कोरोना आणि करुणा

डाॅ रघुनाथ कडाकणे
Friday, 18 September 2020

जिवंतपणी जी मंडळी जात-जात, धर्म-धर्म, भाषा-भाषा, देश-देश, वंश-वंश करून एकमेकाला निष्कारण ठार मारत होती ती आता येथे स्मृतिभ्रंश होऊन की कसे ते माहीत नाही, पण एकत्रच राहाताहेत हे तुम्ही नवे जागतिक आश्चर्य म्हणून घोषित करावे

कोरोना आणि करुणाः मृत माणसांचे अमृत माणसांना निवेदनपत्र 

उर्वरित मातापित्यांनो, भावाबहिनींनो आणि मुलाबाळांनो,

स.न.वि.वि.

पत्रास कारण की, अगदी नुकतेच माझे निधन झाले. विषाणूसंसर्ग होऊन माझा श्वास घुटमळला. माझा जीव सदेह तळमळला. अखेरचा इलाज म्हणून माझ्या नाकात घुसविलेल्या नळ्यांतून मला कृत्रिम प्राणवायू पुरविला गेला. पण एक अनोखा वायू होऊन माझा प्राण कधी देहमुक्त झाला हे इस्पितळातील तज्ञांनासुध्दा कळले नाही. इकडे मी असा निष्प्राण झालो तेव्हा माझ्याजवळ माझ्या नात्यागोत्यांतले कोणी कोणी नव्हते. परंतु माझ्या मरणाच्या सांगाव्याने तिकडे ते नक्कीच तडफडले असणार. आक्रंदले असणार असा मला विश्वास आहे. पण ते असो. महत्त्वाचे सांगायचे म्हणजे, केवळ सोपस्कार म्हणून म्हणा किंवा आपल्यावर वरिष्ठांकडून लादलेले अटळ कर्तव्य म्हणून म्हणा, चार-सहा पगारी लोकांनी माझ्या कलेवराचे त्वरेने अंत्यकार्य केले. स्थानिक प्रसारमाध्यमांतील त्या दिवशीच्या मृतांच्या आकड्यांत एका आकड्याची जी भर पडली होती, तो मी होतो. पण माणसे अशी घाऊक आकड्यांनी मरू लागली तर परक्या लोकांच्या आतड्यांनी किती म्हणून पिळ घ्यावा, नाही का?

त्या दिवशी अगदी सर्वदूर दूरदर्शनच्या पडद्यासमोर भरल्या पोटाचा घेर कुरवाळत स्थिरबुडाने बसलेल्या लोकांनी नित्याची सवय म्हणून या वाढत्या आकड्याची किंचितही फिकीर म्हणून केली नाही. नाही म्हणायला, मला थोडेपार ओळखणाऱ्या लोकांनी एका दिवसापुरते माझ्या श्रद्धांजलीचे अतिसंक्षिप्त शोकसंदेश त्यांच्यात्यांच्या भ्रमणयंत्रांवरून सर्वत्र फिरविले. त्यांतल्या काहींनी खऱ्याखुऱ्या वियोगाने तर बहुतेकांनी निव्वळ योगाने. मला चिरशांती लाभावी म्हणून काहींनी स्वतः अगदी म्हणजे अगदीच शांत राहून ईश्वरचरणी प्रार्थना वगैरे केली. (ते ईश्वरचरण ना त्यांना तिथे कधी  दिसले ना इथे मला. पण ते चरण नंतर कधीतरी सवडीने!)

खरे सांगायचे तर, आज मी खूप म्हणजे खूप अशांत आहे. माझ्या विदेही मनाला अव्यक्त असे काहीतरी चिरते आहे. म्हणून तुमच्याशी थोडा गुढसंवाद साधायचा विचार आहे. आशा आहे की निदान मेलेल्या माणसाविषयीचा तरी किंचितसा आदर म्हणून तुम्ही माझे म्हणणे सकर्ण ऐकून घ्याल. समजा, आता या घडीला तुम्ही जर तुमच्या दूरदर्शन संचासमोर बसून नाचगाणी पाहून आपापले मनोरंजन करत असाल किंवा तुम्ही नवतंत्राने शोधलेल्या नानाविध समाजमाध्यमांच्या माध्यमांतून आपले किंवा इतरांचे एकूणच  मानवी जीवनाविषयी उथळ प्रबोधन करीत असाल, नपेक्षा संपूर्णतः आत्मरत होऊन तुम्ही अगदी मनसोक्त नशापान किंवा खानपान करत असाल तर तुमच्या त्या सर्वसामान्य आयुष्यातला घड्याळकाट्यांना मोजता येणारा अमूल्य वेळ वायफळ जाऊ नये म्हणून माझा हा ताजा मृतानुभव आपल्याला अगदी थोडक्यात सांगावयाचा आहे. आशा आहे की, तो आपल्यासाठी अमृत ठरेल.

