पंडित यांच्या नियुक्तीवरून मध्य प्रदेश क्रिकेटमध्ये वाद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020
  • चंद्रकांत पंडित यांची मध्य प्रदेशने मार्चमध्येच मार्गदर्शकपदी नियुक्ती केली होती; पण आता त्यांच्या नियुक्तीवरून मध्य प्रदेश क्रिकेटमध्ये वादळ सुरू झाले आहे.
  • कार्यकारिणीने आम्हाला न विचारताच ही नियुक्ती केल्याचा आरोप क्रिकेट समितीने केला आहे.

मुंबई :- चंद्रकांत पंडित यांची मध्य प्रदेशने मार्चमध्येच मार्गदर्शकपदी नियुक्ती केली होती; पण आता त्यांच्या नियुक्तीवरून मध्य प्रदेश क्रिकेटमध्ये वादळ सुरू झाले आहे. कार्यकारिणीने आम्हाला न विचारताच ही नियुक्ती केल्याचा आरोप क्रिकेट समितीने केला आहे.

मध्य प्रदेशच्या क्रिकेट मार्गदर्शकांची नियुक्ती क्रिकेट समितीच करू शकते. आम्ही पंडित किंवा कोणाच्याही विरोधात नाही; पण या नियुक्तीने आमच्या हक्कांवर गदा येत आहे. त्यांच्या नियुक्तीची जबाबदारीही आमची आहे. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेत नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप समितीने केला. या समितीत योगेश गोळवलकर, प्रशांत द्विवेदी, मुर्तझा अली यांचा समावेश आहे.

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने हे आरोप फेटाळले आहेत. पंडित यांची नियुक्ती संघटनेच्या घटनेनुसारच झाली आहे. क्रिकेट समितीचा या नियुक्तीच्या प्रत्येक टप्प्यात सहभाग होता. त्यांनी या नियुक्तीस मंजुरी दिली होती. आता निष्कारण वाद केला जात आहे, असे संघटनेचे सचिव संजीव राव यांनी सांगितले. त्यांनी पंडित यांच्याबरोबरील करार दोन वर्षांचा आहे, असे सांगितले. पंडित गतमोसमापर्यंत विदर्भचे मार्गदर्शक होते. विदर्भने चांगली कामगिरी केल्यामुळे पंडितच मार्गदर्शक राहतील, अशी अपेक्षा होती; मात्र पंडित यांनी त्याऐवजी मध्य प्रदेशचे मार्गदर्शकपद स्वीकारले. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी मार्गदर्शकात पंडित यांची गणना होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News