी चित्रपटसृष्टीचे 600 ते 800 कोटींचे नुकसान होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
सरकारने नुकतेच नाट्यगृहे, चित्रपटगृहे बंद करण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर आता 19 ते 31 मार्चपर्यंत संपूर्ण भारतातील चित्रपट, टीव्ही मालिका, जाहिराती, वेबसीरिज आदी सर्वांचे चित्रीकरण बंद राहणार आहे. त्यामुळे सर्वच चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे. त्याचा परिणाम हा चित्रपटसृष्टीच्या अर्थकारणावर होणार आहे. 
याबाबत चित्रपट व्यापार विश्‍लेषक तरण आदर्श म्हणाले, की 19 ते 31 मार्चपर्यंतचे चित्रीकरण बंद राहणार आहे. त्यामुळे केवळ चित्रपट, फिल्म निर्मिती, वितरणालाच फटका बसणार नसून चित्रपटाच्या चित्रीकरणापासून ते चित्रपट प्रदर्शनापर्यंत सर्वच घटकांवर त्याचा परिणाम होणार आहे. कोरोनामुळे सर्व नव्या चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला 600 ते 800 कोटींचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.
‘बागी 3’ आणि ‘अंग्रेजी मीडियम’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना चित्रपटगृहे अचानक बंद केल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्याचबरोबर ‘सूर्यवंशी’, ‘83’ या चित्रपटांचे प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News