आणखी एक. खरे तर, मी एकट्याने एकांतातच आपल्याशी बोलणार होतो. पण मी असा अचानक मृत होऊन येथे आलो आणि निमिषार्धात आजवर मृत पावलेल्या सर्वांच्यात अगदी अलगद मिसळून गेलो.  इथले हे सगळे मला म्हणाले की, आपल्यासाठी इतके रुदन करणाऱ्या, प्रार्थना आणि नानाविध रुढीगत असे विधी करणाऱ्या जिवंत लोकांच्या चिरशांततेसाठी, चिरआनंदासाठी अपूर्व असे आपणच  काहीतरी केले पाहिजे. आता तसेही आपण स्थळकाळाचे कृत्रिम कुंपण ओलांडून पार पुढे आलेलो आहोत. आता आपल्याला आपल्याआपल्या पोटापाण्याची, संसार-प्रपंचाची अशी काही कटकट मागे राहिलेली नाही. तर मग आता मृतपणी तरी अखिल विश्वाच्या भल्याचा थोडाबहुत सखोल विचार आपण करायला काय हरकत आहे? आश्चर्य म्हणजे, यावर सर्वांचे म्हणजे सर्वांचेच अगदी निरपवाद मतैक्य झाले. आणि याचे फलित बघा. आपल्यासारख्या सर्व जिवंत माणसांचे नुसते जिवंत राहाण्यासाठीचे कार्यबाहुल्य ध्यानात घेऊन कसलाही पाल्हाळ न लावता तुमच्या व्यवहारी भाषेत तुम्ही ज्याला २०२० हे जे साल म्हणता त्याच सालासाठीचा एक २० कलमी कार्यक्रम आयता तयार करून आम्ही सोबत पाठवित आहोत.

हो, हवे तर आपण आपल्या लोकशाहीच्या मार्गाने त्यावर हवी तितकी साधक-बाधक [नको, नको. “बाधक” नको. त्यामुळेच तर आम्ही आपल्याला अंतरलो! पण ते असो] चर्चा करून यथाशिघ्र अंमल करावा असे आमचे सामुदायिक आवाहन आहे. तर, बाबांनो, आमच्या प्रस्तावित कार्यक्रमाची कलमे खालीलप्रमाणे:

१. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो. मी मेलो. माझ्यासह असंख्य लोक मेले. व्यक्तिशः आम्ही मेल्याचे दुःख नाही. पण आम्ही मेल्याचे जगाला दुःख नाही याचे आम्हाला अतीव दुःख आहे. पण हा मुद्दा आम्ही आता  प्रतिष्ठेचा करणार नाही. तरी पण तुम्हा माणसांच्या जगात किमान आमच्या जगण्याइतकी तरी आमच्या मरणाला प्रतिष्ठा मिळायला हवी होती इतकेच आमचे साधे म्हणणे. असो.

२. अर्थात, आम्ही अचानक मेल्यामुळे आमचे सगेसोयरे, आप्तेष्ट यांना विरहयातना वगैरे  झाल्या हे खरे. पण आम्ही मरताना त्यांना अखेरच्या चार हिताच्या गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असे येथे आम्हा सर्वांनाच वाटतेय.

३. आपण जिवापाड काबाडकष्ट करून जपलेली मिळकत, पैसा-आडका, सोनेनाणे हे सारे आपला जीव गेल्यावर जिथल्या तिथेच राहिले म्हणून इथे काही गरीब आणि मध्यमवर्गीय लोक मरणोत्तर तडफडत आहेत. त्यावर कोणता जालीम इलाज करता येईल यावर येथे आपापसांत सल्लामसलत सुरू आहे. त्यामुळे जिवंतपणी जगायचे सोडून या फुटकळ गोष्टींत आपले कितीसे आयुष्य फुकट घालवावे याचा निर्णय तेथील बाकीच्या सर्वसामान्यांनी स्वयंप्रज्ञेने करावा असा आमचा निरोप आहे.

