रांधणाऱ्या बाया

कुमार अंबुज
Friday, 7 August 2020

बुलबुल होत्या जेव्हा त्या तेव्हा केला स्वैपाक त्यांनी
मग हरिणी होऊन 
मग डहाळी होऊन

बुलबुल होत्या जेव्हा त्या तेव्हा केला स्वैपाक त्यांनी
मग हरिणी होऊन 
मग डहाळी होऊन

तेव्हा छोटे छोटे अंकूरही लहरत होते हवेवर
सगळीकडे कोवळं ऊन पसरलं होतं
त्यांनी आपली स्वप्न माळली
हृदयाकाशातून चांदण्या खुडून आणल्या
आतल्या कळ्यांचा रस टाकला त्यात
पण शेवटी ऐकू आला त्यांना ताट भिरकावून देण्याचाच आवाज

आपण त्यांना सुंदर म्हणालो तेंव्हा तर रांधलंच त्यांनी आपल्यासाठी
पण मग हडळ म्हणालो तरीही
त्यांनी गर्भार असतांनाही स्वैपाक केला
मग कडेवर मूल घेऊनही केला
त्यांनी आपली स्वप्नं पाहत पाहतही  मध्ये-मध्ये स्वैपाक केलाच
आमच्या स्वप्नांतही त्या जेवणच तर तयार करून देत होत्या
पहिले सुकुमार होत्या त्या तेव्हाही जेवण तयार केलं त्यांनी
आणि मग बेडौल झाल्यावरही केलंच 

त्या समुद्रस्नान करून आल्या नि त्यांनी त्यानंतरही स्वैपाक केला
तारकांना स्पर्श करून आल्या तरीही स्वैपाकालाच लागल्या
कित्येकदा तर केवळ एक बटाटा व एकच कांदा असतानाही त्यांनी स्वैपाक केला
आणि अनेकदा तर आपला धीर खचू न देता करतच राहिल्या त्या स्वैपाक

कंबर दुखत असताना ताप अंगात असताना
बाहेरच्या वादळात
आतल्या पुरात सापडल्यावरही स्वैपाक करतच राहिल्या त्या
मग वात्सल्याने भरून येऊन
त्यांनी उत्साहित होवून रांधलं

आपण रात्री-अपरात्री रांधून घेतलं त्यांच्याकडून
वीस-वीस जणांचं जेवण
ज्ञात-अज्ञात स्रियांची उदाहरणं देत-देत त्यांनी जेवण तयार केलं

बरेचदा डोळे वटारून
तर कधी पेकाटात लाथ घालून आपण त्यांना जेवण बनवायलाच लावलं
मग बाया त्या बायाच म्हणत किंचाळलो आपण ―भोसडीचे इतकं खारट?
आणि विसरून गेलो त्यांचे वाहते अश्रू जेवताना
जे जमिनीवर पडण्या आधीच टपटपले होते ताटात,वाट्यांत
कधीतरी त्यांचा एक आठवडा ह्या आनंदात गेला की
मागल्या बुधवारी आरडाओरडा न करता
आपण जेवलो मुकाट्याने म्हणून
व परवा तर दोन वेळा आलेले पाहूणे वा-वा म्हणाले व पोटभरून जेवून अन्नपूर्णा सुखी भव म्हणाले म्हणून
आणि त्यांच्याप्रतीही त्या कृतज्ञच राहिल्या ज्यांनी नाटकीपणाने का असेना 
फक्त घास हातात घेताच वा वा म्हटलं

त्या क्लर्क झाल्या अधिकारी झाल्या
त्यांनी मोटरसायकली हाकल्या सुसाट आणि गिटार वाजवलं
पण दर वेळी त्यांच्या समोर आम्ही आव्हानच उभं केलं 

आता त्या थकव्याच्या पाट्यावर आयुष्याची चटणी वाटत आहेत
रात्रींच्या चढणीवर पोळ्या लाटत आहेत पाणी जास्त झालेल्या कणकेच्या उंड्याच्या

त्यांच्या काळोखातून घाम गळतो आहे
ओघळ आले आहेत पोटऱ्यांपर्यंत
आणि त्या म्हणत आहेत ही पोळी घ्या ही गरम आहे
त्यांनी पहाटेच्या अर्धवट झोपेतही भाजी-पोळी करून दिली
मग दुपारची सुस्ती आली तेव्हाही
व अपरात्रीच्या भर झोपेत असतानाही
आणि मग झोपेतल्या झोपेतही करतच राहिल्या त्या स्वैपाक

त्यांचे पाय सुजत आहेत आता
कणा वाकतो आहे
गुढघेदुखी ची करकर ऐकायला येते आहे 
तुमच्या लक्षात येत नाहीये मागील काही दिवसांपासून त्या
खाली बसूनच स्वैपाक करत आहेत
खरंतर नीट बसताही येत नाहीये त्यांना आता खाली सुद्धा!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News