हवेतून होऊ शकतो कोरोनाचा प्रसार; अशी घ्या काळजी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 August 2020
  • हवेतूनही कोरोना विषाणूचा प्रसार होतो, हे यापूर्वी समोर आले आहे. मात्र, हवेत हे विषाणू साधारणत: अडीच ते तीन तास राहतात,

मुंबई : हवेतूनही कोरोना विषाणूचा प्रसार होतो, हे यापूर्वी समोर आले आहे. मात्र, हवेत हे विषाणू साधारणत: अडीच ते तीन तास राहतात, अशी नवी माहिती आता समोर येत आहे. एवढेच नव्हे तर हे विषाणू हवेत 25 ते 30 फुटांपर्यंत वर जात असल्याचे नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर फिरणे टाळावे आणि सुरक्षा साधनांचा आवर्जून वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीला आठ महिन्यांचा काळ लोटला आहे. या आठ महिन्यांत विषाणूंमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यानुसार त्याची वेगवेगळी निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. एखादा बाधित खोकल्यास अथवा शिंकल्यास त्याच्या तोंडातून निघणाऱ्या थेंबांमधून हे विषाणू हवेत पसरतात. त्यानंतर ते अडीच ते तीन तास त्या परिसरात राहतात. या दरम्यान एखादा निरोगी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्यास त्याला विषाणूंची बाधा होण्याचा धोका असतो, असे डॉ. भोंडवे यांनी सांगितले.

हा धोका टाळण्यासाठी सार्वजनिक, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक शौचालये, प्रसाधनगृह यांचा वापर करताना पुरेशी काळजी घ्यावी. तसेच, घर आणि आपले कार्यालय वेळोवेळी सॅनिटाईज करावे, असा सल्ला डॉ. भोंडवे यांनी दिला आहे.

काय काळजी घ्याल ?
- बाहेर जाताना मास्कचा वापर अवश्‍यक करा
- सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ करा
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
- सार्वजनिक शौचालयांचा वापर शक्‍यतो टाळा
- सार्वजनिक शौचालयांचे नियमित निर्जंतुकीकरण करा
- घर, कार्यालये सॅनिटाईज करा
- घरात योग्य व्हेंटिलेशन राहील याची काळजी घ्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News