४. जन्मताच आम्ही अगदी गर्भश्रीमंत होतो पण गर्भातून जसे आम्ही या जगात आलो तसे जग सोडतानाही आम्हाला निर्वस्त्रच यावे लागले अशी उपरती झाल्याचा गर्भित इशारा “मेलो आणि शहाणे झालो” या मृत श्रीमंतांच्या नव्याने स्थापन झालेल्या येथील परोपकारी संघटनेने दिला आहे. तेव्हा, विद्यमान श्रीमंतांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नये असे आम्हास वाटते.

५. “मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही” अशी म्हण आम्ही जितेपणी वारंवार ऐकिली होती. पण स्वतः मरूनही आम्हाला तो येथे कोठेच दिसला नाही. दुसरे म्हणजे, “मृतात्म्यास चिरशांती लाभो” असे आमच्या सर्वांच्या मृत्यूनंतर आपण सारे हयातजन सतत घोकत असल्यामुळे आम्हा सर्वांचाच तो आत्मा एकदाचा शोधून काढण्यासाठी येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या तज्ञांची एक उच्चस्तरीय समिती आधीच गठित केलेली आहे. परंतु सदर समितीने तांत्रिक कारणास्तव अमर्याद मुदतवाढ मागितली असल्यामुळे थोडी पंचाईत झाली आहे, हे खरे आहे . पण ते असो.

६. मरणाऱ्यापेक्षा जिवंत असणाऱ्यांचे प्रश्न खूपच जास्त असतात असे येथील काही सुखी मृतांचे मत आहे. त्यात तथ्य असावे असे सकृतदर्शनी तरी वाटते. आवश्यकता भासल्यास आपण स्वतःहून पडताळा करण्यास आमची कसलीही हरकत नाही याची नोंद घ्यावी.

७. जिवंतपणी जी मंडळी जात-जात, धर्म-धर्म, भाषा-भाषा, देश-देश, वंश-वंश करून एकमेकाला निष्कारण ठार मारत होती ती आता येथे - स्मृतिभ्रंश होऊन की कसे ते माहीत नाही, पण एकत्रच राहाताहेत हे तुम्ही नवे जागतिक आश्चर्य म्हणून घोषित करावे असा येथील “रण-मरण” नावाच्या वैश्विक समुहाचा आग्रह आहे.

८. येथे सगळे आधीच मेलेले असल्याने आपल्या सुरक्षेकरिता आपापल्या देशाचे सैन्यदल आणि शस्त्रसाठे वाढविणे अथवा ते अधूनमधून वापरात राहावेत म्हणून मुद्दाम दुर्गम खोऱ्यांत युध्दखोरी वगैरे करणे हे निषिद्ध मानलेले आहे. यात जैविक अस्त्रे आणि त्यांचा छुपा वापरही आलाच, हे वेगळे सांगायला नको.

९. माणूस हा निसर्गनिर्मित आहे की मानवनिर्मित आहे यावर आपण माणसांनी वृथा काथ्याकूट करू नये असा आमचा सल्ला आहे. माणसांतील नर-मादीची कामोत्सुक धडपड मनुष्यजन्मासाठी केवळ निमित्तमात्र असून त्याचा उपयोग निव्वळ तुमच्या जन्मदाखल्यापुरता आहे हा दाखला चिरकाल ध्यानी असावा.

१०. या विश्वात अगणित सूक्ष्म-स्थूल जीव-जंतू दरक्षणी उपजत असतात आणि तेवढेच नष्टप्रायदेखील होत असतात. त्यांच्या जन्माचे, जीवनचर्येचे आणि मृत्यूचे थेट वार्तांकन करू शकणारे दूत खूप मोठ्या संख्येने आम्हाला हवे आहेत. ते आपल्याकडून उपलब्ध झाल्यास आमच्या येथील मुख्यालयातून विनाविलंब, विनामूल्य, विनाजाहिरात, दिवसरात यथातथ्य ते सारे प्रक्षेपित केले जाईल याची आम्ही ग्वाही देतो. फक्त त्यासाठीचे संच व इतर तत्सम साधने आपण स्वखर्चाने उत्पन्न करावीत एवढीच आमची अट आहे.

