कृषी कौशल्य प्रशिक्षणास विद्यापीठांचे सहकार्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • कुलगुरूंच्या बैठकीत ग्वाही
  • युवक-युवतींना मोफत प्रशिक्षणाचा मिळणार लाभ 

पुणे : केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषीक्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत, रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमास सहकार्य करण्याची ग्वाही राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी शनिवारी येथे बैठकीत दिली.

निवडक कृषी महाविद्यालये, पदविका व तंत्रनिकेतन संस्था, तसेच कृषी विज्ञान केंद्रांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत अधोरेखित करण्यात आले. शेती व पूरक क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्व घटकांनी मिळून काम केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

एपीजी लर्निंग सेंटरमध्ये आयोजित बैठकीस महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत उपस्थित होते. तसेच, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, संशोधन संचालक डॉ. ए. एल. फरांदे, डॉ. व्ही. के. खर्चे, डॉ. डी. पी. वासकर; विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर, डॉ. बी. एन. पवार, डॉ. प्रकाश क्षीरसागर, एपी ग्लोबलेचे उपाध्यक्ष (इमर्जिंग बिझनेस) बॉबी निंबाळकर, `सकाळ-ॲग्रोवन`चे संपादक आदिनाथ चव्हाण या वेळी उपस्थित होते.

निंबाळकर यांनी राज्यात सुरू असलेल्या गटशेती प्रवर्तक प्रशिक्षणाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. डॉ. मायंदे यांनी वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमाचे महत्त्व विषद केले. शासन, खासगी संस्था आणि कृषी विद्यापीठे यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा प्रशिक्षण उपक्रम राबवल्यास त्याचे व्यापक, दीर्घकालीन व सकारात्मक परिणाम ग्रामीण अर्थकारणावर होतील, असा आशावाद या वेळी मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला. सिमेसिस लर्निंगचे अमोल बिरारी यांनी स्वागत केले. 

रोजगारक्षम प्रशिक्षणाची संधी
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार युवक-युवतींना प्रशिक्षण दिले जाईल. सेंद्रिय शेतमाल उत्पादक, शेतमाल पुरवठा साखळी क्षेत्र सहायक, फार्म सुपरवायजर, हरितगृह चालक, दुग्धशाळा पर्यवेक्षक, बिजोत्पादक, सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञ, अवजारे सेवा प्रदाता, पॅकहाऊस कर्मचारी, बियाणे प्रक्रिया कर्मचारी, कृषी विस्तार सेवा प्रदाता यापैकी एक विषय उमेदवाराने निवडावा. बेरोजगार, व्यवसाय करू इच्छिणारा, कृषी पदविका, कृषी तंत्रनिकेतन किंवा बारावी (विज्ञान) उत्तीर्ण अशा इच्छुक उमेदवारांनी www.siilc.edu.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरावा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News