११. या जगात आजघडीला हयात असणाऱ्या लोकसंख्येपेक्षा आजतागायत मृत पावलेल्या माणसांची संख्या कित्येक पटींनी जास्त आहे, हे उघड सत्य आहे. अर्थात, अखंड  जगाच्या कल्याणार्थ आमच्यापैकी जरी केवळ सज्ञान मृतांना मतदानाचा आणि नेतृत्वाचा हक्क मिळाला तर सबंध जगात आमचेच राज्य चिरायु होईल या महाआव्हानाचे आपणा सर्वांना सदैव भान असावे.

१२. आमचा हा संदेश तूर्तास “अमृताते पैजा जिंकणाऱ्या” मराठी भाषेत आमच्याकडून संप्रेषित करण्यात आला आहे. तथापि, तुमच्या जगातील सर्व भाषांमध्ये तो दृतगतीने अनुवादीत करण्याची विनामूल्य सोय आमच्या वतीने आधीच करण्यात आलेली आहे. तेव्हा यावरून अनाठायी वाद नसावा.

१३. तसेच, यासमयी हयात असणारे सर्व कवी, लेखक, कलावंत, विचारवंत, तत्तज्ञ, मर्मज्ञ, दार्शनिक, योगी, साधक, शास्त्रज्ञ यांना हा आमचा संदेश बाळबोध वाटू शकतो याची आम्हांस जाणीव आहे. म्हणून आम्ही आमचा संदेश अधिक गूढ-गंभीर, दुर्बोध स्वरूपातसुध्दा चिन्हांकित केलेला आहे. झाडांच्या पानांत, फुलांच्या कानांत, आकाशाच्या रंगात, पर्वतांच्या अंगात, सागराच्या ढंगात अशा अगणित ठिकाणी अगणित रूपांत आमचा हा संदेश सुप्त असेल. जिज्ञासूंनी आपले भिंग बाजूला ठेवून त्याचे जरूर अवलोकन करावे.

१४. आमच्या या खास पत्रावर आमच्या विद्यमान अधिवासाचा पत्ता मुद्दामहून गुप्त ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे स्वर्गात, नरकात, आकाशात, पाताळात किंवा परलोकात आम्ही आहोत असा वितंड माजवून श्रद्धा- अंधश्रध्दांचा मुक्तबाजार आपणांपैकी कोणी मांडू नये. किंवा भूत, खेत, देव, दानव अशा अवतारांत आम्ही वावरतो-संचारतो असेही कदापि भासवू नये. किंवा आमच्यापैकी काही थोरजनांची अंतिम छबी,  रंगचित्रे, शिल्पे,  पुतळे, समाधीस्थळे इत्यादी ठिकाणी त्यांना मरणोत्तर बंदिस्तदेखील करू नये.

१५. आम्ही आमचा सर्वांचा रक्तामांसाचा देह इथल्याच मातीत मरतेवेळीच विसर्जित केला आहे. त्यामुळे त्या देहाच्या सर्व तृष्णा आणि क्षुधादेखील आपाततः विसर्जित केल्या आहेत. आमचे अज्ञान, आमचे प्रमाद, आमचा अविचार, आमचे विकार, आणि आमचा आकार हे सारेच आम्ही स्वेच्छेने विसर्जित केले आहे.

१६. आता आम्ही आहोत सृष्टीने आजवर मिळविलेल्या शहाणपणाच्या रूपात. आम्ही आहोत तिच्या निरंतर चलनवलनात, आम्ही आहोत साऱ्या चराचरांत. आणि खरे सांगायचे तर, इतक्यात आम्हाला चिरशांती वगैरे नकोय. पण म्हणून आम्ही पुनर्जन्मासाठीदेखील कोठेही अर्ज केलेला नाही. आम्हाला आमचे जाणिवेच्या पलिकडचे हे अस्तित्व बिनशर्त मान्य आहे.

१७. आता आम्हाला पाहायचे आहे हे जग निदान तुमच्यासारख्या जिवंत माणसांमुळे सुंदर झालेले. आम्हाला पाहायचे हे जग निदान तुमच्या हयातीत तरी जगण्यासाठी लायक झालेले. आम्हाला पाहायचे इथून पुढच्या हरेक नव्या जन्माचे अनोखेपण. आणि हरेक नव्या मृत्यूचे साजरेपण.

१८. वास्तविक पाहता, आमची इथली लोकसंख्या वाढू नये अशी आमची तीव्र इच्छा आहे. पण तुमची लोकसंख्या तुमच्यामुळे घटणार नाही याची मात्र तुमची तुम्हीच काळजी घ्यावी.

१९. अगदी अनुभवाने खरे सांगायचे तर, तसा माणसाच्या जीवनाला काहीही अर्थ नाही. पण त्याच्या जगण्याला मात्र अर्थ येऊ शकतो हेही तितकेच खरे आहे. माणूस जन्मताना नुसता मांसगोळा असतो. आणि तो मेला की त्याचा मुडदा होतो. मग हा माणूस इतका पसारा काय म्हणून गोळा करतो हाच एक कुटप्रश्न आमच्यापुढे आहे. आणखी सांगायचे म्हणजे, सध्या  आम्हाला ही सारी सृष्टी अपरंपार अवघडलेली दिसतेय. बऱ्याच कालावधीनंतर आता बहुदा ती आपली कुस बदलते आहे. बहुदा तिला अतीव प्रसुतिकळा येत असाव्यात. बहुदा तिची कुस फिरून नव्याने उजवते आहे. आम्हाला तर वाटतेय की, ती आता चांगली वयात आली असल्याने अगदी उन्नत असा अपूर्व माणूस तिच्या पोटी निपजेल. तोवर आपल्याकडील वैज्ञानिकांनी परग्रहांवरील जीवसृष्टी वगैरे शोधून पाहावी. किंवा अगदी प्रलयाच्या आधी इथली मनुष्यवस्ती दुसऱ्या ग्रहावर स्थलांतरित करण्याच्या पर्यायाचा विचार वगैरे जरूर करून ठेवावा. संभवणाऱ्या  प्रत्येक नवअर्भकाचा जैविक आराखडा आधीच निर्दौष कसा करता येईल हेही करून पाहावे, हवे तर. परंतु सध्याच्या साधारण मनुष्यातसुध्दा अंतर्बाह्य परिवर्तनाची मूलशक्ती सूप्त आहे हेही ध्यानात असू द्यावे.

२०. खरे तर, हा आमचा पहिलाच संदेश आहे याची आम्हाला पुरेशी जाणीव आहे. पण तुमच्या या संचारबदीच्या कठीण काळात वेळीअवेळी आमच्याशी तुम्हाला तुमच्या जिवंतपणीच दूरसंवाद साधायचा असेल आणि हे जग खरेच सुंदर बनविण्यासाठी आणखी काही साहाय्य हवे असेल तर तातडीच्या संपर्कासाठी हा आमचा गुप्तशब्द [पासवर्ड] नीट लक्षात ठेवा.

"करुणा! शांती! अतेज्ञ!". तुम्हा सर्वांच्या जिवंत मनात, अंतर्मनात, काळजात, आतड्यात, पोटात, ओठांत हा आमचा परवलीचा शब्दसंकेत चांगला खोलवर उतरू द्या. मग बघा. आपण अगदी विनाव्यत्यय एकमेकांच्या संपर्ककक्षेत राहू. शेवटी, निसर्गाच्या प्रमादाने म्हणा किंवा माणसांच्या उन्मादाने म्हणा, नुसत्या विषाणूसंसर्गाचे निमित्त होऊन आम्ही आमचे अर्धेमुर्धे आयुष्य तिथल्या तिथेच टाकून थेट इथे येऊन धडकलो. तरीदेखील आम्हा सर्व मृतांचे शेषजीवन आम्ही स्वखुशीने आपणा सर्व अमृतांस समर्पित करतो आहोत. फक्त ते तुम्हाला खऱ्याखुऱ्या जिवंत आणि साजिवंत माणसासारखे जगता यावे एवढीच अपेक्षा.

आपले समस्त मृतस्नेही

 

(लेखक - डाॅ रघुनाथ कडाकणे हे कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख आहेत)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News